वि. ग. कानिटकर
चीनच्या प्रचंड भूमीवर एक मुखी सत्ता गाजवणारा हा मार्क्सवादी हुकूमशहा होता तरी कसा. कवी असलेल्या या माणसाने कधी मुसोलिनी हिटलर प्रमाणे जगाला उद्देशून गर्जना केल्या नाहीत. वरून शांत दिसणारा, मनातून गुप्त हेतूंचे गर्भ वाढवणारा, निर्णयाला खंबीर आणि कधीकधी क्रूर देखील होऊ शकणारा हा पुरुष घडला तरी कसा.
माओचे त्याच्या वडिलांशी कधीही पटले नाही. ते नेहमी त्याला घालून पाडून बोलत असे. चार चौघांमध्ये सहज अपमान करीत असे. एकदा घरी बरीच माणसे जमली असताना वडील माओला मनाला लागेल असे बोलले. वडिलांना उलट उत्तरे करून त्याच पावली माओ घराबाहेर पडला. मागून त्याची आई धावत निघाली, तळ्याच्या काठावर जाऊन माओने आत्महत्याची धमकी दिली तेव्हा बाप नरमला. पुन्हा अंगावर हात टाकणार नाही व इतरांच्या देखत अपमान करणार नाही या अटीवर माओ घरी परतला. याप्रसंगाचे सार सांगताना माओ म्हणतो, आता माझे वडिलांची वितुष्ट संपले. यापासून मी हा धडा घेतला की जेव्हा माझ्या हक्कासाठी मी वडिलांविरुद्ध उघड बंड केले व प्रतिकारला सज्ज झालो तेव्हाच वडिलांनी लगेच नांगी टाकली. जोपर्यंत मी गरीब पणाने सर्व सहन करीत होतो तोपर्यंत माझा मार आणि आपण वाढतच चालला होता.
१९११ ला चीनमध्ये क्रांती होऊन राजसत्ता लयाला गेली आणि प्रजासत्ताक स्थापन झाले पण सत्तेवर काही विवक्षित लोकांची पकड होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यात काहीही फरक पडला नव्हता. त्यावेळी माओ विद्यार्थी दशेत होता. आणि कम्युनिस्ट पार्टीत सामील झालेला होता.
त्या अगोदरच्या काही दशकात आशियातल्या या अजस्त्र देशाचे राजकीय लचके भराभर तोडले गेले होते. जपानने लीवू व चीवू बेटे वेगळी काढली, फ्रेंचांनी अण्णामचा तुकडा पाडला, जपानने चीनचा लष्करी पराभव करून कोरियावर कब्जा केला होता. सत्ताधाऱ्यांना पैसे चारून रशियाने पोर्ट ऑर्थर व दायीरेन ही बंदरे घेतली मानचुर्यात रेल्वे बांधण्याचे अधिकार मिळवले. इंग्लंडने ही रेल्वेची कंत्राटी मिळवली. फ्रेंचांनी कांगचौ उपसागरातील आरमारी ठाणे बळकवली. जर्मनीच्या कैसरने त्सिंगटो शहर ताब्यात घेतले.
गोंधळाच्या अवस्थेत सत्ताधारी फक्त लाच घेण्यात, खिसे भरण्यात व्यस्त होते. लोकशाहीच्या अजब खेळात महत्वकांक्षी नेते एकमेकांवर कुरघोडी करीत होते.
वयाच्या तेराव्या वर्षी माओची शाळा संपली फावल्या वेळात तो पुस्तके गोळा करून वाचत असे. दिशाहीन वाचन चालू असताना त्याच्या असे पुस्तक हाती लागले त्यात अनेक सुधारणावादी विचारवंत लेखकांचे लेख होते. विज्ञानाभिमुख झाल्याशिवाय चीनला तरुण उपाय नाही असे मत या पुस्तकात मांडलेले होते. हे वाचून माओ अस्वस्थ झाला. आपण पुढे शिक्षण घेतले पाहिजे या विचाराने तो शिक्षणासाठी त्याने घर सोडले.
शिक्षण चालू असतानाच तो मार्क्सवादाने प्रभावित झाला होता. पुढे पेकिंग ला आल्यावर पॅकिंग महाविद्यालयात ग्रंथपाल सहाय्यक म्हणून नोकरी केली. त्याचे वाचन चांगलेच वाढू लागले होते राजकारणाचाही अभ्यास होत होता. विद्यार्थी संघटनांसोबत राजकारणातही भाग घेऊ लागला. एका साप्ताहिकाचे संपादनही करू लागला. माओच्या जळजळीत लिखाणामुळे सरकारने या साप्ताहिकावर बंदी घातली. त्यामुळे तो एकदम प्रकाशझोतात आला. कम्युनिस्ट पक्षात त्याने चांगलीच प्रगती केली होती.
देशातली हालाखी आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती बघत असताना माओच्या मनात आपल्या देशासाठी आपण निर्धारपूर्वक काही केले पाहिजे हा झपाटणारा विचार वाढत होता.
क्रांती म्हणजे काही जेवणावळ नाही की निबंध लेखन नाही की चित्र काढणे नाही की भरत काम नाही. क्रांती ही अशी सुसंस्कृत, मृदू, विचारी, नम्र, मर्यादाशील आणि उदारही नसते. क्रांती म्हणजे एक उद्रेक असतो. एक अशी हिंसक कृती असते की जिच्यामुळे एक वर्ग दुसऱ्या वर्गाचे वर्चस्व झुगारून देतो.
माओने आता सैन्य जमवायला सुरुवात केली. आणि लाॅंगमार्चची सुरूवात केली. एक एक गाव खेडं ताब्यात घेऊ लागला.
गनिमी युद्ध हे स्थानिक लोकांच्या पाठिंब्याशिवाय खेळता येत नाही यासाठी लोकशाही मार्गाची कास धरावी लागते जनतेची दुःख समजून घेऊन त्यांना दिलासा द्यावा लागतो.
हे सगळं माओने केलं.
१ ऑक्टोंबर १९४९ ला पेकिंग येथे माओ त्से तुंग याने जनतेच्या प्रजासत्ताकाचा जन्म झाल्याची द्वारी फिरवणारे लाल निशान फडकवले.
१९५५ मध्ये रोबेर गिलॅ या फ्रेंच पत्रकाराने चीनमध्ये देशभर दौरा करून या प्रवासात त्याने जे पाहिले त्याचे वर्णन केले आहे.
" सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावलेले आहे काही वर्षांपूर्वी चीनमध्ये लाचलुचवत आणि नालायक अधिकारी यांचा सुळसुळाट होता तिथे आज लाच लुचवत औषधालाही नाही सरकारी संस्थांचे व्यवहार सर्वात चोख आहेत. रस्ते बसेस स्वच्छ आहेत सर्वत्र प्रचंड बांधकामे सुरू आहेत शहरातील ९०% मुले शाळेत जातात १९४९ सालापासून वस्तूंच्या किमती स्थिर आहेत."
माओ त्से तुंग चीनी जनतेचा राष्ट्रपिता हा कवी मनाचा असा एक क्रांतिकारक होता ज्याच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या वाटेवर गेला. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे जवळपास 27 वर्षे ते चीनचे आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा होते.