परदेशात शिक्षण पूर्ण करून नौकरी करीत असताना रशियन व्यक्तीशी विवाह झाला. मात्र पुढे घटस्फोट झाल्यावर मुलीसह त्या भारतात परतल्या. हिंदुस्थानात परतल्यावर त्यांनी संततिनियमनाच्या प्रचाराचे कार्य पुष्कळ वर्षे हिरिरीने केले. या कामातील त्यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे महर्षी कर्वे यांचे चिरंजीव व शकुंतला बाईंचे भाऊ आणि संतती नियमनाच्या कार्याचे प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे हे होत. या कामासाठी शकुंतला परांजपे यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात नोकरी केली. १९५८ साली राज्य सरकारने त्यांची नियुक्ती विधानसभेवर केली. त्यानंतर १९६४ साली, राज्यसभेवरही सहा वर्षांसाठी त्यांची नेमणूक झाली. . संततिनियमनाच्या संदर्भात ‘पाळणा लांबवायचा की, थांबवायचा?’ हे पुस्तक आणि र.धों.कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्या’तून काही लेखन केले. ‘काही आंबट काही गोड’ या पुस्तकातील ‘राष्ट्रपती नियुक्तीची सहा वर्षे’ या लेखातही या कार्यासंबंधीचे अनुभव आले आहेत. शकुंतला परांजपे यांचे ललितगद्य, कादंबरी आणि नाटक या तीनही साहित्यप्रकारांतील लेखन वेधक आहे.
ललितगद्यामधील पहिला संग्रह ‘भिल्लिणीची बोरे’ (१९४४).त्यांचा दुसरा ललितलेखसंग्रह ‘माझी प्रेतयात्रा’ (१९५७). या पुस्तकाची प्रस्तावना शकुंतला परांजपे यांची कन्या सई परांजपे हिची आहे.त्यांचा तिसरा संग्रह ‘काही आंबट काही गोड’ (१९७९). यांतील बहुसंख्य लेख आठवणीवजा आत्मचरित्रात्मक आहे. ‘घराचा मालक’ही कादंबरी बालमानसशास्त्रावर आधारलेली असून ‘चढाओढ’ आणि ‘सोयरीक’ (१९३६) ही फ्रेंचमधून मराठीत घेतलेली दोन प्रहसने असून; ‘प्रेमाची परीक्षा’(१९४१) आणि ‘पांघरलेली कातडी’ (१९४२) ही दोन स्वतंत्र नाटके आहेत. ‘प्रेमाची परीक्षा’ हे चार अंकी प्रहसन पुरुषपात्रविरहित असून ते महर्षी कर्वे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले आहे.. ‘पांघरलेली कातडी’ हे पाच अंकी संगीत नाटक आहे. हे नाटक लिहिण्याच्या चार वर्षे आधी एका सभेत लेखिकेने मराठी नाटकावर टीका केली असता, दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी संगीत नाटक लिहून दाखवण्याचे आव्हान दिल्यावरून हे नाटक लेखिकेने लिहिले. भूमिकांची अदलाबदल करून प्रेमाची परीक्षा पाहणारी पात्रे यात रंगविली आहेत.
१९९१ साली त्यांना भारत सरकारचा ‘पद्मविभूषण’ सन्मान प्राप्त झाला. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)