व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ

पुस्तकाचे नाव -   व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ
लेखक - वि. ग. कानिटकर



औरंगजेबाच्या मोगली सत्तेशी, शिवाजी महाराजांनी शौर्याने व गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने जो यशस्वी लढा दिला, त्या गनिमी युद्धतंत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक काळातील आविष्कार म्हणजे व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा होय.



गनिमी काव्याने, हो-चि-मिन्ह जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ धीरोदात्तपणे स्वातंत्र्यासाठी लढत होता. या संघर्षात साम्राज्यवादी शक्तींनी आठ-दहा वेळा त्याच्यावर लादलेल्या देहदंडाच्या शिक्षेतून सुखरूप निसटला. हो-चि-मिन्ह याने आपला देश सचेत केला. देशभक्तीने भारून टाकला. दोन युद्धे या आत्मिक बळावर पाठोपाठ जिंकली. फ्रेंचांचे वसाहतवादी साम्राज्य त्याने निकालात काढलेच, पण त्यापेक्षा अमेरिकेच्या प्रचंड, लष्करी सामर्थ्याला गनिमी तंत्राने नामोहरम केले व अखेर पराभूत केले. देशाची अखंडता प्राप्त केली. ही त्याची कामगिरी अतुलनीय आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर राष्ट्रवादाची कास धरून, हिंसा-अहिंसेचा घोळ न घालता सत्ता वापरून, चेतनाहीन राष्ट्र परत उभे करता येते, याचा वस्तुपाठ म्हणजे, हो-चि-मिन्ह याचा लढा होय.

अनेक वेळा नावे बदलल्यामुळे आपले खरे नाव त्याचे त्यालाही स्मरत नव्हते कारण १३ ऑगस्ट १९४५ ला येत नाही मी क्रांतीचे नेतृत्व पत्करताच त्याने आपले अजरामर होणारे नाव जाहीर केले हो ची मिन्ह  ! 

फ्रेंचाविरुद्ध लढा चालू असताना एका फ्रेंच अधिकाऱ्याजवळ वाटाघाटीत हो ची मिन्न याने उद्गार काढले होते, "माझ्याजवळ सैन्य नाही पैसा नाही शिक्षण देण्याचे साधन नाही मला फक्त तुमचा द्वेष करता येणे शक्य आहे जोपर्यंत तुमच्यावर माझा विश्वास बसत नाही तोपर्यंत मी तुमचा द्वेष थांबवणार नाही."

व्हिएतनामची फाळणी करून फ्रेंच गेले आणि कम्युनिस्ट राजवट येण्याचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेने शिरकाव केला. दक्षिण व्हिएतनामचा अध्यक्ष अंकीत केला. या राजवटीने जनतेवर अनन्वित अत्याचार केले. 

या झगड्यात अमेरिकेच्या अप्रबुद्ध जागतिक राजकारणाचे धागे, प्रथमपासून तो आजतागायत गुरफटलेले आढळतात. निवडून येताना प्रत्येक अमेरिकन अध्यक्षाने, व्हिएतनाम प्रश्नाशी सोईस्कर हिसकाहिसकी केलेली आढळून येते. परंतु हो-चि-मिन्ह याचे अनन्यसाधारण नेतृत्व अमेरिकेला पुरून उरले. दोन बलाढ्य सत्तांशी लष्करी टकरा घेत घेत, राष्ट्र सचेतन केले; हा या संघर्षातील सर्वात रोमहर्षक भाग आहे.

हो मि चिन्ह चे स्वप्न अखंड व्हिएतनाम चे होते. त्याच्या जीवाला जीव देणारे साथीदार त्याला लाभले हे महत्त्वाचं. जिऍप सारखा संरक्षण मंत्री प्रत्यक्ष युध्द आघाडीवर असायचा. रणभूमीवर सैनिकांना गनिमी काव्याचे तंत्र मंंत्र सांगायचा. 

या युद्धात झालेल्या मानवसंहाराचे आकडे हे भयचकित करणारे आहेत. १९४५ ते १९५४ या काळात व्हिएतनाममध्ये फ्रेंचांबरोबरच्या झगड्यात एकंदर ५,७७,३३४ माणसे ठार झाली. यात ३२,८११ फ्रेंच होते. जानेवारी ६१ ते जानेवारी ७३ या कालखंडातील व्हिएतनाममधील लढाईत प्रामुख्याने अमेरिकन सैनिक लढले. या संघर्षात उत्तर व्हिएतनाममध्ये नागरिक व सैनिक मिळून १,००,००० माणसे ठार झाली. याच काळात दक्षिण व्हिएतनाममध्ये ६६,७१,१०६ माणसे ठार झाली आणि त्यात ९६,२०९ अमेरिकन आहेत. लढाईची शेवटची तिसरी फेरी जानेवारी ७३ ता एप्रिल ७५ ला झडली. या काळात युद्ध मुख्यतः दक्षिण व्हिएतनाममध्येच उसळले आणि आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार यात १,२०,००० व्हिएतनामी ठार झाले आहेत. कंबोडियाच्या झगड्यात एकूण ७,००,००० आणि लाओसमध्ये ८०,००० मृत्यू झालेले आहेत.

व्हिएतनाममधील सर्वविनाशक अशा या प्रदीर्घ युद्धाच्या एकंदर अनुभवाने, अमेरिकेतील जनतेचे डोळे उघडलेले आहेत. या सर्व अनर्थाचे पाप आपल्यावर आहे याची जाणीव, तेथील नव्या राजकारण्यांना झालेली आहे. एवढे जरी घडले तरी या अर्थशून्य युद्धाचा अंशतः तरी उपयोग झाला असे पुढील पिढ्या समजतील. अमेरिकेच्या इतिहासात मात्र या अनर्थकारी कालखंडाची नोंद, निरर्थक युद्ध अशीच होईल.

अखंड एकसंध व्हिएतनाम  बघायला दुर्दैवाने हो चि मिन्ह हयात नव्हता. मात्र नव्या राजवटीने आक्रमकांच्या आठवणी देणारं सायगावचं नामकरण "हो चि मिन्ह" केलं. ही त्या राष्ट्रपित्याला वाहिलेली श्रध्दांजली होती. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.