पुस्तकाचे नाव 📚 सातपाटील कुलवृत्तांत -
लेखक - रंगनाथ पठारे
सातपाटील घराण्याचा सात शतकांचा कुलवृत्तान्त सांगणारी महाकादंबरी.
आपण कोण, कुठले, आपले पूर्वज कुठून आले, याची उत्सुकता सगळ्यांना असतेच.
त्याच उत्सुकतेने पुर्वजांसाठी तर्पण करायला आलेला नायक आपल्या कुळाचा शोध घेतो.आणि सात शतकांचा कालपट उलगडायला लागतो.
१२८९ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आला तेव्हा या कुळगाथेची सुरुवात होते.
मेंढ्यांच्या सहवासात राहणारा पठारे घराण्यातील श्रीपती बाळाला दुध देण्याच्या निमित्ताने एका सरदारपत्नीचा विश्वासपात्र होतो. अल्लाउद्दीन खिलजीच्या हल्लकोळात तिचा तृतीयपंथी नवरा परागंदा झाल्यावर दोघे तिथुन निघून जातात. त्यानंतर दोनशे वर्षांनी ह्याचा वंशज साहेबराव आपल्याला भेटतो. निजामशाही कालखंडात
बोकाळलेल्या पठाणांच्या अत्याचारात पळवून नेलेल्या गावातील मुलीची सुटका करतांना सात तरुणांनी अफगानी पठाणांच्या टोळीचा बिमोड करण्याच्या पराक्रमामुळे गावची पाटीलकी ह्या सात तरुणांना विभागून मिळते तेव्हापासून ह्या सातजणांपैकी एक असलेला साहेबराव सातपाटील हे नाव धारण करतो. मारलेल्या पठाणापैकी एकाच्या बायकोचा आरेनाचा तिचा मुलगा आरेनसह स्वीकार करुन तो गावगाडा वसवून संसारीक प्रगती करुन आरेनचं लग्न लावून आरेनाच्या इच्छेने सगळं काही आरेनराव सातपाटीलच्या हवाली करून दोघं काबूलला जातात.
सातपाटलांचा घराणं सुरू होतं ते अरेनराव साहेबराव सातपाटील यांच्यापासून अफगान स्त्रीला अफगाण पुरुषापासून झालेल्या मुलापासून. त्याला मराठी टिळा लागला पठारे यांच्या सातपाटील कुळाचा.
त्यानंतरचा वंशज दसरत पानिपतच्या युध्दाच्या वेळी या कालप्रवाहात समोर येतो.
कुळगाथा सांगतांना गुणगौरव करतांना अवगूण सांगण्याचा प्रांजळपणाही या निवेदक नायकाकडे आहे. मुळातच मराठा नायकाची कुळकथा मराठी अफगाणी वंशाच्या एकत्रित आल्याने सुरु झाली.
या कालप्रवाहात बदलत्या काळानुसार वेगवेगळे कर्तबगार नायक जसे आहेत त्याचप्रमाणे नाकर्तेपणामुळे काळीमा फासणारे सुध्दा आहेत.तसेच पडद्याआड राहून सुत्र हलवणाऱ्या खंबीरपणे निर्णय घेणाऱ्या, घराला घरपण देणाऱ्या मातृप्रधान समाजव्यवस्थेची आठवण देणाऱ्या आणि या विपरीत नीती अनिती परंपरांना न जुमानणाऱ्या स्त्रियाही समोर येतात. त्यातली एक तर एका इंग्रज अधिकाऱ्यासोबत पळून गेली.
मुळ पुरुष श्रीपती पासून सुरु झालेला हा कुलवृत्तान्त पैठण पासून सुरु होऊन अफगाणिस्तान, पानिपत, दिल्ली, मुंबई, अगदी इंग्लंडमध्ये फिरवुन सध्या संगमनेमध्ये राहणाऱ्या देवनाथ पर्यंत आणून सोडतो. या सातशे वर्षांच्या इतिहासात देवगिरीच्या साम्राज्यासह निजामशाही, पेशवाई, इंग्रजी सत्तेनंतर आलेला स्वातंत्र्याचा कालखंड असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा उल्लेख नसणे हे खटकणारे वाटते.
कथानकाच्या ओघात कुणबी मराठा, महार जातीचा इतिहास रेखाटतांना महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने फडफडू लागतात.कादंबरीत केलेली महाराष्ट्र आणि मराठी या शब्दाची केलेली उकल, भौगोलिक, सांस्कृतिक जातीय इतिहासासह मराठी भाषा व लिपीचेही इतिहासाचेही अनेक संदर्भासह विवेचन केले आहे.
अफगानी वंशजापासून आपलं कुळ सुरू झालं हे समजून घेतल्यानंतर देवनाथचा कुलाभिमान गळुन पडतो आणि विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात माणसाचे स्थान किती यत्किंचित आहे ह्याचे तात्विक पातळीवर आत्मसंशोधन करु लागतो.