हिडन मेजरमेंट

पुस्तकाचे नाव -📚 हिडन  मेजरमेंट - 
लेखक - गोविंद काळे




या कादंबरीत धरणाच्या निर्मितीची, धरणग्रस्तांची आणि धरणाच्या निर्मितीनंतर आकाराला आलेल्या नव्या समाजव्यवस्थेची, आर्थिक सुबत्तेची त्यासोबत त्यामुळे आलेल्या नैतिक अधोपतनाची कहाणी आहे.

धरणग्रस्तांना मिळालेल्या मोबदल्याने रातोरात श्रीमंतीने उधळपट्टी करुन खंक झालेले तसेच मिळालेला पैसा कनवटीला झाकून भविष्याची तरतूद करणारेही दिसतात, थोडेसे असले तरीही अशी धोरणी माणसं असतातच. अशाच बळीदादाचा मुलगा अरुण...त्याच्यासोबतच धरणाची मन वेधून घेणारी गोष्ट. छुप्या मोजमापाची, जे सगळ्यांसमोर येत नाही. 

कवी मनाचा एक इंजिनियर अत्यंत सकारात्मक मनोवृत्तीचा.... धरणामुळेच विस्थापित झालेला परंतु वडिलांच्या धोरणीपणाने या वाताहतीची फारशी झळ न लागलेला अरुण धरणाच्या प्रकल्पावर इंजिनिअर म्हणून रुजू होतो. स्वतः चं जगणं धरणाशी जोडून घेतो. प्रेयसीवर असलेलं प्रेम व्यक्त करतांना तो धरणाचीच उपमा देतो. ती सुध्दा त्याच्या आवेगासमोर धरणाची भिंत बनून राहण्याची कबूली देते. दुर्दैवाने त्याची प्रेम कथा असफल राहते. आलेलं नैराश्य बढती मिळाल्यामुळे कमी होतं. परंतु धरणाच्या कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार बघून तो परत निराशेच्या गर्तेत जाऊ लागतो. 

त्याचा मित्र जो स्टोअरकिपर आहे तो त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी ह्या लोकांच्या विरोधात जर तू उभा राहिलास तर तूला हे लोक बदनाम करतील, ही व्यवस्था अशी आहे जो विरोधात जातो तो संपतो.

एका ठेकेदाराने बोलवल्यावर अरुण त्याला भेटायला जात नाही म्हणून त्याची बदली होते, त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपण किती एकाकी आहोत. हळूहळू त्याच्या मनात नौकरी सोडण्याचे विचार येऊ लागतात......

लेखकाने मोठ्या खुबीने नायकाच्या कहाणीसोबत धरणग्रस्तांच्या कथा आणि व्यथा, बाधकामात होणारा भ्रष्टाचार, ठेकेदारांची अरेरावी, तसेच काही प्रामाणिक अधिकारी रंगवले आहे. लेखक स्वतः ह्याच क्षेत्रात काम करीत होते. त्यामुळे अगदी सहजतेने वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या छटा मन वेधून घेतात. तसेच काही तांत्रिक बाबी सोप्या पद्धतीने समजतात.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.