पुस्तकाचे नाव - चौंडकं
लेखक - राजन गवस
लोक संस्कृतीच्या नावावर आजही आपल्या समाजात श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धाच जास्त पसरवली जाते यातूनच मग वेगवेगळ्या प्रथा परंपरा चालू राहतात. त्यातूनच पूर्वपार चालत आलेल्या रुढी परंपरा देव देवता त्यातून निर्माण झालेल्या श्रद्धा अंधश्रद्धा याचे भयानक वास्तव आपल्यासमोर येते.
लहानपणी मौज मस्तीच्या हसण्या बागडण्याच्या दिवसात दहा वर्षे वय असलेल्या सुलीच्या डोक्यात निघालेली एक जट तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते.सुलीचे केस विंचरताना तिच्या आईच्या दंडात आलेली कळ, सकाळी सकाळी घरासमोर दिसलेले टाचण्या टोचलेले लिंबू, याचा संबंध आपोआपच घरातील आजारपणाला आणि अभावग्रस्ततेला जोडला जातो.
गावातील एका जाणकाराच्या सल्ल्यानुसार सुलीचे कुटुंब एका जोगतीनीचा सल्ला घेतात. जोगतीण सुलीला देवाची सेवा करायला सांगते. तिचे वडील सुरुवातीला विरोध करतात पण बायको आणि आईच्या दबावाखाली तयार होतात आणि सुलीचं आयुष्य बदलून जातं.
देवदासी बनल्यावर आपलं आयुष्य देवीच्या सेवेला वाहून द्यावं अशी देवदासी परंपरा. यात बळी जातो तो स्त्रीचाच कारण देवदासी देवाची पण मालकी गावाची समजली जाते.
देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तीने निर्माण केलेल्या देवदासी प्रथेच्या बळी ठरलेल्या स्त्रियांच्या दुःखाच्या व्यथा वेदनांची गाथा म्हणजेच ही कादंबरी.
देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. सुली या पात्राच्या व्यक्तीरेखेतून एक वेदना आपल्याला कुरतडून टाकते.