लेखक - हर्मन मेलव्हिल
अनुवाद - भानू शिरधनकर
तनमनाने दर्यावर्दी असलेल्या हर्मन मेलव्हिल ह्यांनी १८४१ साली अमेरिकेतील दक्षिण समुदची सफर केली होती. या सफरीच्या दुसऱ्या वर्षात ते पाॅलेनेशियन बेटावर पोहोचले. १८४६ साली या बेटांवरील विलक्षण अनुभवावर आधारित टैपी ही कादंबरी लिहिली. त्याचा मराठी अनुवाद पाचूचे बेट ह्या नावाने प्रसिद्ध झाला.
मार्केसस द्विपसमूहातील नुकूहेवा या बेटावर डाॅली हे जुनाट जहाज आले तेव्हा जहाजावरील सगळेच खलाशी कमालीचे कंटाळलेले होते. कारण सहा महिने त्यांना जमीन दिसली नव्हती. कप्तानाची अरेरावी व हेकेखोरपणालाही वैतागलेले होते.
टाॅमने जहाज सोडून पळून जायचे ठरवले. उरलेलं आयुष्य या आदिवासी लोकांसोबतच काढायचं ठरवतो. जहाजावरच्या एका खलाशी मित्राची टाॅबीची त्याला साथ मिळते. आणि जेव्हा त्यांना किनाऱ्यावर एका दिवसासाठी जाण्याची परवानगी मिळते तेव्हा सगळ्यांची नजर चुकवून दोघेही पळून जातात.
काही आठवडे अगोदर फ्रेंचांनी हा भूभाग कब्जात आणला होता. त्यामुळे स्थानिक अदिवासी व फ्रेंच सैनिकात चकमकी होत राहायच्या. त्या भूभागावर नुकेहवाला, हप्पार आणि टैपी जमातीचे लोक आपापल्या सीमारेषा आखून राहणारे पण इतर जातीबद्दल द्वेषभाव बाळगणारे. त्यातले टैपी जमात शुर, लढाऊ, तितकेच क्रूर सुध्दा. नरमांसभक्षक समजले जाणारे.
टाॅम आणि टाॅबी पर्वत, बांबू, बोरीचे जंगले तुडवत, पावसाचा सामना करत ते जहाजावरून आणलेल्या पावावर, भिजलेल्या बिस्किटांच्या लगद्यावर दिवस काढून सात आठ दिवसांचा खडतर प्रवास करून एका मानवी वस्तीजवळ पोहोचतात. ह्या वाटचालीत टाॅमीचा पाय दुखावला जातो. त्यांना वाटते हे हप्पार जमातीचे लोक असावेत. पण ते असतात टैपी जमातीचे, नरमांसभक्षक समजले जाणारे. दोघेही जगण्याची आशा सोडून देतात. पण त्या लोकांसोबत काही दिवस घालवल्यावर त्यांना वाटायला लागते की टैपी जमाती बद्दल उगीचच गैरसमज पसरवले गेले आहेत. या लोकांसारखे आदरातिथ्य करणारे, काळजी घेणारे दुसरे कोणीही नसावे.
टाॅम आणि टाॅबीला कुठेही फिरायची परवानगी असली तरीही ते टैपींच्या पहाऱ्यात असतात. एवढी एक गोष्ट सोडली तर बाकी कोणतेही निर्बंध त्यांच्यावर नसतात. टाॅमला तिथे सुंदरशी मैत्रिणही मिळते. त्यांना सगळ्या सुखसोयी पुरवून त्यांची उत्तम काळजी घेतली जात असते. दुखावलेल्या पायाने चालता येत नाही म्हणून कोणीतरी त्याला पाठगुळी घेऊन फिरायचे. पायासाठी औषध आणण्यासाठी टाॅबी किनाऱ्यावर फ्रेंच डाॅक्टराकडे जाण्याचे सुचवल्यावर टैपी कडाडून विरोध करतात. शेवटी तो एकटाच जाणार आणि टाॅम थांबणार म्हटल्यावर ते परवानगी देतात. तीन दिवसात परत येतो असं सांगून गेलेला टाॅबी परत येतच नाही.
एकदा हप्पार जमातीशी टैपींची चकमक होते. काही हप्पार लोक टैपींच्या हाती लागतात. दुसऱ्या दिवशी त्या लोकांचं जे काही झालं ते बघून टाॅम हादरून जातो आणि कोणत्याही परिस्थितीत आपली टैपींच्या तावडीतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या दुखावलेल्या पायामुळे तो हवालदिल झालेला असतो.
हर्मन मेलव्हिल ह्यांनी या आदिवासी जमाती मध्ये काही दिवस वास्तव्य केले असल्यामुळे ह्या लोकांच्या जीवनशैलीचं त्यांच्या रितीरिवाजाचे बारीकसारीक वर्णन केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून युरोपियनांनी समूद्रसफरी करुन सैन्यबलाच्या जोरावर असे भुभाग बळकावून अदिवासी लोकांना त्यांच्या मुळच्या वसतीस्थानापासून कसे हाकलून विस्थापित केले हे विचार करायला लावणारे आहे.
प्रत्यक्ष अनुभवावर आधारित उत्कंठावर्धक कादंबरी असून आदिवासी जमातीची माहिती मिळते. भानू शिरधनकर ह्यांनी उत्कृष्ट अनुवाद केला आहे.