लेखक - ब्लादिमीर बोगोमोलोव
अनुवाद - अनिल हवालदार
सत्ताधाऱ्यांच्या साम्राज्यवादी महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी युध्द होतात. यध्दे अगदी निर्दयी असतात. कोणाचीही गय करीत नाही. ना मरणाऱ्या सैनिकांची, ना सामान्य जनतेची..कोणाचीही..!
सर्वसामान्य जनतेतून काही असामान्य माणसे देशप्रेमापायी आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी प्राणाची पर्वा न करता पुढे येतात... नायक बनून..!. ह्यात काही मुलेही असतात. ज्याचं जगणं या युध्दामुळे काळवंडून गेलेलं असतं.
अशाच एका बारा वर्षाच्या रशियन मुलाची ही गोष्ट. एका रशियन बटालियनच्या कंमांडरने सांगीतलेली. इतिहासाचं एक पान असलेली !
छावणीच्या पहारेकऱ्यांनी रात्रीच्या अंधारातून नदीतून पोहोत आलेल्या त्या मुलाला कमांडर समोर उभे केले तेव्हा तो थंडीने कुडकुडत होता. शेकोटीपाशी उभं करून त्याची चौकशी करु लागले तेव्हा त्याने न घाबरता सैन्य दलातील उच्च अधिकाऱ्यांना मी इथे आहे हे कळवायला सांगितले. बाकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नव्हता. त्याने ज्या अधिकाऱ्यांचे नाव सांगीतले त्यांना हे कळवल्यावर कमांडरला सूचनांच्या भडीमारासह त्याची व्यवस्थित काळजी घेण्याचा हुकूम मिळाल्यावर कमांडर थक्क झाला.
रशियन हेर खात्यातील सगळेच जण त्याच्यावर खुप प्रेम करायचे. तो परत येईपर्यंत सगळ्यांचेच जीव टांगणीला लागलेले असायचे.
इवान, बारा वर्षाचा मुलगा, नागरी वस्तीवर झालेल्या बाॅम्ब वर्षावात त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली होती. तेव्हापासून तो जर्मनांचा तिरस्कार करु लागला होता. जर्मन तळावरची माहिती रशियन सैन्याला देऊ लागला. आत्ताही त्याने नदीपलीकडे असलेल्या जर्मन सैन्याची माहिती आणली होती. तो लहान असल्यामुळे आणि अगदीच दरिद्री दिसत असल्याने कोणालाही त्याचा संशय न येता त्याचं काम सोपं व्हायचं.
हेर खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पुढच्या कामगीरीवर गेल्यानंतर कमांडरला अनेक वर्षांनी इवान परत भेटला, युध्द संपल्यानंतर जर्मनांकडून जप्त केलेल्या कागदपत्रातून. त्याला गोळ्या घालून मारलं होतं.
दुसऱ्या महायुद्धात घडलेली ही एक सत्यकथा.