लेखक - गंगाधर गाडगीळ
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या बालपणापासून चा काळ ह्या पुस्तकात असुनही "मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही." ह्या घटनेचा उल्लेख येत नाही.
प्रत्येक तरुण ध्येयवाद्याला असे वाटत असते की आपली ध्येयनिष्ठा अगदी उत्कृष्ट आणि विशुद्ध आहे. त्याचबरोबर त्याची अशी खात्री पटत जाते की इतरांची ध्येयनिष्ठा केवळ दिखावू नाही तर तकलुपी सुद्धा आहे. त्याला असे वाटत असते की आपले ध्येय गाठण्याचा मार्ग आपल्यालाच काय तो सापडला आहे आणि इतर सर्वांनी मुकाट्याने आपल्या मागून आले पाहिजे. इतरांनी त्याचे मानले नाही म्हणजे त्याच्या जीवाचा नसता संताप होतो. इतर माणसे ध्येयाशी बेहमान झाली आहे अशी तिची अगदी खात्री पटते. थोडक्यात म्हणजे अत्यंत ध्येयवादी तरुण हा अत्यंत तापदायक प्राणी असतो आणि शिक्षण संपतांना टिळकांचा स्वभाव अशाच प्रकारचा झाला होता. बंडखोरपणा, भावनाविहीन कणखरपणा, हेकेखोरपणा, हुकूमत गाजवण्याची प्रवृत्ती आणि प्रचंड आत्मविश्वास बालपणापासून स्वभावात होते. एखाद्याशी वाद घालू लागले तर हार न मानता वितंडवादही घालणारे. पुढे जसे सार्वजनिक कार्यात ते भाग घेत गेले तसा हेकेखोरपणा, हुकूमशाही स्वभाव कमी होत गेला. शालेय जीवनात नाजूक असलेली शरीर प्रकृती काॅलेजात गेल्यावर तासंतास आखाड्यात व्यायाम करुन प्रयत्न पुर्वक मजबूत केली.
विधवा विवाहाचे पुरस्कर्ते महादेव गोविंद रानडे यांची पत्नी वारल्यावर त्यांनी दुसरा विवाह एका आकरा वर्षाच्या मुलीशी केल्यावर त्यांना सार्वजनिक सभेत त्यांना धिक्कारले होते.
आगरकरांशी असलेले मित्रत्वाचे संबंध, आगरकरांची काॅलेजची परिक्षा फी भरण्यासाठी टिळकांनी केलेले प्रयत्न, कोल्हापूर गादीच्या एका प्रकरणात दोघांनी एकत्रित भोगलेला तुरुंगवास, नंतर तात्विक मुद्यावर झालेले मतभेद, केसरी आणि सुधारक मधून लेखाद्वारे काढलेले एकमेकांचे वाभाडे ह्याचं सुरेख चित्रण झाले आहे. आगरकरांच्या शेवटच्या आजारात टिळकांनी त्यांना भेटून सगळे वैरभाव मिटवले.
जेवतांना सोवळे घालणारे टिळक नियमित स्नानसंध्या करीत नव्हते. त्यांना छुपे सुधारक म्हणून हिणवले जायचे. इंग्रज अधिकाऱ्याकडे चहा घेतला म्हणून बहिष्कृत करण्यात आले होते. समाज अजून पुढारलेला नसल्यामुळे व या समाजाकडूनच देशहिताचे कार्य करवून घ्यायचे असल्यामुळे त्यांनी सामाजिक व धार्मिक मान्यतांना उघडपणे विरोध केला नाही. मुलींच्या लग्नाच्या मान्यता वयाचा कायदा करण्यास यासाठीच त्यांचा विरोध होता. सामाजिक मान्यतेत सरकारचा हस्तक्षेप त्यांना नको होता. या साठी झालेली सभा टिळक व त्यांच्या सहयोग्यांनी उधळून लावली होती. आपोआपच जहाल व मवाळ गट आपसात भांडू लागले.
टिळकांच्या वक्तृत्वाला व लेखणीला जशी जशी धार चढू लागली तसतसे ते सरकारच्या नजरेत खूप लागले. पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत जनरल रॅड ने जी हडेलहप्पी केली त्याचा बदला चाफेकरांनी घेतल्यावर दडपशाही करणाऱ्या सरकारच्या विरोधात लिहिलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या अग्रलेखाने टिळकांचा संबंध रॅंडच्या खुनाशी जोडून सहा वर्षाची शिक्षा भोगायला मंडालेच्या तुरुंगात टाकले. त्या काळात गीता रहस्य हा ग्रंथ लिहून झाला. या काळात त्यांच्या शरीर प्रकृतीवर फारच विपरीत परिणाम झाला होता. त्याचा बाऊ न करता टिळक देशासाठी, समाजासाठी झटत राहिले.
टिळकांच्या एकसष्टव्या वाढदिवशी अर्पण करण्यात आलेली एक लाखाची थैली जनतेचं त्यांच्यावर असलेलं प्रेम सिध्द करते.
सर व्हॅलेंटाईन चिरोल या इंग्रज गृहस्थाने इंडियन अनरेस्ट ह्या पुस्तकात भारतीय क्रांतिकारकांची बदनामी करणारा मजकूर लिहिला होता. त्यावर टिळकांनी इंग्लंड मध्ये जाऊन अब्रू नकसानीचा दावा दाखल केला होता. आपण हारणार हे माहीत असूनही सरकार भारतीयांना काय समजते हे युरोपिअन जनतेला दाखवून द्यायचे होते. ह्याचा सगळा खर्च जनसहभागातूनच उभा राहिला होता.
उत्तरार्धात टिळकांचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजू लागले. काॅंग्रेस अधिवेशनात टिळकांना मिळणारा पाठिंबा वाढू लागला होता. जहाल व मवाळांचे गट हमरातुमरीवर येऊ लागले. सुटेपर्यंत ताणायचे नाही ही टिळकांची वृत्ती असल्यामुळे काँग्रेस दुभंगली नाही.
अशा या वादळी व्यक्तिमत्वावरची ही चरित्रात्मक कादंबरी झपाटून टाकते. कादंबरी असल्याने लेखकाने घेतलेलं लेखन स्वातंत्र्य खटकत नाही. बारीकसारीक प्रसंगातून, संवादातून आपण लोकमान्य टिळकांच्या अंतरंगात पोहोचतो. लग्न झालेले, मुले असुनही टिळकांचे मन संसारात रमले नाही. पत्नीला नेहमी सांगायचे, घेतलेल्या व्रताचे पालन मला करावेच लागेल. तूम्ही स्वत:ला त्रास करून घेऊ नका. मुलगा आजारी असतांना ते कार्यक्रमासाठी रायगडावर गेले असतांना तिथे घरून तार आली. मुलाचे काही बरेवाईट झाले का... ही आशंका मनात आली. दुसऱ्याच क्षणी तारेचा कागद खिशात ठेवून दिला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी तार वाचली.
लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील 'दुर्दम्य' ही दोन खंडी कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरीलेखनाचा मराठीतील एक महत्त्वाचा प्रयोग होता.