(७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिध्द आहेतच, पण समाजशिक्षणमालेची २७० संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेली पुस्तकमाला सर्वपरिचित आहे. शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली २८० लहानलहान पुस्तके या मालेद्वारे त्यांच्या वडिलांनी प्रसिध्द केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनांतर २७० पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या दोन ग्रंथांची संपादने त्यांच्या नावे आहेत. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही सहसंपादने केली होती.
कथा, कादंबऱ्या बालवाङ्मय इ. वाङ्मयप्रकारांचे त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केले आहे. ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललितलेखसंग्रह, २ कवितासंग्रह आणि ४ नाट्यवाङ्मयाची पुस्तके आणि आत्मचरित्र अशी ५१ स्वतंत्र पुस्तके त्यांच्या ३०७ संपादित पुस्तकांच्या जोडीला ठेवली, तर त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या ३५८ आहे. याशिवाय ‘रानजाई’ या नावाने त्यांनी शांता शेळके यांच्यासह केलेली दूरदर्शन मालिकाही लोकसाहित्याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधण्यात महत्त्वाची ठरली.त्यांची लोकसाहित्यविषयक महत्त्वाची संपादने अशी : एक होता राजा, दसरा-दिवाळी, जनलोकांचा साम्यवेद, साजाशिणगार, मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत, बाळराजे, कुलदैवत, राजाविलासी केवडा, लोकसंगीत, समाजशिक्षणमालेतील लोकसाहित्यविषयक पुस्तिका.
त्यांच्या ग्रंथसंपादनासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांपैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, भद्रकाली ताराराणी पुरस्कार, गुरूवर्य बाबुराव जगताप पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, पठ्ठे बापुराव पुरस्कार यांच्या जोडीला मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या कार्याला दिशा देऊन लोकसाहित्याच्या संकलनाचे भरीव काम त्यांनी केले आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)