मर्मभेद

पुस्तकाचे नाव मर्मभेद
लेखक - शशी भागवत
प्रकाशक - शिवराय प्रकाशन





अद्भुत कथा प्रकार सगळ्यांनाच पेलवतो असे नाही. म्हणूनच नाथमाधव, गो ना दातारशास्री ह्यांच्यानतर हा प्रकार लिहिणारे लेखक अत्यंत क्वचित, जवळपास नाहीच. रहस्य किंवा गुढ कथेत असा अद्भुत पणा आणायच्या नादात मुळ कथा हास्यास्पद होण्याचा संभव जास्त असतो. 
शशी भागवत ह्यांनी हा साहित्यातील नवरसांनी युक्त असा अद्भुत कथा प्रकार समर्थपणे पेलला असे पु ल देशपांडे प्रस्तावनेत म्हणतात. 

दिड दोन हजार वर्षांपूर्वी चा कालखंड, सुर्यप्रस्थ ह्या साम्राज्यातील प्रजाहितदक्ष सम्राट, त्यांच्या मंत्रीमंडळातील सरदार रुंडकेतू, सरदार सत्यपाल हे स्वामिनिष्ठ तर राज्यलालसा धरणारा पाताळयंत्री कृष्णांत. काही सम्राटाला देवस्थानी मानणारे, तर काही सम्राट बनण्याची अपेक्षा बाळगणारे. 

अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या सम्राट चंद्रकेतू महाराजांचा अकस्मात देहांत होतो. ही योजना कृष्णांताचीच असते. त्या दृष्टीने कृष्णांत राजवैद्याकडून औषधोपचार करवून घेत होता. त्याची योजना अपेक्षित कालावधी अगोदर यशस्वी 
झाल्यावर वरिष्ठ मंत्री कृष्णांत राज्याची जबाबदारी घेतो व आठ वर्षे वय असलेल्या युवराजांना भावी सम्राट होण्याच्या दृष्टीने शिक्षणाची तजवीज करतो. 

युवराजांच्या एकविसाव्या वाढदिवसाच्या दिवशी प्रजेसमोर युवराज दर्शन देणार असतात.त्या निमित्ताने स्पर्धा होणार होत्या त्यात युवराज आपले कौशल्य दाखवणार होते. या दरम्यानच्या काळात कृष्णांताने साम्राज्यावर चांगलीच पकड बसवलेली असते. स्वतःला साम्राज्याचा सेवक म्हणवणाऱ्या कृष्णांतासमोर सिंहासनाधीष्ट होण्यासाठी फक्त युवराजांचा अडसर होता. त्यांचे अचानक काही बरेवाईट झाले असते तर चंद्रकेतू महाराजांचा वंश संपणार होता. किंवा युवराज राज्यकारभार करण्यासाठी सक्षम ठरले नसते तर.... 


कृष्णांताच्या योजनेनुसार प्रजेची प्रचंड निराशा होते. युवराज अत्यंत नेभळट भित्रे दिसतात.कृष्णांताचा मुलगा शार्दूलसिंहच्या आव्हानाचा सामना न करताच युवराज घाबरून पळून जातात. प्रजाजनात निराशेची भावना पसरते. त्याच वेळी सर्वांग कवचधारी योध्दा तिथे अवतरतो आणि कृष्णांताचे सगळे कारस्थान पुराव्यासह उघड करण्याची, कृष्णांताच्या मर्मभेदाची प्रतिज्ञा करतो. तो योध्दा कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. 

त्याचवेळी कामरूप देशाचा राजा सुर्यप्रस्थावर आक्रमण करण्याची तयारी करीत असतो. त्याचे हेर ऐय्यार सुर्यप्रस्थात सगळीकडे पसरलेले असतात. 

कृष्णांताच्या मर्मभेदाची प्रतिज्ञा करणाऱ्या कवचधारी योध्याला परचक्रापासुन सुर्यप्रस्थाचे रक्षण आणि कृष्णांताचे कारस्थान उघडकीस आणणे अशी दुहेरी कामगिरी एकाचवेळी करायची होती. 

सृष्ट व दुष्ट प्रवृत्तीचा लढा, विश्वास व कपट, निष्ठा व बेइमानपणा या गाभ्यावर रचलेले हे कथानक वाचकाला कालप्रवाहासोबत प्रवास करायला भाग पाडते. गड किल्ले, त्यातील भुयारे, उत्तुंग कडे, घनदाट अरण्ये ह्यातून फिरवून आणतात. निसर्गाच्या नवलाईचे आश्चर्य करीत असतांना अचानक भुताटकीच्या जंजाळात अडकवतात. कृष्णांताच्या कारस्थानामुळे अकाली मृत्यू पावलेले सरदार रुंडकेतू, त्यांची पत्नी सुलसा, सरदार सत्यपाल दुर्दैवाने पिशाच्चयोनीत अडकतात. तरीही आपल्या परीने साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी झगडत असतात. 

कथानकाचा मुळ गाभा साम्राज्याचे निष्ठावंत विरुद्ध द्रोही असा असला तरी त्याभोवती आडवे उभे विणलेले रहस्याचे  धागे वाचकांना अचंबित करतात. आणि वातावरण निर्मिती तर इतकी वेधकपणे केलेली आहे की स्वत:ला विसरून आपण त्यात तल्लीन होऊन जातो. प्रसंगी घाबरतो तर प्रसंगी दचकतो. शह काटशहाच्या खेळात कृष्णांताच्या कपटीपणाचा राग येतो तर, स्वामीनिष्ठ असलेल्या मेल्यावरही मुक्ती न मिळालेल्या सरदार रुंडकेतू विषयी आपल्याला अनुकंपा वाटू लागते. अत्यंत शूर, धाडसी हातोहात फक्त वेष नाही तर चेहरा बदलून शत्रुपक्षातील बित्तंबातमी काढणाऱ्या हेर ऐय्यारांचे कसब पाहून स्तिमित होतो. काळदुर्गाच्या परिसरातील पिशाच्चलीला वाचतांना अंगावर काटा येतो. 

साहित्यातील नवरसांचा प्रमाणबद्ध वापर करतांना राजे महाराजांच्या भरजरी वस्रप्रावरणाप्रमाणेच भाषा सुध्दा भरजरी असली तरी वाचक अडखळत नाही. भल्यामोठ्या विशाल पटावरील या कथानकात अनेक पात्रे असली तरीही प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्टे ठळकपणे समोर येतात. आणि मुख्य सुत्राला कुठेही बाधा येत नाही. कथानकाचा ओघ कुठेही संथ न होता वाचकाला धक्के देत राहतात. एका धक्यातून सावरायच्या आत पुढचा धक्का बसतो. 

रहस्य आणि थरारात अवगुंठलेली ही अद्भुतरम्य कादंबरी    लेखकाची ही पहिलीच कलाकृती असूनही कुठेही नवखेपणा जाणवत नाही. 








 





























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.