मालगुडीचा नरभक्षक

पुस्तकाचे नाव - मालगुडीचा नरभक्षक
लेखक - आर. के. नारायण
अनुवाद - सरोज देशपांडे
प्रकाशक - रोहन प्रकाशन


मालगुडी गावातील एका सरळमार्गी व्यवसायीकाची काहीशी आडवळणाने जाणारी विनोदाची पेरणी करणारी उत्कंठावर्धक खिळवून ठेवणारी गोष्ट. 

बऱ्यापैकी कमाई करुन देणारा छापखान्याचा, प्रिंटींग प्रेस चा व्यवसाय करणारा नटराज. छापखान्याच्या मागच्या बाजूला वडिलोपार्जित घरात राहणारा,  मार्केटरोडवरून जाताना एखाद्याचे पाय दुखायला लागले तर छापखान्याच्या बाहेरच्या बैठकीच्या खोलीत बसायला त्याची हरकत नसायची. तिथे आराम करता करता लोकांना कल्पना सुचायच्या. व्हिजिटिंग कार्ड्स, बिलाचे फॉर्म, लग्नपत्रिका या सारखं काहीतरी त्यांना आठवायचं आणि ते काम त्याला मिळायचं. शेजारी असलेल्या स्टार प्रेस या छापखान्यात ओरिजनल हायडेलबर्ग हे आधुनिक छपाईचं यंत्र असुनही लोकांची गर्दी नटराजाच्या छापखान्यात असायची. सगळ्या कामात शास्री मदत करायचे. नटराज त्यांना नौकर मानायचा नाही. कारण नटराजकडून काही चुक झाली तर मग हे नातं उलटं व्हायची भिती होती. श्रीकृष्णाचे चरित्र एक पदी कवितेत लिहिणारा एक कवी, वर्तमानपत्र वाचण्यासाठी आलेला एक पत्रकार जो नेहमी नेहरूंच्या चुकावर भाष्य करायचा, असे हे दोघेजण नेहमीच तिथे असायचे. 

एकदा एक उंच, धिप्पाड  दिसणारा माणूस आला. त्याला व्हिजिटिंग कार्ड्स बनवून घ्यायचे होते. अगदी जुनी मैत्री असावी असं त्याचं अघळपघळ बोलणं होतं. वासू नाव होतं त्याचं. तो मृत प्राण्यांच्या शरीरात पेंढा भरून जींवतपणाचा आभास निर्माण करणारा टॅक्सिडर्मिट होता. त्यासाठी मालगुडीच्या आसपासच्या जंगलातून प्राणी गोळा करणार होता.त्यासाठी लागणारा काही दिवसातच त्याला शिकारीचा परवाना मिळणार होता. बेफाम, बेदरकार, लगेच मैत्री करणारा, मनाविरुद्ध झालं की शत्रुत्व पुकारणारा. 

एकदा पोटमाळा आवरावा, तिथली अडगळ विकावी म्हणून नटराजने भंगारवाल्याला बोलवलं. भावाची घासाघीस चालू असतांना तिथे वासू आला. उगीच भंगारवाल्याला ताणायचं म्हणून वासू म्हणेल तो भाव मान्य असेल तर व्यवहार करु असं म्हणत नटराजने वासूला पुढे केलं. वासूने लगेच माळ्यावर जाऊन बघितलं. आणि सौदा पक्का केला. 

नंतर मात्र नटराजला वासूच्या मैत्रीचा खुपच त्रास झाला. वासुने बंगल्यात राहायची सोय होइपर्यंत पोटमाळा
भाडेकरू म्हणून ताब्यात घेतला. एक बरं होतं की पोटमाळ्यावर जायला बाहेरूनही एक जीना होता. म्हणून आतला जीना जाळी लावून बंद करता आला. साफसफाई, रंगरंगोटी केली. भाडं मात्र कधीही दिलं नाही. जनावरांच्या शरीरात पेंढा भरायचं काम तिथेच करायचा. मग त्यामुळे जो वास यायचा तो फार त्रासदायक असायचा. त्याच्या एकदम हमरातुमरीवर येण्याच्या भांडखोर स्वभावामुळे कायमच नटराजला माघार घ्यावी लागायची. जवळचा मित्र म्हणून तो नटराजला कधीही कुठेही  घेऊन जायचा, इथे  गिऱ्हाईक वाट बघून कंटाळून निघून जायचे. 

नटराजचा वैताग वाढत होता. वासूही मुद्दाम त्रास देऊ लागला होता. आता इकडे तिकडे मृत जनावरांचे अवयव पडू लागले घाणेरडा वास वाढू लागला. नटराजने त्याला घाबरत घाबरत जागा खाली करायला सांगितलं तर वासू अजूनच चिडला, भाडेकऱ्याला बेकायदा पद्धतीने हाकलण्याचा प्रयत्न केला म्हणून कोर्टाद्वारे नोटीस काढली. आसपास राहणाऱ्या लोकांनी मृत जनावरांचे सापडणारे अवयव आणि घाणेरड्या वासाची तक्रार केली त्याचाही त्रास भोगावा लागत होता. वासूकडे बघून त्याचं उघड शत्रुत्व घेण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. 
यातून सुटण्याचा मार्ग सुचत नव्हता. दिवसेंदिवस नटराजची काळजी आणि भिती वाढत होती......... 

सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही आर. के. नारायण यांची खासियत आहे. नटराज, वासू यांच्या व्यतिरिक्त जी पात्रे येतात ती अगदी बारकाईने रेखाटलेली आहेत. नंतर रहस्यमय वाटणारी कादंबरी अगदी सुरूवातीलाच वाचकांच्या मनाची पकड घेते. वासूने उभ्या केलेल्या संकटातून नटराज कसा सुटेल या काळजीत वाचकही गुरफटून जातो. 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.