पुस्तकाचे नाव - जेथोड
लेखक - हिरामण तुकाराम झिरवाळ
सातमाळा डोंगररांगेतील आदिवासी कोकणा समाजाचा प्रेरक सातबारा. ह्या पुस्तकाला डॉ. प्रकाश आमटे ह्यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकाला नुकताच राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी लोक जगण्यासाठी अत्यावश्यक अशा लाकूडफाटा, अन्नधान्य, वैरण, शेतीकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या साठवणीची सुरुवात करणं म्हणजे जेथोड. खुप धावपळ, खुप मेहनत करावी लागते या साठी. डोंगरमाथ्यावर एकदा पाऊस सुरू झाला की तिथल्या लोकांचे आयुष्य थांबून जाते. राहते फक्त जीवंत राहण्याची धडपड.
नाशिकच्या दिंडोरी तालूक्यातील खुंटीचा पाडा या आदिवासी पाड्यावर जन्मलेले किशोर वयापर्यंत तिथेच शिक्षण घेऊन पुढे तहसीलदार झालेल्या युवकाच्या संघर्षासोबतच आदिवासी समाजाच्या जगण्याचा संघर्ष सुध्दा या कथनातून समोर येतो.
या कथनात घरातील अभावग्रस्ततेचा अक्राळस्तेपणा नाही, दारिद्र्याची तक्रार सुध्दा नाही. कोणत्याही अभिनिवेषाशिवाय, कोणावरही दोषारोप न करता निसर्ग आणि माणूस, भुक आणि भाकरी, परिस्थिती आणि प्रयत्न संयतपणे प्रभावी शब्दात मांडली आहे. याचसोबत आदिवासी समाजातील लोकांचा जगण्याचा संघर्ष . त्यांच्या चालीरीती, श्रध्दा अंधश्रद्धा, पृथ्वी स्थिर असून सुर्य तिच्याभोवती फिरतो असे समजणारी जुनी जाणती मंडळी. त्यांच्या या मताला विरोध करणारी शाळेत मुले, औषधोपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून आजारात भगताकडून उपचार करून घेणारे, चूल पेटती ठेवण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने केलेली मजूरी, पाड्यावर पहिल्यांदा लाईट आली तेव्हा साजरा केलेला आनंदोत्सव. हे सगळं वाचतांना लेखकाची शब्द, भाषा, आणि कथनाच्या शैलीवरची पकड जाणवते. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कवीता लेख लिहायला सुरुवात केली होती त्याचाच हा परिपाक जाणवतो. प्राथमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी केलेली मैलोनमैल पायपीट, महाविद्यालयीन शिक्षणासाठी नाशिकला आल्यावर कधी अर्धपोटी तर कधी रिकाम्या पोटाने शिक्षण पूर्ण केले. शिक्षकाची नौकरी लागल्यावर आईला सोबत राहत असतांना शेजारच्या कुटुंबाने गुलाब जाम दिले होते. गोट्या सारखं दिसणारं हे काय आहे हे आईला समजलेच नाही कारण त्याअगोदर आईने गुलाब जाम कधी बघीतलेच नव्हते.
एका जागी बसण्याचा कंटाळा येतो म्हणून शाळेपासून दुर राहणाऱ्या मुलाला त्याचा मोठा भाऊ मारत झोडपत शाळेत नेऊन बसवतो. भावाच्या धाकाने काही दिवस सतत शाळेत बसल्यावर शिक्षणाची गोडी लागते आणि हा शैक्षणिक प्रवास राज्यसेवेची परिक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊनच थांबतो.
लहानपणी खुंटीच्या पाड्यावर मुलाने कसलाही हट्ट केला तर आई त्याला चिडून म्हणायची " मामलेदार लागून गेला का? "
त्यापुढे कोणी अधिकारी असतो हे त्या अशिक्षित भोळ्या भाबड्या माऊल्यांना माहितीच नसायचं. अशा एका माऊलीसमोर तिचा मामलेदार झालेला लेक आल्यावर तिला झालेला आनंद केवळ अवर्णनीय!
एखाद्या विदेशात जाण्याचं स्वप्न बघतो तर कोणी श्रीमंत होण्याचं... एक आख्खं सफरचंद एकट्याने खाण्याचं स्वप्न कोणी बघीतलं असेल का... लहानपणाच्या अभावग्रस्ततेत पारावरच्या टिव्हीवर टुथपेस्टच्या जाहिरातीत मुलगी दाताने सफरचंद तोडून खातांना बघून आख्खं सफरचंद खाण्याचा जो ध्यास घेतला तो नौकरी लागल्यावर पुर्ण करता आला.
"जेथोड" हे तहसीलदार हिरामण तुकाराम झिरवाळांचं आत्मचरित्रासह कोकणा आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचेही रेखाटन आहे.