ऍटलस श्रग्ड

पुस्तकाचे नाव - 📚 ऍटलस श्रग्ड
लेखिका - आयर्न रॅंड
अनुवाद - मुग्धा कर्णिक



पाऊण शतकापासून गाजत असलेली ही कादंबरी मनाची पकड घेणाऱ्या कथानकातून वेगळ्याप्रकारचे तत्वज्ञान मांडते.१९५७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या २००९ पर्यंत सात लाख प्रती विकल्या गेल्यावर २००९ या एका वर्षातच ह्या पुस्तकाच्या पाच लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. व  अद्यापही नवीन आवृत्त्या प्रकाशित होतच आहेत. शंभराव्या आवृत्तीसाठी आयर्न रॅंड ने नव्याने प्रस्तावना लिहिली होती. 

आपले तत्त्वज्ञान एका अतिशय बौद्धिक स्तरावरील रहस्य कथेद्वारे मांडतांना नीतिशास्त्र, आदीभौतिक संकल्पना, राजकारण, संकल्पना शास्त्र, अर्थशास्त्र, शरीर संबंध या सर्व विषयांची गुंफण या कथेत केली आहे. बुद्धीला कमी लेखणाऱ्या, बुद्धीचा अधिक्षेप करणाऱ्या, अन्याय करणाऱ्या जगाविरुद्ध स्फुरलेली ही कादंबरी आयर्न रॅंडने  विविध क्षेत्रावर संशोधन करून लिहून पूर्ण केली. 

टॅगाॅर्ट ट्रान्सकाॅंटीनेटल ही रेलरोड कंपनी जेम्सच्या वडीलांनी स्थापन केली होती. आत्ता जरी जेम्स कंपनीचा अध्यक्ष असला तरी कंपनी व्हाईस प्रेसिडेंट इनचार्ज ऑपरेशन्स या पदावर असलेली त्याची बहीण डॅग्नी वरच कंपनीची अप्रत्यक्ष मदार असून ती अत्यंत निष्ठूरपणे कंपनीसाठी निर्णय घेते, प्रसंगी. बोर्ड ऑफ डायरेक्टरांना न जुमानता..  तिला आव्हाने पेलायला आवडतं. एक स्त्री रेल रोड चालवते भरतकाम, विणकाम, शिवणकाम, यासारख्या नजाकतीच्या कला किंवा मुलांना जन्म देण्याचे महत्त्वाचे सृजनकर्तव्य सोडून..असं तिच्या पाठीमागे बोललं जायचं, पण ती जर नसली तर कंपनी महिनाभरात बंद पडली असती हे ही सगळे जाणून होते. 

हॅक रिअर्डन हा तरुण उद्योगपती नव्या प्रकारचं वजनाने हलकं पण टिकाऊ स्टील बनवतो आहे. त्या  उत्कृष्ट प्रतीच्या स्टील मुळे उद्योग विश्वास एक वेगळीच वावटळ निर्माण झालेली आहे. खूप साऱ्या कमी प्रतीच्या स्टील बनवणाऱ्या कंपन्या कदाचित बंद पडतील या धास्तीने रिअर्डन स्टील विरुद्ध एक मोहीम आखली गेली. ह्लाला न जुमानता आपल्या कंपनीसाठी डॅग्नी त्याच्याकडून रेल्वेचे रुळ बनवुन घेते आहे. 


फ्रांसिस्को डॅंकोनिया हा एका सरंजामी गर्भश्रीमंत घराण्यातील प्लेबॉयचा प्रतिक वाटणारा युवक, घराण्यातील श्रीमंतीत भर घालणारा, डॅग्नीचा  बालपणीचा मित्र,

तेलविहीरींचा मालक असलेला एलिस व्याट,  उत्पादन करतांना अधुनिक तंत्रज्ञान वापरणारा, त्याच्या उद्योगावर अवलंबून अनेक उद्योग पैसा कमवीत असतांना सरकारी कायद्याच्या जाचामुळे स्वतःच्या तेलविहीरींना आग लावणारा. 

रॅग्नर डॅनोस्कयोल्ड हा तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा  प्रामाणिक तरुण सरकारी धोरणांना कंटाळून बंडखोर झालेला व आता सरकारी लुटालूट करणारा,
सरकारने त्याला पकडवुन देणाऱ्यास दहा लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. 

एक संगीतकार, ज्याचे संगीत जगात नावाजले जाते त्याच्या एका कार्यक्रमात काही समाजकंटकांनी गोंधळ घातला म्हणून सगळं सोडून गेलेला.

अभ्यासक्रमात अनपेक्षितपणे सरकारी हस्तक्षेपामुळे चुकीचे बदल झाले म्हणून  विमनस्क झालेला प्रोफेसर.. 

ह्या सगळ्यांना एकत्र आणून जोडून ठेवणारा या कादंबरीचा नायक जाॅन गाल्ट. कोणत्याही दबावात न येणारा, लढाई बाण्याचा एक अभ्यासू तंत्रज्ञ, कोणाववरही अवलंबून न राहणारा, स्वतः साठी दुसरं कोणी राबू नये, ही विचारधारा मानणारा. 

हे सगळे लोक  सृजनशील आहेत. आपला व्यवसाय कसा करावा, कसा वाढवावा, त्यातून योग्य मार्गाने संपत्ती कशी कमवावी ह्याचे त्यांना ज्ञान आहे. पण सरकारी धोरण राबवणाऱ्यांना काही ठराविक लोकांची काळजी असल्याने त्यांच्या नुकसानीत चालणाऱ्या व्यवसायांची ह्या लोकांनी काळजी घ्यावी, आपल्या फायद्यातील हिस्सा द्यावा ही सरकारची अपेक्षा. न केल्यास सामाजिक न्याय देण्यासाठी  सरकार लगेच त्यांच्या उद्योगाचे सरकारीकरण करण्यास तयार होते. लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या काही हजार प्रती विकल्या गेल्यास वाचकांना दुसऱ्या न विकल्या गेलेले पुस्तक खरेदी करण्यास भाग पाडले जाई ज्यामुळे दोन्ही लेखकांना समान संधी मिळणार होती. काही वेळा सरकार म्हणायचं, उद्योग उत्पादनासाठी नाही तर श्रमिकांचं पोट भरण्यासाठी चालवावे. 

सामाजिक न्यायासाठी समान संधी कायद्याप्रमाणे एक व्यक्ती एकापेक्षा जास्त उद्योग करू शकणार नव्हती. एक प्रकारे सरकार सगळ्यांना समान संधीच्या गोंडस नावाखाली फायद्यात असलेल्या उद्योगांना लगाम लावण्याच्या प्रयत्नात वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेत, नवीन कायदे बनवत, बट्राम स्कडर सारख्या पत्रकारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून, प्रसंगी दडपशाही करुन वर्तमानपत्रांना सरकारी धोरणाचा प्रचार करण्यास भाग पाडायचं. लेखकांना भरपूर मोबदला देऊन आपल्या धोरणाशी सुसंगत पुस्तके लिहून घ्यायची हे प्रकार सर्रास घडत होते. 

जाॅन गाल्ट ला हेच नको आहे. स्वतःचे अन्न मिळवतांना अवलंबित्व नको, त्यासाठी सगळ्यांना समान शिक्षणाची त्याची मागणी असून . समान संधी देण्यात भेदभाव नसावा, ह्यासाठी तो सरकारच्या विरोधात असल्यामुळे सरकार त्याला अडकवण्याच्या प्रयत्नात आहे. सगळ्या सृजनशील व्यक्तींचा त्याला संप घडवून आणायचा आणि जग चालवणारी मोटार बंद पाडायची. त्याशिवाय सत्तेच्या अनुयायांना जाग येणार नाही हे त्याचं तत्वज्ञान होतं. उद्योजकांना, कलावंतांना शिक्षकांना सोबत घेऊन नव्या जगाच्या निर्मितीचा प्रयत्न करणारा जाॅन गाल्ट हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्याला झाकोळून टाकतं. 

फ्रांसिस्को च्या सहवासात हळवी होणारी डॅग्नी ऑफिसमधल्या खुर्चीवर बसल्यावर एकदम निष्ठूरपणे काम करते. कंपनीचा अध्यक्ष असलेल्या भावालाच काय बोर्ड ऑफ डायरेक्टरांना सुद्धा फैलावर घेते. 

हॅक रिअर्डन चे त्याच्या कामावर असलेली निष्ठा कुटुंबापासून दुर ठेवते तेव्हा त्याची आई आणि पत्नी त्याच्याकडे वेळ मागते तेव्हा तो अगदीच हतबल दिसतो. त्याची पत्नी लिलियन, कायम हॅकला त्रास होईल अशा पद्धतीने वागणारी, त्याला न आवडणारं, न पटणारं जाणीवपूर्वक करणारी, त्याच्या श्रीमंतीची थट्टा करणारी.. 

या प्रातिनिधीक कथानकातून बुद्धी विरुद्ध भावना, मन विरुद्ध कर्तव्य हे तत्वज्ञान मांडताना जगातील सगळी सॄजनशील मने संपावर गेली तर या जगाची काय अवस्था होईल याचं विदारक चित्र रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे.

ह्यातलं तत्वज्ञान जरी बाजुला केलं तरी ही कथावास्तू इतकी सशक्त आहे की मानवी स्वभावाचे वेगवेगळे कांगोरे उलगडवत वाचकाला गुंतवून टाकते.









ंं




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.