पुस्तकाचे नाव - 📚 मी फुलनदेवी
शब्दांकन - मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली
अनुवाद - प्रमोद जोगळेकर
या पुस्तकामधून आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा समोर दिसतो. जातिव्यवस्था, गरिबी, उच-नीच, भेदभाव, स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, यौनशोषण, बालविवाह, कर्मठपणा, अज्ञान, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, हुंडा, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांवर हे पुस्तक भाष्य करतं. एका साध्यासुध्या घरातली, शेतात काम करणारी मुलगी हातामध्ये बंदूक घेण्यासाठी का प्रवृत्त होते? या गोष्टीला समाजसुद्धा जबाबदार नाही का? असे अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना पडतात.
फुलनचं बालपण तसं अभावग्रस्त होतं. तिच्या वडिलाची सारी शेतजमीन त्यांच्याच सख्या भावानं कपटानं घेतली होती. तो त्यांना नेहमी धमक्या देत असे. तो नेहमी फुलन व तिच्या बहिणीला मारत असे. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे.
अवघ्या अकराव्या वर्षी तिचं लग्न तिच्या बापाच्या वयाच्या माणसाशी झाला, त्यानेही वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. यौनशोषण केलं. मानसिक, शारिरीक छळ केला. तो तिला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळालीसुद्धा. दुसरी बाई घरात आणल्यावर गावातल्या लोकांच्या दबावामुळे तो फुलनला तिच्या गावाच्या वेशीवर सोडून पळून गेला.
फुलन तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता सवर्ण गावकरी तिचा छळ करू लागले. ‘नवरा सोडून आलेली रांड’ म्हणून तिला हिनवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले.ह्यात आघाडीवर होता तिचा चुलतभाऊ.
ह्या छळवादाकडे दुर्लक्ष करून ती बापाला कामात मदत करु लागली. कोणी मजूरी द्यायला टाळाटाळ केली की त्यांची जनावरे घेऊन जाऊ लागली. आता तिचा घाबरटपणा कमी होऊ लागला होता. एवढ्याशा आयुष्यात इतकी भयंकर दहशत अनुभवली होती आता कशाचीही भिती वाटेनाशी झाली. फार झालं तर चाबकाने फोडून काढतील इतकच ना... ते तर अनेकदा सहन केलयं.....
हळूहळू संतापाची आग पेट घेऊ लागली. एकदा तिने सरपंचाच्या घरचं काम फुकट करण्याचं नाकारलं.
एका खालच्या जातीतल्या मुलीकडून हे अपेक्षित नव्हतं. नवऱ्याने टाकून दिलेली मुलगी गावाला काळीमा आहे. तिला शिक्षा झालीच पाहिजे.... सरपंचाच्या मुलाने तिच्या आई वडिलांसमोर तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या गावातील एका मोठ्या व्यक्तीची मदत मागितल्यावर तिला डाकू ठरवून पोलिसांच्या हवाली केले. तपासाच्या नावाखाली त्यांनीही तिचा चोळामाळा केला. हे कोणाला सांगीतलं तर तुझ्या घरच्या लोकांना मारुन टाकू ही धमकी..!
तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. आत्महत्या करावीशी वाटू लागली. तिला या यातना देण्यात तिच्या सख्ख्या चुलतभावाचा ही सहभाग होता.
कोर्टाने जामीन दिल्यावर गावी आल्यावर तिचे भोग संपले नव्हते. तिच्या वडीलांना कोणी काम देईना. विहीरीवर पाणी भरु देईना. दुसऱ्या गावातील सवर्ण ठाकूरने परत तिच्यावर बलात्कार केला. जणुकाही ती उच्च वर्गातील ठाकुरांची भोगदासी होती.
गमवण्यासारखं काही राहिलं नव्हत , आता ह्या पलीकडे अजून काय सहन करावं लागणार.. सहनशक्तीच्या सगळ्या मऱ्यादा ओलांडलेल्या फुलनचा बंखोरपणा उफळून यायला लागला. तिला छळणाऱ्यांशी ती भांडू लागली. मारु लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं ही लोकं भित्री आहेत. ती सरपंचाच्या घरी जाऊन त्यांना धमकावून आली तेव्हा सरपंचाने एका डाकूंच्या टोळीला तिला मारण्यासाठी सुपारी दिली. त्या
डाकूंच्या टोळीने तिला पळवून नेलं. त्या टोळीतही दोन गट होते. एका गटाचा म्होरक्या तिच्या जातीतला होता. त्याने तिचं फक्त रक्षण केलं नाही तर तिच्याशी लग्नही केलं. टोळीत सामील झाल्यावर पहिला बदला घेतला तिच्या नवऱ्याचा. अकराव्या वर्षी तिच्या गुप्तांगात सुरी घालणाऱ्या विकृत माणसाचा.
त्यानंतरचे काही महिने पोलिसांशी लपंडाव खेळत, गोरगरिबांना, खालच्या जातीतील लोकांना मदत करीत गेले. कष्टप्रद होते पण टोळीतील सहकार्यांच्या सोबतीत गोरगरीबांचा आशिर्वाद घेत गेले. डाकूंच्या टोळी युध्दात तिचा नवरा मारला गेल्यावर तिची परत फरफट सुरू झाली. ठाकुरांनी विवस्त्र धिंड काढून सामुदायिक बलात्कार केले. तिला कोंडून ठेवलेलं असतांना ती पळून गेली. तिच्या पलायनाला मदत करणार्या ब्राम्हणाला जीवंत जाळण्यात आले.
आता तिने तिची स्वत:ची टोळी बनवली. बदल्याच्या भावनेने पेटलेल्या फुलनने हैदास घातला. ठाकूरांच्या हवेल्या लुटल्या. पैशा अभावी रखडलेल्या मुलींना भरघोस आर्थिक मदत केली. स्रीयांवर अत्याचार करणाऱ्यांचे लिंग कापून काढले. जनतेची लुटमार करणाऱ्यांकडून खंडण्या गोळा केल्या. दिल्या नाही त्यांना गोळ्या घातल्या.( बेहमयी ह्या गावात फुलनदेवीने केलेल्या हत्याकाडाने तत्कालीन मुख्यमंत्री व्ही पी सिंगाना राजिनामा द्यावा लागला.)तिच्या या धुमाकुळीने सरकारने तिला पकडण्यासाठी खास मोहीमा राबवल्या. तिच्यासाठी एक लाखाचं इनाम घोषित केले. अनेकदा पोलिसांशी चकमक झाली. तिचे साथीदार मरत होते. ती मरता मरता वाचत होती. सरकारने काही मध्यस्थांमार्फत शरणगतीचा प्रस्ताव ठेवला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पुढाकार घेतल्यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग समोर अखेर फुलनदेवीने आत्मसमर्पण केले. इथेही सरकारने काही अटी पाळल्या नाही. तिचा खटला उभा राहिलाच नाही. आकरा वर्षांनी उत्तरप्रदेश सरकारने तिच्यावरचे सगळे आरोप घेतल्यावर ती तूरूंगाच्या बाहेर आली.
फुलनदेवीची पुस्तकातली कहाणी इथे संपते.
१९७६ ते १९८३ या काळात चंबळच्या खोऱ्यात फुलनचं राज्य होतं, दहशत होती. फुलनचा बालपणापासून ते शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू इथपर्यंतचा प्रवास काळीज चिरणारा आहे. तो वाचताना आपण थरारून, थिजून जातो.
पण त्यानंतर फुलनच्या आयुष्यात मोठा बदल झाला. ती १९९६ साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत गेली. १९९९ साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून आली. २५ जुलै २००१ रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली गेली.