एन्ड गेम

पुस्तकाचे नाव - 📚 एन्ड गेम
लेखक -  मॅथ्यू ग्लास
अनुवाद - उदय कुलकर्णी


अमेरिका व चीन दरम्यान आर्थिक संघर्ष समोर येत असतांना पडद्याआडच्या काही लष्करी घडामोडी जगाला परत एकदा महायुध्दाच्या तोंडाशी उभ्या करतात की काय असे वाटण्याची परिस्थिती आकार घेत असते. 

लाॅर्ड रेझिस्टन्स आर्मी या दहशतवादी संघटनेने युगांडा मधील एका हाॅस्पिटलवर हल्ला केला त्यातील २१८ मृत व्यक्तींपैकी ३२ जण अमेरिकन स्वयंसेवक होते. युगांडा सरकारच्या मदतीला अमेरिकन लष्कर तयार असते, परंतु केनिया कडून संयुक्त राष्ट्र संघाकडून कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते. दहशतवादी संघटनेच्या समूळ उच्चाटनासाठी युगांडाच्या आसपासही काही लष्करी तळ उभारावे लागणार होते. तीथे चीनचे प्रभावक्षेत्र असल्यामुळे अमेरिकेने युगांडापुरती कार्यवाही मऱ्यादित ठेवावी ही चीनीची अपेक्षा. 
या घटनेनंतर दोन महिन्यात अमेरिकन शेअर बाजार अस्थिर होते. २००८ च्या मंदीच्या आठवणी ताज्या असतांना अमेरिकन बॅंकांना उभारी देण्यासाठी आवश्यक ते सर्व करायला तयार आहोत हे अर्थमंत्री सांगत असतांना सरकार मजबूत अर्थव्यवस्थेचे गुणगान करीत असते पण शेअर बाजार न सावरता गटांगळ्या खाऊ लागतो. पाठोपाठ जगभरातील शेअर बाजार कोसळत राहतात. 

युगांडा मध्ये एका कारवाईत एका अमेरिकन सैनिकाला दहशतवाद्यांनी मारल्यावर आणि दोन वैमानिकांना दहशतवादी ताब्यात घेऊन सुदानच्या हद्दीत घेऊन जातात. तिथे चीनचं वर्चस्व असल्यामुळे जोरदार लष्करी कारवाईची अपेक्षा होऊ लागते. 

संघर्ष व्हावा यासाठी टपलेले युद्धपिपासून आणि कट्टर भूमिका घेणारे लोक दोन्ही बाजूला असतात त्यामुळे न सुटणारा पेच प्रसंग निर्माण होतो. भडका उडण्यापूर्वीची परिस्थिती काबुत आणली पाहिजे याची जाणीव अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूतांना असते. पहिली गोळी झाडली गेली की लगेच महाभयंकर घटनांची मालिका सुरू होईल याचीही त्यांना कल्पना असते. युध्दखोर परराष्ट्र मंत्र्यांना डावलून राष्ट्राध्यक्षांना ते परिस्थिती ची जाणीव करून देतात. 

राष्ट्राध्यक्षांचा दोन वर्षांचा कालावधी अत्यंत शांततेत गेल्यावर आता काही आव्हाने उभी राहिली होती. त्यांना निर्णय घ्यायचा आहे. 

पण अमेरिका व चीनच्या युद्ध नौकांची आफ्रिकेच्या समुद्रात एकच दाटी झाली आहे आणि त्यांच्या हातातील वेळ निसटून चाललेली आहे विनाशाच्या उंबरठ्यावरून जगाला परत आणणे शक्य होते की तोच अखेरचा डाव ठरतो. 

राजकीय बैठकीतील चर्चा वाचतांना अत्यंत तणाव निर्माण करतात. राष्ट्राध्यक्ष व त्यांचे सहकारी बैठकीत योजना बनवतांना त्याचे दृश्य व अदृश्य परिणाम याचाही मागोवा घेतात. जनतेसमोर एखादं निवेदन देतांना त्यातील शब्द काय असावेत ह्यावर अधिकारी काथ्याकूट करतात. एखाद्या वाक्याचे अनेक अर्थ निघू शकतात ते काय काय असू शकतात ह्याचेही अवलोकन होते. जेणेकरून कोणाचाही गैरसमज व्हायला नको. 

हे पुस्तक वाचतांना वाचकाला शेअर मार्केट ची माहिती असणे गरजेचं आहे. अन्यथा अडखळल्यासारखं होईल. 
२०१८ सालात घडणारं हे कथानक अर्थव्यवस्थेतेचं झालेलं जागतिकीकरण दाखवतं. देशोदेशीच्या इन्व्हेस्टमेंट फंड कंपन्या वेगवेगळ्या देशांच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतात. त्या कंपन्यांचं शेअर मार्केट वर असलेलं नियंत्रण किती दुरगामी परिणाम करू शकतात हे जाणवतं. 












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.