पुस्तकाचे नाव - 📚 कामेरु
लेखक - श्री. ना. पेंडसे
एका कोकणी माणसाच्या नाट्यमय घडामोडींची गुंतागुंत उलगडणारी ही कादंबरी मनाला चटका लावून जाते.
कोकणात सुरू झालेले हे कथानक पुढे मुंबईत येऊन स्थिरावते.
कोकणातल्या गुळपेंडी गावात पुजाऱ्याच्या घरात जन्मलेला दत्त्या. दिसायला अगदीच आडदांड, पाप पुण्याच्या भावनांना पायदळी तुडवणारा. पाप केल्याशिवाय कोणीही मोठं होत नाही. उघडं झालं तरच ते पाप तोपर्यंत सगळेच प्रतिष्ठीत पुण्यवान या विचाराचा. बेरड बेदरकार, एवढ्या तेवढ्या कारणावरून हातघाईवर येणारा, मुस्लिम वस्तीत जाऊन मारामाऱ्या करणारा. आणि परोपकारी सुध्दा. अडल्या नाडल्याला मदत करणारा. त्याच्या बापात आणि चुलत्यात भाऊबंदकी इतकी कडवट की नेहमीच कोर्टकचेरीची भाषा. ह्या उलट दत्या आणि त्याचा नेभळट चुलतभाऊ औंध्या जवळचे मित्र. औंध्याला त्रास देणाऱ्याला दत्त्या तुडवून काढणार हे ठरलेलं. लकमी घरातलं वरकाम करणारी तरुण मुलगी तिचा नवरा शहरात कामाला असतांना ती दत्त्यासह चंदरशी संबंध ठेऊन असते. वकीली करणारे भय्यासाहेब त्याला मुंबईत बोलवतात. त्यांच्या ओळखीने तो औंध्याला मुंबईत एका मंदिरात पुजाऱ्याचं काम मिळवून देतो. मुंबईला जाण्याचे पैसे ऊभे करण्यासाठी चोरीही करतो.
लकमीची मासिक पाळी चुकल्यावर ती दत्त्याच्या घरी येते आणि एकच कल्लोळ उठतो. होणारं मुल कोणाचं? चंदर भेटला नाही म्हणून ती दत्त्याकडे आलेली असते. काही वेळाने चंदर तिला घेऊन जातो. पण बदनाम झालेला दत्त्या गाव सोडून मुंबईला औंध्याकडे निघून जातो. आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते.
भैय्यासाहेब वकीलांच्या ओळखीने तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाकडे गौडरकडे नौकरीला लागतो. गौडरला त्याच्या भावांनी वडिलोपार्जित संपत्तीतून फसवून बेदखल करुन वर कर्ज बोकांडी मारलेलं असतं. त्याला कारण त्याचा बाहेरख्याली पणा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील मोर्चात तो माथेफिरू जमावापासून गौडरचे ऑफीस गोडावून वाचवतांना खूप जखमी होतो. तेव्हापासून तो गौडरचा खास मित्र होतो. नंतर धंद्यातला भागीदारी होतो, चांगला पैसा मिळवू लागतो. दत्त्या, दत्तोबा दत्ता साहेब असं होत लग्नानंतर तो दद्दा होतो. एका तरुण विधवेशी लग्न झाल्यावर त्याचा कोंडमारा होवू लागतो. दिवसभर ती आदर्श गृहिणी सारखी वागत असते मात्र रात्री ती तिच्या अगोदरच्या नवऱ्याला विसरू शकत नाही. त्यामुळे ती समरस होऊ शकत नाही. या अवघडलेल्या अव्यक्त भावनांचं वर्णन विस्तृत पण अत्यंत संयत पध्दतीने मांडलेले आहे.
पुढे त्यांना मुलगी होते. मोठी झाल्यावर ती समाजसेविका होते. तिचा डाॅक्टर पतीही तिला साथ देतो.
आणि अशातच गुळपेडीतल्या लकमीच्या मुलाला तो मुंबईला आणतो. पुढे त्याच्यामुळे मुलीच्या वैवाहिक आयुष्यात मोठ वादळ उठतं. तो पर्यंत दत्त्या खुप मोठा माणूस झालेला असतो. सरकारातल्या मंत्र्यांसोबत उठबस करणारा....पाप उघडं पडलं तोच पापी. हे तत्वज्ञान आयुष्यभर जपणारा... शेवटी तो सुध्दा समाजाच्या नजरेत पापी ठरतो.
या कादंबरीत अनेक पात्रं रेखाटलेली आहेत. नातेसंबंधांचं जाळं उभारण्यात आलं आहे. यात व्यक्तिचित्रणाचा कस लागलेला आहे.
कोकणाचे निसर्गसौंदर्य तिथली माणसं ज्यांचं वर्णन ही श्री ना पेंडसेंची खासियत आहे.
त्याचसोबत मुंबईत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळची परिस्थितीचे वर्णणसुध्दा त्याच ताकदीने रेखाटले आहे.
दत्त्याचा दद्दा होण्याच्या प्रवाहात प्रेम, द्वेष, प्रामाणिकपणा, फसवणूक अशा सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर वर खाली होणारे ह्याचे मनोवधक चित्रण आहे जे वाचकांना गुंतवून ठेवते