पुस्तकाचे नाव - वंशवृक्ष
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
वंशवृक्ष ही दोन कुटुंबांची कथा आहे. कथांचे ओघ थोड्याफार फरकाने समांतर वाहताना दिसतात. नंजनगुंड येथील श्रीनिवास श्रोत्री हे विद्वान गृहस्थ वंशवृक्षाच्या मुळाशी आहेत. मुलगा नजुंड, सून कात्यायनी, पत्नी भागीरथम्मा व नोकराणी लक्ष्मी हा त्यांचा प्रपंच. कपिला नदीच्या पुरात नंजुंड वाहून गेल्यामुळे कात्यायनी विधवा होते. धर्म आणि संस्कृतीचे उपासक श्रोत्री, पुत्रवियोगाचे दु:ख धीरोदात्तपणे पचवितात पण तरुण कात्यायनीला हा आघात पचविणे कठीण होते. श्रोत्रींकडे सदाशिवराव नावाचे भारतीय कलाकृतीचे संस्कृतीचे थोर अभ्यासक शंका समाधानासाठी येत असतात. त्यांना भारतीय संस्कृतीचा इतिहास पाच खंडात लिहायचा आहे.
पती वियोगाचे दु:ख विसरण्यासाठी कात्यायनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे ठरविते. त्याच महाविद्यालयात सदाशिवरावांचा धाकटा भाऊ राज प्राध्यापक असतो. नाटकाच्या निमित्ताने कात्यायनी-राज यांची जवळीक निर्माण होते. याचवेळी संसारात विरक्त असणारे सदाशिवराव ग्रंथपृतींच्या ओढीने आपली विद्यार्थिनी करुणा रत्ना हिच्या प्रेमात पडून विवाहबद्ध होतात. त्यांची पहिली पत्नी नागलक्ष्मी व मुलग पृथ्वी एकाकी पडतात. राज-कात्यायनीच्या मनात प्रेमभावना उत्पन्न झाल्यामुळे कात्यायनी संघर्षाच्या भोवऱ्यात सापडते. याच्या निर्णयाची जबाबदारी श्रोत्री कात्यायनीवर सोपवितात. ती सासू-सासरे-मुलगा सोडून राजशी लग्न करते.
इथुन पुढे घडणाऱ्या घटना वाचकाला अंतर्मुख करून विचारशक्तीला चालना देतात. कथानकाच्या दृष्टीने बराच मोठा कालखंड कादंबरीत आला आहे. अनेक पात्रे, घटना आणि त्यांचे परस्परसंबंध व त्यांची गुंतगुंत यामुळे कादंबरी रसभरीत झाली आहे.
श्रोत्री व सदाशिवरावांच्या कुटुंबातील स्वतंत्र संघर्षाचे उपकथानक यात असून कादंबरीचा अनपेक्षित शेवट वाचकाला धक्का देणारा आहे.