INTERNATIONAL ENCYCLOPEDIA OF LINGUISTICSज्ञानकोश : इंग्रजी

लेखांक १० : INTERNATIONAL ENCYCLOPEDIA OF  LINGUISTICS
ज्ञानकोश : इंग्रजी 

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 



भाषाशास्त्र या विषयावरील अत्यंत महत्त्वाचा ज्ञानकोश

भाषाशास्त्र हा विषय अलीकडच्या काळातील अत्यंत महत्वाचा विषय. महाराष्ट्रभर अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयात भाषाशास्त्र हा विषय शिकविला जातो. परंतु भाषाशास्त्राचे हे शिक्षण अत्यंत मर्यादित स्वरुपात आणि औपचारिक पद्धतीने दिले जाते. 

भाषा,भाषेचीउत्पत्ती,बोली,स्वनीमविचार,रुपिमविचार, वाक्याविचार,ध्वनिविचार या चारपाच विभागातच या अभ्यासक्रम गुंडाळला जातो. भाषाशास्त्राने आता अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वळविले आहे. यांत्रिक भाषांतर वा संगणकीय भाषांतर हा आता अलीकडचा परवलीचा मुद्दा झाला असून, भाषेतील संपर्काचे,संवादाचे आणि संवेदनेचे जे अडथळे मानवाला जाणवत होते ते अडथळे दूर होत जाण्याचा हा काळ आहे.अर्थात भाषाशास्त्रातील भाषांतर आणि संरचनावादी भाषाशास्त्र या विभागातील अनेको संशोधनातून या गोष्टी साध्य होत आहेत.

खरे तर भावनेचे वा संवेदनेचे कधीही यांत्रिक भाषांतर केले जावू शकत नाही. परंतु व्यक्त झालेल्या संवेदनेमागे निर्व्याज शैशवता असेल तर  भाषा समजते. ती अधिक स्पष्टपणे समजते. आजच्या आकडेवारीच्या युगात आपण माहितीचे रकाने भरतो आहोत त्यामुळे भाषांतर आणि त्याअनुषंगाने भाषाशास्त्र हा विषय अभ्यासकात पुढे आला आहे. मराठीमध्ये ना.गो. कालेलकर, श्री. ना.गजेंद्रगडकर, लीला गोविलकर, कल्याण काळे,स्नेहल तावरे अशा अनेक नामवंत लेखकांनी लेखन केले आहे. मात्र मराठी भाषेत भाषाशास्त्र असा स्वतंत्र विषय घेवून त्यावर कोश तयार झालेला नाही.

 International Encyclopedia of Linguistics हा इंग्रजी भाषेतील कोश अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. या कोशामध्ये जगातील ज्या आणि जेवढ्या महत्वाच्या भाषा आहेत, त्या सर्व भाषांचा संशोधकीय परिचय करून देण्यात आला आहे. शिवाय भाषाशास्त्र या विषयातील जे काही उपविभाग आहेत,त्यातील प्रत्येक घटकावर या कोशात नोंदी घेण्यात आल्या आहेत. वंशशास्त्रीय भाषाविज्ञान,उपयोजित भाषाविज्ञान,संगणकीय भाषाविज्ञान,बोली,व्याकरण, ऐतिहासिक भाषाविज्ञान,स्वनविज्ञान, संवेदन भाषाविज्ञान अशा अनेक उपघटकातील विषयांवर या कोशात नोंदी घेतलेल्या आढळतात. 

चार खंडांमध्ये हा कोश विभागाला असून चवथ्या खंडात सूची दिली आहे. सोबत जागतिक भाषांची नोंद घेतलेली स्वतंत्र सूचीही सोबत जोडली आहे. ऑस्कफोर्ड प्रकाशनाने हा कोश १९९२ मध्ये प्रकाशित केला आहे. विलिअम ब्राईट हे या कोशाचे मुख्य संपादक आहेत. जगभरातील मान्यवर अभ्यासकांनी या कोशाच्या लेखनकार्यात योगदान दिले आहे. भारतातील विविध भाषांवर या कोशात नोंदी असून त्या भारतातील  अभ्यासक लेखकांनीच लिहिल्या आहेत. अलीकडे या कोशाची दुसरी आवृत्ती बाजारात विक्रीस उपलब्ध आहे.

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.