पुस्तकाचे नाव - 📚 जॅकपॉट
लेखक - युवराज खलाटे
या कथासंग्रहातील कथा हळव्या वाटत असल्या तरीही ग्रामीण चालीरीती, शेती माती, गावात चालणारं राजकारण ह्याच्याशी निगडित आहेत.
साधीभोळी वाटणारी माणसं अकस्मात येणाऱ्या संकटाला खंबीरपणे तोंड देताना दिसतात. ही सगळी आपल्या आसपासची वेगवेगळ्या कथेतून समोर येतात. शहरात मजुरी करणारा संतू यादव कोविड काळात पायपीट करीत गावी आल्यावर जेव्हा सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागा होतो तेव्हा त्याला शहरात दुरापास्त झालेल्या शांतीची जाणीव होते. स्वभावाने साधाभोळा असलेला दहीगावचा परशुदादा सालगड्याला पैसे देतांना सावध होऊन कसा स्वतःला वाचवतो, गावचं पुढारीपण मिळवण्यासाठी भिमानाना तमाशाला कमी पडणारे पैसे स्वतः कर्ज काढून भरतो. नंतर त्याच बाईच्या नादात वाहवत जातो. अवैध रेती वाहणारे तहसीलदारालाही टोपी लावतात. गावातल्या टारगट मुले धान्य चोरी करतांना पकडले गेल्यानंतर भरपाई घेऊन माफ करणारे अस्सल ग्रामीण औदार्य ही दिसते.
निरा नदीचा काठ ही कथा म्हणजे काळाच्या ओघात मागे पडलेल्या क्षणांना कुरवाळतांना गावखेड्याचे आधुनिकीकरण होतांना विरळ होणाऱ्या माणुसकीची खंत व्यक्त करते.
लेखक स्वतः उच्च शिक्षित असुनही नौकरीच्या मागे न लागता गावातच शेती करीत चरितार्थ करीत असल्याने समृद्ध अनुभवाची शिदोरी वाचकाला तृप्त करते.