📚पुस्तकाचे नाव - गाॅडफादर्स ऑफ क्राईम -
लेखिका - शिला रावल
शीला रावल ह्या इंडिया टुडे नंतर एबीपी न्युज च्या पत्रकार.
२००५ ला दुबईत दाउद इब्राहिमच्या मुलीचं क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या मुलाचं लग्न झालं त्या समारंभात उपस्थित एकमेव पत्रकार.
ह्या पुस्तकात दाउद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, आश्विन नाईक, अरुण गवळी, इक्बाल कासकर, छोटा राजन, संतोष शेट्टी अशा गुन्हेगारी जगतातील व्यक्तीचित्रे आहेत.
दाउद इब्राहिमने मुंबई बाॅम्ब स्फोटातील सहभाग नाकारुन आय एस आय ने माझं नेटवर्क वापरुन हे घडवून आणले म्हणतो परंतु झालेला तपास त्याला खलनायक ठरवतो. पाकिस्तानी आय एस आय व्यतिरिक्त त्याचे खबरे अनेक देशांतील गुप्तहेर संस्थेत असून आय एस आय दाउद च्या बरोबर अंमली पदार्थाच्या व्यापारात सहभागी आहे. भुरटा चोर, मवाली असं म्हटलं म्हणून न्युज ऍंकरवर भडकलेल्या छोटा शकिलला अंडरवर्ल्ड डाॅन म्हटलं तर हरकत नसायची. बहुतेक पत्रकारांच्या संपर्कात असायचा, ये जुम्मे के जुम्मे दाउद शकिलकी फिल्म बनती है, न्युज चॅनलकी टीआरपी भी भाईसे चलती है असं म्हणायचा. दाउदचा भाऊ इक्बाल कासकर भारतात आल्यावर त्याच्यावर खटला चालला नंतर तो सुटला ह्या विषयी थोरामोठ्यांशी केलंलं डिल होतं का.. यावर छोटा शकीलने थातूरमातूर उत्तर दिलं होतं. समाजवादी पार्टीतर्फे निवडणूकीत तो उभा राहणार होता. लंडनमध्ये राहणाऱ्या इकबाल मिरचीची मुलाखत घेण्यासाठी लेखिका लंडनला गेल्या होत्या. त्याचा दाउदशी संबंध नव्हता. पोलिसांना खंडणी दिली नाही म्हणून त्याचं नाव गोवलं. नंतर कोर्टात वगळलं गेलं. भारताने त्याची प्रत्यार्पणाची केलेली मागणी ब्रिटिश सरकारने नाकारली होती. अबू सालेमच्या प्रत्यार्पणात मात्र यश मिळालं. मुंबई बाॅम्ब स्फोटानंतर पळून गेलेला, नंतर दाउद पासून वेगळा झालेला, तुरुंगात सुध्दा आपल्या व्यवस्थित दिसण्याची काळजी घेणारा सिनेमाचा शौकीन. सिने अभिनेत्री मोनिका बेदीचा प्रेमी. हिच्या पासपोर्टवर फौजिया उस्मान हे नाव होतं. त्याच्या पहिल्या बायकोची मुलाखत लेखिकेने अमेरीकेत घेतली होती. सिनेनिर्माते भरत शहाने खंडणी देण्याप्रकरणी लेखिकेला कोर्टात सरकार पक्षाकडून साक्ष द्यावी लागली. पोलिसांनी छोटा शकीलशी झालेल्या फोन संभाषणाचे रेकाॅर्डींग न्युज चॅनेलच्या ऑफीसमधून जप्त केले होते. छोटा राजन आणि दाउद अगोदर जीवलग मित्र नंतर कट्टर शत्रू झाले. बॅंकाॅकमध्ये जीवघेण्या हल्ल्यातून वाचलेल्या छोटा राजनने हाॅस्पिटलमधून केलेले पलायन.
नक्की कोणत्या प्रकारचे गुन्हे केले..कशी आली ही माणसं गुन्हेगारी जगतात.. त्यातील काही जणांना परदेशात का पळून जावं लागलं.. पोलिसांची, न्यायालयाची, प्रसारमाध्यमांची काय भूमिका आहे त्यांच्याबाबतीत ह्याच सोबत गुन्हेगारी जगतातील कुख्यात खलनायकांची गुन्हेगारी, कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी उलगडण्याचा हा प्रयत्न समक्ष मुलाखत, त्यांच्याशी फोनवर झालेलं संभाषण ह्यातून केला आहे.