बालवाङ्मयाचे लेखक, बालमासिकाचे संपादक, निबंधकार, कोशकार, टीकाकार, अनुवादक. बंगाली भाषेचा आणि बंगाली ग्रंथांचा अभ्यास असल्याने बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ऐतिहासिक, अद्भुतरम्य, सामाजिक कादंबर्यांचे अनुवाद आपट्यांनी केले. ‘भारत गौरव ग्रंथमाले’तर्फे चार खंडांत (१९२३ ते १९२५) हे अनुवाद प्रसिद्ध झाले.
त्यांना आवडलेल्या इंग्रजी कादंबर्यांचा मराठीत अनुवाद केला. त्यात मिसेस हेन्रीवूडच्या ‘इस्टलीन’ कादंबरीचे ‘माणिकबाग’ (१९१४), तसेच ‘मिसेस हॅल्बिर्टसन्स ट्रबल्स’ या कादंबरीचा ‘दुःखा अंती सुख’ (१९१४) या अनुवादित कादंबर्यांचा समावेश आहे.भाषाभ्यासाची विविध अंगे लक्षात घेऊन कोशसदृश पुस्तकांचे लेखनही आपट्यांनी केले. ‘बंगाली-मराठी कोश’ आणि ‘मराठी-बंगाली शिक्षक’ हे ग्रंथ लिहिले. ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ (१९१०) हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात सुमारे चार हजार वाक्संप्रदाय आहेत. ‘संप्रदाय व त्यांची व्याप्ती’ पहिल्या प्रकरणात सांगून पुढे संप्रदायांचे वर्गीकरण केले आहे.
बालसाहित्यासाठीचे त्यांचे योगदान लक्षणीय आहे. १९०६ मध्ये ‘आनंद’ हे मासिक मुलांकरिता सुरू केले. ते आजही नियमितपणे चालू आहे.‘आनंद’ मासिकाव्यतिरिक्त इतर बालवाङ्मय त्यांनी लिहिले. ‘मनी आणि मोत्या’, ‘वीरांच्या कथा’, ‘एका दिवसाच्या सुट्टीत’, ‘मुलांचे अरेबिअन नाइट्स’ इत्यादी कथात्मक पुस्तके तसेच ‘बालरामायण’, ‘बालमहाभारत’, ‘का व कसे?’ इत्यादी उद्बोधक अशी एकूण ५३ पुस्तके त्यांनी मुलांसाठी लिहिली.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आद्य चिटणीसांपैकी ते एक होते. त्यांनी दहा वर्षे चिटणीसपद भूषविले. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)