लेखांक 15 : श्री ज्ञानेश्वरी पदकोश
शब्दकोश : मराठी
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)
ज्ञानेश्वरी या अभिजात ग्रंथातील ओवीनिहाय आलेल्या शब्दांचा आणि पदांचा कोश. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी या कोशाची साधन ग्रंथ म्हणून मोठी उपयुक्तता आहे.
ज्ञानेश्वरीतील शब्द सामर्थ्याच्या निमित्ताने मराठी साहित्य आणि संस्कृतीचा तत्वज्ञान, धर्म, भाषा, लोकजीवन, समाज असा विविध अक्ष असलेला आलेख संस्थापित होतो. हा आलेख या पदकोशातून अधिक ठळकपणे अभ्यासकांच्या लक्षात येतो.
या कोशात शब्दार्थ नाहीत तर, ज्ञानेश्वरीत जो ही शब्द, पद उपसर्ग, प्रत्यय अशा विकारासह आलेला आहे त्या प्रत्येक शब्दाची नोंद त्याच्या अध्याय आणि ओवी क्रमांकासह या कोशात घेतलेली आहे. अनेकदा तज्ञ् लेखक आपल्या मतांसाठी ज्ञानेश्वरीतील ओविचा उल्लेख करतात. वाचकांवर या ओवी संदर्भाचा विशेष प्रभाव पडतो. ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास न करताही अभ्यासकांना हव्या त्या संदर्भाची ओवी या पदकोशातून शोधता येते.
पैल तो गे काऊ कोकताहे ही एक साधी ओळ आहे. यातील काऊ हा शब्द ज्ञानेश्वरांनी आणखी कुठे,कितीवेळ कोणत्या ओवीमध्ये वापराला याचा शोध या पदकोशातून लगेच घेता येतो. असा प्रत्येक अन प्रत्येक शब्द या कोशात अध्याय आणि ओवीक्रमांकासाह संपादित केला आहे.
शिवाजी नरहर भावे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक. वि.का. राजवाडे यांचे सहाध्यायी. साधारणता 1920- 30 नंतर ज्ञानेश्वरीच्या अनेक स्थळप्रतीचा शोध राजवाडे यांनी घेतला. त्यातले पाठभेद लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीचे संपादन करून त्याच्या परिष्कृत प्रती प्रसिद्ध केल्या. या प्रती प्रसिद्ध केल्यानंतर राजवाडे यांच्यासमोर ज्ञानेश्वरीतील शब्दार्थ प्रकट करण्याचे आवाहन होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देत त्याकाळात अनेक निरूपणे, कीर्तने होत असत आणि या ओव्यांचे वेगवेगळे अर्थ दिले जात असत. अर्थाची ही विविध आणि विसंगत मांडणी राजवाडे यांना पटत नसे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीचा तर्कशुद्ध अर्थच प्रकट व्हावा यासाठी राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीचा शब्दार्थकोश तयार करायला घेतला होता. शब्दार्थ कोश तयार करण्यासाठी आधी पदकोश करावा लागतो. त्यासाठी त्यांनी पदकोशाचे कार्य हाती घेतले होते. पण त्यांच्या प्रकृतीस्वास्थामुळे हे कार्य त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. वर्ध्यातील शिवाजी नरहर भावे यांनी या कार्याची जबाबदारी घेतली आणि ज्ञानेश्वरी पदकोश आणि ज्ञानेश्वरी शब्दार्थकोश हे दोन्ही प्रकल्प पूर्ण केले.
प्राचीन मराठी साहित्यातील ओवी, अभंगाचे अर्थान्वयन करणे कठीण कार्य असते. वैदिक संस्कृत साहित्यातही अर्थामधली ही विविधता आढळते. मूलतः हे साहित्य धार्मिक भावनेशी निगडित असल्याने त्यात अर्थ हा विविध पद्धतीने येऊ नये यासाठीही बरेच कार्य केलेले आहे. वक्ता बोलत असताना एखादा ओवीच्या अर्थात संधिग्धता जाणवत असेल तर श्रोता लगेच समोरासमोर वक्त्याला प्रश्न विचारू शकतो. पण ग्रंथानिविष्ट ओव्या वाचताना तिथे अर्थ नीट लागत नसेल तर विचारायचे कुणाला? अशावेळी हे पदकोश उपयोगी पडतात. संस्कृतचे थोर अभ्यासक नारायणशास्त्री मराठे यांनी मीमांसाकोश नावाचा एक संस्कृत पदकोश संपादित केला आहे. संस्कृतसाहित्यात उपयोजित शब्दाचे उपयोजनानुसर तर्कशुद्ध अर्थ या कोशात संपादित करण्यात आले आहेत. भावे यांनी संपादित केलेला हा पदकोश अर्थान्वयासाठी उपयुक्त आहे.
मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे शब्दसामर्थ्य या कोशातून दृष्टीस पडते. देशीकार लेणे असे पद एका ओवीत आहे. यातील लेणे हा शब्द अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर वापरतात. या कोशामुळे प्रसंगानुसार आणि उपयोजनानुसार लेणे शब्दाचे विविध अर्थ लावता येतात. या कोशामुळे लेणे या शब्दाचे ज्ञानेश्वरीतील पूर्ण उपयोजन समोर येते. ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेचा तत्वज्ञान, धर्म, विज्ञान, समाज, उद्योग अशा अनेक विद्यशाखांशी असणारा परिचय या कोशातून लक्षात येतो.
ज्ञानेश्वरांनी अगदी कोवळ्या वयात हे भाष्य आविष्कृत केले आले. ज्ञानेश्वरांची लोकविलक्षण प्रतिभा या कोशातून आपण अनुभवू शकतो.
लेखक - डॉ. जगतानंद भटकर( समीक्षक, संपादक, भारतीय, जागतिक साहित्य)