(४ जानेवारी १९१४ - १३ जुलै २००० )शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४०ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या.इंदिराबाईंना अनेक मानसन्मान लाभले. रसिकांच्या प्रेमाबरोबर राजमान्यता लाभली. शेला,मेंदी व रंगबावरी या काव्यसंगहांना राज्य शासनाचे वाङ्मयीन पुरस्कार लाभले गर्भरेशमी या काव्यसंगहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला (१९८४). नासिकच्या कुसुमागज प्रतिष्ठानने त्यांना ‘ जनस्थान ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले (१९९५). महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्ती दिली होती.