लेखिका - आयन रँड
अनुवाद - मुग्धा कर्णिक
काहींनी अती बौध्दिक म्हणून नाकारली तर काहींनी अती वादग्रस्त होईल म्हणून नाकारली. कोणी म्हटले की विकलीच जाणार नाही. अशा बारा प्रकाशकांनी नाकारलेली कादंबरी १९४३ साली प्रकाशित झाल्यावर अद्यापही जोरात विकली जाते आहे. एक करोडचा आकडा कधीच पार झाला आहे.
आठशे पानांची ही कादंबरी वाचायला सुरुवात केल्यावर प्रत्येक उलटणाऱ्या पानाने बौध्दिक व वैचारिक पातळीवर एखाद्या उत्तुंग शिखरासारखी वाटते जे सर करायला अत्यंत अवघड आहे. असे असले तरीही वाचणं थांबवावं असं वाटत नाही.
वास्तुशिल्प कला, बाधकाम व्यवसाय आणि वर्तमानपत्र व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर घडत जाणारे कथानक.
हाॅवर्ड रोर्क आर्किटेक्ट. स्वतः ला काय हवं आहे, काय करायचं आहे ह्याचं नेमकं आकलन झालेला. बांधकामाच्या ठिकाणी मजूरी करून शिक्षण घेणारा....तूम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही ह्याचा विचार मी करीत नाही. मी कोणाच्याही कल्पना स्वतः वर लादून घेणार नाही. मला स्वतःच्या कल्पनांना मुर्त रुप द्यायचं आहे. प्रत्येक इमारतीला वेगळी ओळख असते असं म्हणणारा. स्वत:चा स्वाभिमान जपणारा.
पीटर किनिंग अत्यंत स्वार्थी, दुसऱ्याचं काम स्वतःचं म्हणून पुढे करणारा. प्रगतीच्या आड कोणी येत असेल तर त्याला संपवणारा. काॅलेजात असतांना त्याला रोर्क आपला स्पर्धक बनेल ह्याची भिती वाटायची.
एल्सवर्द टुही वर्तमानपत्राचा स्तंभ लेखक आणि प्रभावी वक्ता, आपल्याकडील आयुधाने कोणालाही सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध करणारा..
डाॅमिनिक फ्रॅकन एक बिनधास्त तरुणी, पीटर किनिंग च्या बाॅसची मुलगी. ती सुध्दा स्तंभलेखक आहे. पीटरने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मला स्वतःला शिक्षा करावीशी वाटली तर मी तुझ्याशी लग्न करेन असं उत्तर तिने दिलं होतं. हाॅवर्ड रोर्क उत्कृष्ट आर्किटेक्ट आहे हे मान्य असुनही रोर्कला काम मिळू नये यासाठी प्रयत्न करायची.
मोजक्याच प्रसंगात येणारा पण बहुतांश कथानक व्यापणारा हेन्री कॅमेराॅन. कधी काळी अत्यंत प्रसिद्ध असणारा आता व्यसनापायी दुर्लक्षित झालेला मनस्वी आर्किटेक्चर.
गेल वायनाड आपले आई बाप कोण आहेत हे माहीत नसलेला महत्वकांक्षी तरुण ज्याने झोपडपट्टी पासून सुरुवात करुन आता वर्तमानपत्र समुहाचा मालक आणि रियल इस्टेट व्यवसायात नाव कमावलेला.
अशी वेगवेगळी स्वभाव वैशिष्टे असलेली केंद्रस्थानी राहणारी महत्वाची पात्रे.
हाॅवर्ड रोर्क च्या स्वभावामुळे अनेकदा त्याला काम मिळता मिळता राहतं कारण कोणतीही कसलीही तडजोड स्विकारण्यास तो तयार नाही. इमारतीचं डिझाइन एकदा मान्य केल्यावर कोणत्याही बदलास तो तयार नाही. पीटर किनिंग पाहिजे तेवढ्या तडजोडी करून काम मिळवून प्रगती पथावर असतो. त्याच्या कामाचे गोडवे एल्सवर्द टुही वर्तमानपत्रातून करीत राहतो. एका मंदिरांच्या इमारतीचं काम पूर्ण झाल्यावर त्यातल्या एका शिल्पाकृतीमुळे हे मंदिर वाटतच नाही म्हणून हाॅवर्ड रोर्क वर खटला भरला जातो. त्यावेळी त्याच्यावर टिकेची झोड उठवणारा एल्सवर्द टुही असतो.आपल्या स्तंभलेखनातून यथेच्छ बदनामी करतो. खटला दाखल करण्यासाठीही टुहीनेच पडद्यामागून कारवाया केलेल्या असतात. हाॅवर्ड रोर्क च्या बाजूने मनात द्वेष असुनही एकटी डाॅमिनिक फ्रॅकन बोलते. तिला माहिती असतं की हे ठरवून केलेलं आहे. हाॅवर्ड रोर्क खटला हारतो. नुकसान भरपाई द्यावी लागल्याने तो कफल्लक होतो. त्याला फसवण्यासाठी एका प्रकल्पाचं काम त्याला दिलं जातं तो यशस्वी झाल्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागते.
डाॅमिनिक फ्रॅकनने पीटर किनिंगशी लग्न केलेलं असतं. गेल वायनाडचा एक मोठा प्रकल्प मिळवण्यासाठी तो आपल्या बायकोला डाॅमिनिकला गेल वायनाडकडे पाठवतो. त्या प्रकल्पाच्या बदल्यात गेल वायनाड तिचा दोन महिन्याचा सहवास मागतो. ती तयार होते, काम मिळवण्यासाठी पीटर किनिंग सुध्दा तिला वायनाडकडे पाठवतो. नंतर पीटर किनिंग ला सोडून ती गेल वायनाडशी लग्न करते. पीटर किनिंग शी लग्न करण्याअगोदर तिचा हाॅवर्ड रोर्कशी संबंध आलेला असतो. त्या खटल्यात त्याला वाचवू न शकल्याचा अपराधीपणा तिला खात असतो.
अशातच गेल वायनाड त्याच्या स्वप्नातलं घर बनवण्यासाठी हाॅवर्ड रोर्कला भेटतो. अनेक वळणं घेत कथानक इथपर्यंत आल्यावर ह्या ठिकाणी कलाटणी मिळते.
कथानकात मुख्य लढा हाॅवर्ड रोर्क आणि एल्सवर्द टूही च्या मधे. नवनिर्माणाचे प्रतिक असलेला हाॅवर्ड रोर्क आणि त्या नवनिर्माणाला बदनाम करणारा एल्सवर्द टूही.
या कथानकाच्या ओघात लेखिका आयन रँड ने मानवी मुल्याचं विवेचन केलं आहे. नवनिर्माणाचे प्रतिक असलेला हाॅवर्ड रोर्क आणि त्या नवनिर्माणाला बदनाम करणारा एल्सवर्द टूही. परंपरेच्या जोखडातून समाजाने मुक्त होऊ नये हे प्रस्थापितांचे हेतू असतात हेच तत्वज्ञानाचे मुख्य सुत्र मांडले आहे. एखाद्या गोष्टीपर्यंत माणसाला पोहोचता आलं तर ती पुरेशी उच्च नसते एखाद्या गोष्टीचं कारण कळली तर ती फारशी महान नसते आणि एखाद्या गोष्टीचा तळ गाठता आला तर ती पुरेशी खोल नसते. आजच्या युगात आजवरच्या संपूर्ण वाटचालीत आपले भवितव्य कसे असायला हवे याचे चित्र कल्पन्याची सर्वात अधिक गरज मानव जातीला वाटावी अशीच जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मानवी मूल्यांची जाणीव करून देण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मानवी स्वभावाचे विविधांगी कांगोरे उकलण्याचाही हा प्रयत्न आहे जो यशस्वी झाला असेच म्हणावे लागते.
या घृणास्पद वाटणाऱ्या जगालाही पुरून उरण्याची आणि उंच जाण्याची विजीगिशू वृत्ती या कादंबरीच्या नायकांमध्ये हाॅवर्ड रोर्क मध्ये दिसते ती सुध्दा अधिक महत्त्वाची आहे.
रुढार्थाने ही कादंबरी नाही. कादंबरीच्या खूप पलीकडे जाऊन कादंबरीचा फक्त आधार घेत खूप खोल अशी तात्विक चर्चा आहे.
कोर्टलँड प्रोजेक्ट उडवून लावल्यानंतर ऱोर्कने ज्युरींसमोर मांडलेली त्याची बाजू म्हणजे ह्या पुस्तकाचं सार आहे.