( २ आक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )
उत्कट कथनेच्छा हा गांधीजींच्या गुजराती व इंग्रजी लेखनाचा प्रमुख हेतू असल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी आणि साहित्यगुणांनी युक्त ठरले आहे. साहित्यात भाषेची स्वाभाविकता व हृदयाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी बाराव्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले.
सत्यना प्रयोगो अथवा आत्मकथा (१९२७) हे त्यांचे विश्वविख्यात आत्मचरित्र म्हणजे आत्मचरित्रलेखनाचा एक चांगला नमुना होय. ह्या आत्मचरित्राची आजवर अनेक देशी आणि विदेशी भाषांत भाषांतरे झालेली आहेत. गुजराती गद्याला त्यामुळे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. गुजराती भाषेचा पहिला प्रमाणभूत शब्दकोश (जोडणीकोश ) तयार करून त्यानी अशुद्ध लेखनाच्या अराजकतेपासून गुजराती भाषेला वाचविले. इतकेच नव्हे, तर गुजराती भाषा-साहित्याचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या सहका ऱ्यांच्या मदतीने अहमदाबाद येथे गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाचीही स्थापना केली (१९२०). गांधीजींचा गुजराती भाषा-साहित्यावरील प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळेच गुजराती साहित्याच्या इतिहासात ‘गांधी युग’ असा स्वतंत्र कालखंड मानला जातो. काकासाहेब कालेलकर, महादेवभाई देसाई, किशोरीलाल मश्रुवाला इ. थोर साहित्यिक त्यांच्या प्रभावातूनच निर्माण झाले. गांधीजींनी जीवनाभिमुख साहित्याचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी प्रभावित होऊन सुंदरम्, उमाशंकर जोशी, मेघाणी, धूमकेतू, रमणलाल देसाई इ. साहित्यिकांनी कथा, काव्य, कादंबरी इ. प्रकारांतील उत्तम साहित्यनिर्मिती करून ह्या मूल्यांचे संवर्धन केले.
गांधीजींनी नियतकालिकांतून केलेले वैचारिक लेखन प्रासंगिक असून ते धर्म, नीती, समाज, शिक्षण, राजकारण, अर्थशास्त्र, आरोग्य इ. विषयांवर आहे. त्यांचा पत्रव्यवहारही विस्तृत व विविधविषयस्पर्शी आहे. त्यांचे हे सर्व लेखन व पत्रव्यवहार मंगल प्रभात (१९३०), धर्ममंथन, बापूना पत्रो (११ भागांत, १९४९ ते १९७२) इ. ग्रंथांतून संगृहीत आहे. त्यांच्या लेखांतील व पत्रांतील भाषा साधी, सरळ व स्वाभाविक आहे. सर्वसामान्य माणसालाही आपला आशय स्पष्ट व्हावयास हवा, असा त्यांचा कटाक्ष व आग्रह असे.
त्यांचे महत्त्वाचे इतर ग्रंथ दक्षिण आफ्रिकाना सत्याग्रहनो इतिहास (१९२४), नातिनाशने मार्गे (१९२७), त्यागमूर्ति अने बीजा लेखो (१९३०), गांधीजीनी आखरी हाकल (१९४२), आरोग्यनी चावी (१९४८), मूरखराज (१९६४) हे होत. ( संदर्भ मराठी विश्वकोश)