महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते, समाजशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, कादंबरीकार व विचारवंत. द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया – प्रथम खंड – (१९०९) हा पीएच्. डी. साठी लिहिलेला ग्रंथ पाश्चात्त्य विद्वानांत गाजला. त्यात मनुस्मृतीचा काल निश्चित केला असून मनुस्मृतिकालीन समाजस्थितीचे विशेषतः जातिसंस्थेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे.
ॲन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स (१९१४) व हिंदू लॉ अँड द मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ द हिस्टॉरिकल स्टडी देअरऑफ (१९१४) या ग्रंथांत भारतीय अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा विचार समाजशास्त्रीय दृष्टीने केला आहे.गोंडवनातील प्रियंवदा (१९२६), ब्राह्मणकन्या (१९३०) इ. सात कादंबऱ्या १९२६ ते ३७ या काळात लिहून केतकरांनी मराठी ललित साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. त्यांच्या कादंबऱ्या इतर कादंबऱ्यांहून अगदी वेगळा अनुभव वाचकांना देतात.महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण (१९२८) या पुस्तकात केतकरांनी आंग्लपूर्व महाराष्ट्रातील वाङ्मयविषयक अभिरुचीचा शोध घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. निःशस्त्रांचे राजकारण (१९२६) व व्हिक्टोरियस इंडिया (१९३७) ह्या दोन ग्रंथांत त्यांचे राजकीय विचार आहेत, महाराष्ट्रीय ज्ञानकोश (विभाग १ ते २३, प्रकाशन १९२१ – २९) हे केतकरांचे खरे जीवितकार्य.
त्यांच्या ज्ञानकोशाने मराठीतील विश्वकोशरचनेचा पाया घातला. ज्ञानकोशाचे जसे संपादक, तसेच व्यवस्थापकही होते. त्यामुळे ज्ञानकोशाच्या कार्यात त्यांचे सर्व कर्तृत्व कसाला लागले. हे कार्य हयातभर पुरेल वीस वर्षांत आटोपणार नाही, असे मोठ्या मोठ्यांचे कयास होते, पण त्यांनी ते १९१५ पासून चौदा वर्षांत हातावेगळे केले. ज्ञानकोश संपत आल्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केतकरांचा गौरव झाला. १९२६ साली ‘शारदोपासक संमेलना’चे व १९३१ साली‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)