विंदा करंदीकर

'विंदा करंदीकर


 हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.( मृदगंध, मलपृष्ठावरून )करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ(२००३) याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.