लेखक - वि. ग. कानिटकर
बायबल संबंधी किंवा शेक्सपियर संबंधी जितके लिहिले गेले आहे त्यापेक्षा लिंकनविषयक लिखाण शब्द संख्येने अधिक झाले आहे.
कुठल्याही अर्थाने तो मोहक नव्हता, परंतु तो कुरूपही म्हणता येणार नाही. तो एक घरगुती माणूस होता, आपण दिसतो कसे याची त्याला परवा नसे. वागणूक अगदी सरळ. त्याच्यापाशी खानदानी दिमाख नव्हता. तशी तथाकथित दाखवेगिरी अथवा तोरा सुध्दा नव्हता. घरीदारी सदा सर्वदा तो साधासुधाच भासे. त्याच्या चेहऱ्यावर मात्र तो कष्टी वाटे आणि त्याची ती खिन्नता तो चालत असताना देहभर ओसंडत असे. कधी विमनस्क, कधी विचारमग्न तर कधी आनंदी असा आळीपाळीने दिसायचा. होता मात्र खुप गमत्या, आणि हजरजवाबी!
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सर्वसाधारण माणसाने, अब्राहम लिंकनने पुढे अमेरिकेचे अध्यक्ष पद भूषवले.
शाळेत जाण्याच्या वयातच अब्राहमला वाचण्याची विलक्षण गोडी लागली. त्याच्या घरी राहणारा त्याचा मामा डेनिस हॅक्स याने आठवणीत सांगितले आहे की, बारावे वर्ष लागले आणि त्यानंतर मला ऍबे पुस्तकाशिवाय पाहिल्याचे स्मरत नाही. सदऱ्याच्या खिशात किंवा पॅंटच्या खिशात पुस्तक कोंबुनच तो नांगरणीसाठी वा चर खणण्यासाठी जाई. दुपार झाली की एखाद्या झाडाच्या सावलीत एकीकडे न्याहारी घेताना तो सारखा पुस्तक वाचत असे. त्याला जर कोणी विचारले सारखा वाचतोस काय...तर तो सांगे मला जे ठाऊक असावेसे वाटते ते सगळे पुस्तकात असते जो कोणी मी न वाचलेले पुस्तक मला देईल तो माझा उत्तम मित्र वाटतो.
एकंदर किती दिवस आब्राहम प्रत्यक्ष शाळेत गेला याचे सर्व दिवस मोजले तर ते एक वर्षाहून कमी भरतात. त्याचे नंतरचे सर्व शिक्षण हे त्याचे त्याने निरीक्षणाच्या आणि वाचनाच्या आधारे केलेले आहे.
किशोरवयात एका दुकानात काम करीत असताना कामानिमित्त तो न्यू ऑर्लिन्स या शहरात गेला होता. शहरात शिरताच साखळदंडांनी एकत्र बांधलेले निग्रो गुलामांचे तांडेच्या तांडे अब्राहमच्या नजरेस पडले. तिथे राजरोस निग्रो गुलामांची खरेदी विक्री होत असे. उपयुक्त मानवी पशु याच दृष्टीने त्यांच्याकडे सर्वजण पाहत होते.
गुलामगिरी पध्दतीचे उच्चाटन करण्यासाठी नंतर अब्राहम लिंकन ने आयुष्य वेचले.
काही महिने तो सैन्यातही होता. मात्र राजकारण खुणवू लागल्याने इलिनाॅईस राज्यात तो निवडणूकीत उभा राहिला. आणि पदरी पराभव पडला मात्र जी मते मिळाली ती उत्साह वाढवणारी होती. पुढच्या निवडणुकीत अब्राहम लिंकन निवडून आला. आणि वयाच्या पंचविशीत आमदार झाला. आमदारकीच्या काळातच आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. तत्पूर्वी त्याने एक दुकान चालवून नंतर दिवाळखोरी जाहीर केली. पोस्टमास्तरकी केली आणि जमीन मोजण्याचे ही काम केले.
प्रतिष्ठित वकील, व्हिग पक्षाचा नेता आणि विधानसभा सदस्य म्हणून बघता बघता अब्राहम लिंकन या नावाभोवती नवी झळाळी निर्माण झाली.
अब्राहम लिंकन राजकारणात वावरत असे व राजकारणी म्हणून ओळखला जाऊ लागले होते, पण राजकारणी मंडळीतला फक्त खरे तेच बोलणारा हा एकमेव माणूस आहे असेही लोक सांगत.
त्यांचं परमेश्वरावर विश्वास नव्हता बायबल मधून परमेश्वराचे प्रगटीकरण होते असे मला वाटत नाही त्याचप्रमाणे येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे या गोष्टीवरही माझा विश्वास नाही असे ते म्हणायचे.
अमेरिका हा वेगवेगळ्या राज्यांनी बनलेला देश. त्या त्या राज्याचे कायदे वेगळे. काही राज्यामध्ये गुलामगिरी कायदेशीर तर काही राज्यात गुलामगिरीला थारा नव्हता. अमेरिकेच्या जाहीरनाम्यात सर्व मानव समान आहेत या कलमानुसार काही लोक गुलामगिरीला विरोध करीत त्यात अब्राहम लिंकन अग्रभागी होते. गुलामगिरी जर वाईट प्रथा नसेल तर जगात कोणतीही गोष्ट वाईट नाही. असे ते म्हणत.
गुलामगिरी कायदेशीर असणारी दक्षिणेकडील राज्ये आणि गुलामगिरीला थारा न देणारी उत्तरेकडील राज्ये ह्यांच्यात संघर्ष उफाळून आला तो अब्राहम लिंकन अध्यक्ष झाल्यावर.
आमच्या प्रदेशात गुलामी प्रथेचे विषारी रोपटे मोजू देणार नाही असे म्हणणारे उत्तरेचे राजकारणी आणि गुलामांची प्रॉपर्टी धोक्यात येणार असेल तर देशाचे दोन तुकडे करू या अभिनिवेशाने बरळणारे दक्षिणेतील राज्यांचे नेते देशाला फाळणीकडे नेत होते.
गुलामांना मुक्त न करता देशाचे विभाजन थांबणार असेल तर ते मी करीन. काही गुलामांची मुक्ती साधत आहे परंतु इतरांची नाही पण देश अखंड राहत असेल तर तेही मी करीन. असे म्हणत वेगळ्या होणाऱ्या राज्यांवर सैनिकी कारवाई करायला अब्राहम लिंकन यांनी मागेपुढे बघितले नाही. त्यांची अध्यक्षीय कारकीर्द पूर्णपणे आपसातल्या यादवी युद्धातच गेली. अमेरिकेचे अध्यक्ष होण्याच्या अगोदर अब्राहम लिंकनचा कधीही सैन्याशी संबंध आलेला नव्हता. त्यामुळे सुरूवातीला निर्णय घेण्यात चाचपडणं होत होतं. अडखळल्यासारखं होत होतं. या चुकातून शिकत अनुभव घेत त्यांनी युद्धाचं नेतृत्व केलं. आणि देशाचे होणारे विभाजन त्यांनी टाळले.
त्याचा परिणाम म्हणून गुलामगिरी समर्थकांकडून त्यांची हत्या करण्यात आली. त्याच्या प्रत्यक्ष खुन्यांना शासन झाले असले तरी अनेक संशयास्पद गोष्टी व अनुत्तरित प्रश्न या हत्येनंतर समोर आलेले आहेत. अब्राहम लिंकन च्या हत्येमागे असलेले अप्रत्यक्ष हात अंधारातच असावेत.