लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत.प्राध्यापक असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या. १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. कालबाह्य रूढी-परंपरा आणि कर्तव्य यांच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मनस्वी, कलासक्त, संपन्न व्यक्तिमत्त्वाची ही शोकांतिका. प्रेमा, तुझा रंग कसा?, ही एक हलकी-फुलकी विनोदी, खेळकर सुखात्मिका होती. कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले.हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले.
अश्रूंची झाली फुले हे त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हे एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते. या नाटकावर आधारित आंसू बन गये फूल हा हिंदी चित्रपट बनविला. या चित्रपटासाठी कानेटकरांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे “नाट्यपंचक” त्यांनी साकारले. ही पाच नाटके म्हणजे – रायगडाला जेव्हां जागे येते, इथे ओशाळला मृत्यू, तुझा तू वाढवी राजा, आकाशमिठी आणि जिथे गवतास भाले फुटतात ही होत.कानेटकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वेड्याचे घर उन्हात या त्यांच्या पहिल्या नाटकाने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील बहुतांशी बक्षिसे जिंकली (१९५८). देवांचे मनोराज्य, प्रेमा, तुझा रंग कसा? आणि रायगडाला जेव्हां जाग येते यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील पहिले पारितोषिक मिळाले. संगीत नाटक अकादमीने रायगडाला जेव्हां जाग येते या नाटकाला “बेस्ट इंडियन प्ले” पुरस्काराने सन्मानित केले (१९६४). या पुरस्काराचा भाग म्हणून या नाटकाचे १४ भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रसारण झाले. हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या पदवीपूर्व कला अभ्यासक्रमातही सामील झाले. १९७७ मध्ये त्यांना कस्तुरीमृग या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटक व सर्वोत्कृष्ट नाटककार असे कलादर्पण पुरस्कार मिळाले. त्यांना संगीत नाटक अकादमीने सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरविले आहे . १९७१ च्या मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, १९८४ च्या ठाणे येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९० साली महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव आणि १९९२ साली भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( संदर्भ मराठी विश्वकोश)