📚आईस स्टेशन झेब्रा
लेखक - ऍलिस्टर मॅक्लिन
अनुवाद अनिल काळे
दुसऱ्या महायुद्धात युध्दनौकेवर काम केलेले नौदल अधिकारी ऍलिस्टर मॅक्लिन ह्यांचा प्रत्यक्ष युध्दाचा अनुभव त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यात प्रतिबिंबित होत असल्याने एक वास्तव पातळीवरचा थरार वाचकांना अनुभवण्यास मिळतो. शीतयुद्ध काळातील गुप्तहेर कथांना आजही जगभरात मागणी होत असते.
आइस स्टेशन झेब्रा ही अशीच थरार कथा आहे.
उत्तर ध्रुवावर हवामानाचा अभ्यास करणाऱ्या आइस स्टेशन झेब्रा या संशोधक केंद्रावरून वरुन आग लागल्यामुळे संकटात असल्याचा संदेश मिळाल्यावर शोध मोहीम राबवली जाते पण प्रतिकुल हवामानामुळे विमान तिथपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे अमेरिकन नौदलाची अणुउर्जेवर चालणारी डाॅल्फीन ही पाणबुडी ह्या कामगिरीवर निघते.
आर्क्टिक महासागरातल्या बर्फाच्या आवरणाखालून प्रवास करीत जायचं आणि बर्फावरच बांधलेलं आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेला कुठेतरी बर्फावर तरंगत भरकटत असलेलं पण आगीत जळून खाक झालेलं आईस स्टेशन हे हवामान अभ्यास केंद्र शोधून काढून तिथे अडकल्या लोकांना वाचवायचं. तिथे कोणीही जिवंत असण्याची शक्यता तशी कमी होती. निघण्याच्या काही वेळ अगोदर डॉ. कार्पेंटर हा अनेक खटपटी करून पाणबुडीवर दाखल होतो. त्याला सगळ्या प्रकारची मदत करण्याचे उच्च स्तरावरील आदेश कॅप्टनला देण्यात येतात. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे.
डाॅल्फीन अणु पाणबुडी निघते जीवघेण्या मोहीमेवर, रस्त्यात येणाऱ्या अडीअडचणी व अनपेक्षित संकटावर मात करीत.
आईस स्टेशन झेब्रा वरील मृत पावलेल्या काही जणांना गोळ्या घालून मारलेलं असतं तर एकच्या मृतदेहात तुटलेला सुरा आढळतो.
हे कोणी केलं..? आणि कशासाठी...?
स्वतः नौदल अधिकारी असल्यामुळे अणुपाणबुडीचे वर्णन वाचतांना आपणही तिथे असल्याचा भास होतो. प्रथम पुरुषी आकर्षक खिळवून ठेवणाऱ्या निवेदन शैलीमुळे वाचकही स्वतः या मोहीमेत गुंतत जातो.
अनिल काळे ह्यांनी केलेला अनुवाद नेहमीप्रमाणेच इतका छान झालाय की पात्रांची नावे सोडली तर आपण मुळ पुस्तक वाचतोय असच वाटत राहतं.
एकंदरीत खिळवून ठेवणारी, श्वास रोखायला लावणारी, पाणबुडीच्या प्रवासाचा व ध्रुवीय प्रदेशाच्या गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव देणारी, उत्कृष्ट थरारकथा !