लेखक - जाॅन ग्रिशॅम
अनुवाद - विश्वनाथ केळकर
ट्राॅय फेलन हा त्र्याऐंशी वर्षाचा अब्जाधीश. सुखासीन आयुष्य जगलेला. तीन लग्ने करून तिघींनाही त्याने घटस्फोट दिला होता. त्याने अनेक वेळा मृत्युपत्रे बनवली होती. नुकतेच त्याने मोठ्ठं नव्वद पानी मृत्युपत्र बनवलं होतं. त्यावर सही करण्याअगोदर त्याने आपल्या घटस्फोटित पत्न्या, त्यांची मुले, नातवंडाच्या संम्मतीने त्यांनीच निवडलेल्या मानसोपचारतज्ज्ञ व स्वतःच्या वकीलासमोर स्वता:ची मानसिक परिस्थिती उत्तम असल्याचा दाखला घेतल्यावर मोठ्या मृत्यूपत्रावर सही न करता एका तीन परिच्छेदाच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या मृत्युपत्रावर सही करून अगोदरची सगळी मृत्युपत्रे रद्दबातल ठरवली. या मृत्युपत्रानुसार आपल्या बायका मुलांची आत्ताच्या तारखेपर्यंतची जी काही देणी असतील ती देऊन बाकीची सगळी संपत्ती रॅचेल लेन विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या त्याच्या अनौरस मुलीच्या नावावर केली होती. ती अदिवासी लोकांमध्ये व वैद्यकीय सेवा देण्याचे व धर्मप्रसारकाचे काम करीत होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून भेट झालेली नसल्यामुळे रॅचेल लेन आत्ता नेमकी कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हते.
या मृत्युपत्रास जर कोणी कायदेशीर आव्हान दिले तर त्याला काहीही घेऊ नये अशी तजवीज सुद्धा त्याने केली होती. आपली मुले काय लायकीची आहेत हे तो चांगलं ओळखून होता. मुले एकवीस वर्षाची होताच त्यांना लाखो डाॅलर दिले होते. जे मुलांनी काही वर्षातच संपवून टाकले होते. शिवाय नवीन कर्ज करून ठेवलं होतं ते वेगळच.
या मृत्युपत्रावर सही केल्यावर लगेचच ट्राॅय फेलनने सगळ्यांसमोर चौदाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
त्याच्या मृत्यूचे दु:ख होण्याऐवजी त्याच्या बायको मुलांना व सगळ्याच नातेवाईकांना इतकच काय तर आपलं आयुष्य त्याच्या सेवेत घालवलेल्या काही नोकरांना मृत्युपत्रात आपल्या वाट्याला काहीच आले नाही याचं जास्त दुःख झालं. त्याच्या बायको मुलांनी या मृत्युपत्रास कोर्टात आव्हान देण्याचे ठरवले.
ट्राॅय फेलनचा कायदेविषयक सल्लागार असलेल्या जाॅश स्टॅफोर्ड वर रॅचेल लेन ला शोधण्याची जबाबदारी आली त्याने ह्यासाठी नेट ओ राॅयले या वकीलाची नेमणूक केली व त्याला व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर काढले. नेट ची व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची चौथी वेळ होती.
रॅचेल लेन ही दक्षिण अमेरिका, ब्राझील च्या आसपास पेंटॅनल या जगातल्या सगळ्यात मोठ्या दलदलीच्या प्रदेशात कुठेतरी आहे एवढीच माहिती मिळाली. तिथल्या अदिवासी जमातीला कोणत्याही प्रकारे नागरी संस्कृतीचे वारे लागलेले नव्हते. त्या अती दुर्गम व निबिड प्रदेशातील दळणवळणाचे साधन म्हणजे नदीतून होडीने केलेला प्रवास. त्याठिकाणी सुसर, मगर साप वगैरेंचा धोका आहे. नेट ओ राॅयले स्वतःचा जीव वाचवत रॅचेल लेन ला शोधण्याचा आणि स्वतःला दारुच्या व्यसनापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जॅश स्टॅफोर्ड ट्राॅय फेलनच्या मुलांनी मृत्युपत्राला दिलेल्या आव्हानाविरुद्ध लढतो आहे. त्या मृत्युपत्राने अब्जाधीश झालेल्या रॅचेल लेन ला ट्राॅय फेलन आपला बाप होता हे सुद्धा माहीत नव्हतं. किंबहुना त्या मृत्युपत्राद्वारे आपण अब्जाधीश झालोय हेच तिला माहित नव्हतं.
नेहमीप्रमाणे जाॅन ग्रिशॅम ची रहस्यमय, गुंतागुंतीची, अनपेक्षित धक्के देणारी वाचनीय कादंबरी असुन नेट ओ राॅयलेच्या व्यसनमुक्तीचीही कथा आहे.