शार्लटन्स

पुस्तकाचे नाव - 📚 शार्लटन्स - 
लेखक - राॅबिन कुक 
अनुवाद - उज्वला गोखले




शार्लटन हा शब्द सोळाव्या शतकातल्या फ्रेंच भाषेतून आला. ह्याचा अर्थ भोंदू वैद्य. पुढे सगळ्याच प्रकारच्या तोतयांना ही उपाधी लागू झाली.

अत्याधुनिक अशा बोस्टन मेमोरियल हाॅस्पिटलमधे नेहमीच शत्रक्रियांची धावपळ असायची. चोवीस ऑपरेशन थिएटरमध्ये काही डाॅक्टरांच्या एकाच वेळी दोन  तीन ऑपरेशन असायचे. अशातच ऑपरेशन चालू असतांना काही दिवसांच्या अंतराने गुंतागुंत होऊन तीन रुग्ण दगावले. तीनही वेळी 
अ‍ॅनेस्थेसियॉलॉजिस्ट एवा लंडन होती. सर्जन डॉ.मॅसनच्या मते भूल देतांना झालेल्या चुकीमुळे गुंतागुंत होऊन पेशंट दगावला असण्याची शक्यता होती. डॉ मॅसन एवाचा द्वेष करायचे. त्यांना तिला इथून घालवायचं होतं.पुर्वी कधीतरी त्यांनी केलेल्या प्रणयराधनेला तिने ठोकरलं होतं त्याचा वचपा काढायचा होता. 
त्या हाॅस्पिटलमध्ये दर आठवड्याला मिटिंग व्हायची तिथे अशा गुंतागुंत झालेल्या अयशस्वी केसची चर्चा व्हायची. कुठे काय चुकलं याचं विश्लेषण व्हायचं. अशा वेळी वरिष्ठ डाॅक्टर नेहमीच अपयशाचं खापर आपल्या नावडत्या सहकाऱ्यांवर फोडून त्यांच्या कारकिर्दीचा खेळखंडोबा करायचे. 

रेसिडेंट सर्जन नोहा रोथॅजर  अ‍ॅनेस्थेसियॉलॉजिस्ट एवा लंडनवर कोणताही ठपका येऊ देत नाही. त्यामुळे तो ही आता डोळ्यात खुपू लागला होता. ह्या दोघांची चांगली मैत्री होती. त्याने काही रात्री एवासोबत घालवल्या होता. 

असं असुनही त्याला तिच्याबाबतीत काहीतरी खटकत होतं. मधेच केव्हातरी ती एक दोन दिवसांसाठी गायब व्हायची. कोणालाही काहीही न सांगता. एव्हाचं उच्च श्रीमंती राहणीमान, समाजमाध्यमांचा ती नाव बदलून करीत असलेला वापर बघून नोहाला नेहमीच प्रश्न पडलेला असतो. तिच्या अपरोक्ष तिचा काॅम्प्युटर हाताळण्यावरुन दोघांमध्ये वाद होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. तिच्या बाबत आलेल्या संशयाने तो एका खाजगी गुप्तहेराला तपास करण्यासाठी नेमतो तेव्हाच त्याला समजते की आपलाही पाठलाग होतो आहे. त्याचवेळी  त्याला फसवणुकीच्या आरोपावरून हाॅस्पिटलमधून काढलं जातं. तो विमनस्क अवस्थेत असतानाच त्याने नेमलेल्या गुप्तहेराचा खुन होतो. आता तोच सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यायचे ठरवतो....
एव्हा ज्या शाळेत शिकली होती तिथे तपास करताना त्याला मिळालेल्या माहितीनुसार एव्हाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यावर वर्षभरातच एव्हाने सुध्दा आत्महत्या केली होती. मग ही एवा कोण..? 

ह्या रहस्य कथेच्या पार्श्वभूमीवर लेखकाने एका मोठ्या समस्येला हात घातला आहे तो वैद्यकीय पदवीचा. पदवी मिळवतांना केलेल्या गडबडीचा.

वैद्यकीय व्यवसायातले कुडमुडे ही एक चिरंतन समस्या आहे. अशी अनेक कुप्रसिद्ध उदाहरणं आहेत की, जिथे या भोंदूंनी एखाद्या परगावी प्रॅक्टिस करणार्‍या किंवा चक्क मरण पावलेल्या खर्‍या डॉक्टरचं सोंग वठवून ‘उपचार’ केले. परिणामी, तो रोगी जिवाला मुकला आणि तरीही ही माणसं या खुनातून सहीसलामत सुटली.

लेखक स्वतः डाॅक्टर असल्याने वैद्यकीय वातावरण बारीक सारीक तपशिलांसह समर्थ पणे प्रतिबिंबित होते. शिवाय वरिष्ठ तज्ञ डाॅक्टरांची अरेरावी, त्यांच्या गर्विष्ठ पणाने ज्युनियर्सची ससेहोलपट, आपल्या हातून झालेल्या लहानमोठ्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडून स्वतः नामनिराळं राहणं, त्यांच्यासमोर व्यवस्थापन मंडळाची आगतिकता ह्या सगळ्याचे उत्कृष्ट रेखाटन झाले आहे. 

रहस्यमय कथानकाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत गुंतागुंतीच्या जीवघेण्या समस्येला लेखकाने वाचा फोडली आहे. 
प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाने एखादा सुशिक्षित डॉक्टर आणि इंटरनेटवरील माहिती घेऊन निर्माण होणारा पढत पंडित, यांच्यातली मूलभूत ज्ञान आणि तद्नुषंगिक माहिती याच्याशी संबंधित अंतर भराभर कमी होईल. परिणामी, खरा डॉक्टर आणि कुडमुडा यातला फरक ओळखणं अवघड होत जाईल. आता इंटरनेटवर कुठलंही विशेष ज्ञान सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे समस्येचं गांभीर्य वाढतं. व्हर्च्युअल ट्रेनिंग प्रोग्रॅम्सची क्षमता आणि खर्‍या केसेसच्या तोंडात मारतील अशा अत्याधुनिक सिम्युलेशन सिस्टिम्स आणि कॉम्प्यूटराइझ्ड रुग्ण बाहुल्या, यांच्या मिलाफामुळे ब्रह्यांड खुलं झालंय.

शार्लटन ओळखता येणं खूप अवघड झालयं  ! 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.