लेखिका - विजया जहागीरदार
महाभारतातल्या एका उपाख्यानावर आधारलेली ही कादंबरी आहे. धर्माच्या नावाखाली राजे महाराजे आणि ऋषीमुनी देखील स्त्रीच्या कोवळ्या जीवनाचे कसे लचके तोडीत होते याचे भेदक पण उत्कंठावर्धक चित्रण या कादंबरीत केले आहे.
गालव ऋषी हे महर्षी विश्वामित्रांचे शिष्य. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर महर्षी विश्वामित्रांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. गालव ऋषींकडे व त्यांच्या पित्याकडे धनसंचय नाही हे जाणून महर्षी विश्वामित्रांनी काहीच मागणी केली नव्हती परंतु गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणे त्यांना पटेना. त्यांनी वारंवार महर्षी विश्वामित्रांकडे विचारणा केल्यावर रागाच्या भरात महर्षी विश्वामित्रांनी आठशे अश्वांची मागणी केली. त्यांचा रंग शुभ्र आणि कान एका बाजूने काळे हवेत अशी अट पण टाकली.
अशा विशिष्ट अश्वांचे दान मागण्यासाठी गालव ऋषीं ययाती राजाकडे आले. ययाती राजाकडे ही असे अश्व नव्हते. शिवाय दस्युंच्या वारंवार आक्रमणामुळे राजकोष ही कमी होता म्हणून व रिक्त हस्त जाणाऱ्या ऋषींच्या शापाला घाबरून ययाती राजाने आपली कन्या माधवी गालव ऋषींना दान देऊन ज्या राजाकडे असे अश्व असतील त्या राजाशी माधवीचे लग्न करून ते अश्व घ्यावेत असे सुचवले व गालव ऋषींनीही याला मान्यता दिली.
माधवी फक्त सतरा वर्षाची नवयौवना मद्र देशाचा राजा अंबरीशच्या प्रेमात पडलेली होती. पण कन्या कर्तव्य म्हणून ती गालव ऋषींसोबत निघाली.
पण कोणत्याही राजाकडे आठशे अश्व नव्हते. तीन राज्यांकडे दोन दोनशे अश्व होते. त्यांनी माधवी पासून पुत्र प्राप्तीच्या बोलीवर अश्वांचे दान द्यायचे कबूल केले.
माधवी प्रत्येक राजाकडे वर्षभर राहातचं, राजाला पुत्र प्राप्ती झाल्यावर तिने परत गालव ऋषींकडे जायचं. मग गालव ऋषी तिला दुसऱ्या राजाकडे घेऊन जात.
कर्तव्यापोटी केवळ पुत्रदानासाठी चार पतींना करावे लागलेले देहदान, त्या पाठीमागचा संताप, नंतर प्रत्येक पुत्र जन्मानंतर त्याच्याबद्दल वाटणारे अत्यंत वात्सल्य आणि लगेच पुत्र पतीची होणारी ताटातूट हे सर्वच प्रसंग वाचकांना व्याकुळ करणारे आहेत.
पुरुषप्रधान संस्कृती आणि धर्मविषयक कर्मकांड यात नेहमी बळी दिला जातो तो स्त्रीचा अगदी सर्व दृष्टीने पुरुषा इतकी समर्थ असताना देखील तिच्याकडून कुटुंबाने व समाजाने नानाविध अपेक्षा हक्काने करायचे असतात तिने मात्र कुणाकडूनही काही मागायचं नसतं ती सर्वांचीच असते फक्त स्वतःचीच कुणी नसते.