( ६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८ ) तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे ‘सामना’.एका साखरसम्राटाची ही कथा होती. तोपर्यंत मराठी साहित्यातही साखरसम्राटावर कादंबरी लिहिली गेली नव्हती.... त्यापाठोपाठ ‘सिंहासन’ आणि ‘उंबरठा’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपट लिहिले. याच काळात श्याम बेनेगल यांच्यासाठी ‘निशांत’ व ‘मंथन’ हे दोन हिंदी चित्रपट लिहिले. ‘मंथन’साठी विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.‘मानवत खून खटल्यावर’ त्यांनी ‘आक्रीत’ हा चित्रपट लिहिला. फ्रान्सच्या नाण्टस महोत्सवामध्ये या चित्रपटालाही उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी गोविंद निहलानींसाठी ‘आक्रोश’ लिहिला.नंतर अर्धसत्य. 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले.
'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.
'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.इतर अनेक पुरस्कारांसह पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, आदीने गौरवण्यात आले. ( संकलीत)