शब्दकोश : संस्कृत इंग्रजी

लेखांक 14 : An encyclopaediac dictionary of Sanskrit on historical principle
शब्दकोश : संस्कृत इंग्रजी

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 


संस्कृत शब्दाचा इंग्रजी मध्ये अर्थ देणारा आणि प्रस्तुत शब्दाचा ग्रंथनिहाय संदर्भ देणारा महाशब्दकोश. 

महाराष्ट्राच्या भाषिक आणि कोशशास्त्रीय कार्यामध्ये डेक्कन अभिमत विद्यापीठ,पुणे या संस्थेचा मोठा वाटा आहे. 1948 मध्येच या संस्थेच्या कोशशास्त्र विभागामार्फत An encyclopaediac dictionary of Sanskrit on historical principles या महाशब्दकोशाच्या संपादन कार्याला सुरुवात झाली. कर्नाटक मधील धारवाड येथील सुमित्र मंगेश कत्रे यांच्या संपादनाखाली हे कार्य सुरू झाले होते. 

सुमित्र कत्रे हे भारतातील प्रसिद्ध कोशशास्त्र अभ्यासक. इंडो आर्यन संस्कृती आणि पाणिनीय व्याकरण यावर त्यांचा सखोल अभ्यास होता. संस्कृतमध्ये त्यांनी इतरही अनेक कोशांचे कार्य केले आहे. डॉ. अ.मा. घाटगे यांच्या कार्यकाळात 1976 साली   या शब्दकोशाचा पहिला खंड प्रकाशित झाला.
 या पहिल्या खंडामध्ये विस्तृत अशी संपादकीय प्रस्तावना आली आहे. या प्रस्तावनेत या कोशाचे उद्दिष्ट, रचना, कोशरचनाशास्त्र, संस्कृत साहित्याचा इतिहास यावर सखोल भाष्य करण्यात आले आहे. 


या कोशप्रकल्पासाठी ऋग्वेदसहिंतेपासून अठराव्या शतकातील हास्यागर्व या पुस्तकापर्यंत ६२ विद्याशाखांमधील सुमारे १५०० ग्रंथ , टीकाग्रंथ, संस्कृत भाषेतील कोशांचा आधार घेण्यात आला आहे. या सर्व साधनग्रंथांची यादी पहिल्या खंडात प्रारंभीच दिलेली आहे. मोनियर - विल्यम्स यांच्या संस्कृत-इंग्लिश तसेच राथ आणि बोथलिंक्ग् यांच्या संस्कृत जर्मन कोशापेक्षा या कोशाचा आवाका अफाट आहे. या कोशातून 1.25 लाख शब्दार्थ संग्रहित झाले असून 90 लाख शब्द संदर्भ संशोधकांना उपलब्ध होतात. लाखो शब्द संपादित करण्यात मोठे कष्ट या संपादकांनी केले आहेत. हे शब्द संपादित करण्यासाठी पृष्ठाचा वापर केला गेला. हे पृष्ठ नीट ठेवण्यासाठी धारण्या तयार करण्यात आल्या. या कोशातील शब्दांचा अर्थ देताना विश्लेषणात्मक तसेच ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब केला असून, शब्दांचे प्रथम लिप्यंतर, तसेच व्याकरण दिले जाते. शब्दाचा स्वर, त्याची व्युत्पत्ती, मूलस्रोत याचा विचार करून त्याचे अर्थदृष्ट्या विश्लेषण केले जाते. कोशातील शब्दांच्या अर्थनिश्चीतीसाठी उपलब्ध सर्व कोशांचीही मदत घेतली जाते. विश्लेषण केलेल्या अर्थांमध्ये त्या शब्दाच्या सर्व संदर्भनोंदी त्यांच्या अवतरणांसह, 
पूर्ण संदर्भासह कालक्रमाने देण्यात येतात. सोबत जोडलेल्या चित्रातून ही बाब स्पष्ट होईल. या कोशामुळे संस्कृत भाषेचा सांस्कृतिक इतिहास, भाषाशास्त्रीय घडामोडी यांचा मागोवा घेणे शक्य होते. आजपर्यंत कोशाचे 35 खंड प्रकाशित झाले आहेत. (संदर्भ - मराठी विश्वकोश, प्रज्ञा देशपांडे )

लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.