राॅसवेल घटना

राॅसवेल घटना - अफवा आणि सत्य

१९४७ सालापासून ‘अंतराळातील अन्य जीव’ हा विषय खूप वेळा चर्चेत आला होता. जनतेत त्याबद्दल कमालीची उत्सुकता होती. १९४७ साली घडलेल्या त्या प्रसंगाला ‘रॉसवेल घटना’ असे नाव मिळाले होते. रॉसवेल हे न्यू मोक्सिकोमधील एका गावाचे नाव होते व तिथे परग्रहावरील एक यान कोसळल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. तेव्हापासून ‘उडत्या तबकड्या’ हा विषय सुरू झाला होता. परग्रहावरून त्या तबकड्या येतात असे लोक मानू लागले होते. तसे सिद्धान्त अनेकांनी तयार केले होते. त्यावर विश्वास ठेवणारी माणसे अद्यापही रॉसवेलला भेटी देऊन येत. 



 ती घटना म्हणजे ‘प्रोजेक्ट मोगल’ या नावाने एका नवीन अज्ञात रचनेच्या हवाई फुग्याचा अपघात होता. एका राक्षसी फुग्याची निर्मिती करून तो अवकाशात सोडून त्याद्वारे रशियातील अणुस्फोटाच्या चाचण्यांचा वेध घेणे, हे त्या प्रोजेक्ट मोगलचे उद्दिष्ट होते. त्या प्रायोगिक फुग्याचे उड्डाण झाल्यावर भरकटत तो फुगा न्यू मोक्सिको येथे गेला व खाली कोसळला. लष्कराची माणसे तिथे पोहोचण्याअगोदर एका नागरिकाने त्या जागी जाऊन कोसळलेली गूढ यंत्रसामुग्री पाहिली. त्यातून एक अफवांची मालिका जन्म पावली. 

घडत गेले ते असे : ज्या नागरिकाने तो कोसळलेला फुगा व त्याला जोडलेली यंत्रसामुग्री पाहिली, त्याचे नाव विल्यम ब्रॅझेल होते. तो एक मोठा शेतकरी होता. वाळवंटात कोसळलेल्या फुग्याची यंत्रे त्याला योगायोगाने दिसली. फुग्याचे रबर नेहमीचे नव्हते. ते कृत्रिमरित्या तयार केलेले निओप्रेन रबर होते. ही गोष्ट जनतेला अद्याप ठाऊक नव्हती. तसेच, जी यंत्रसामुग्री होती ती अत्यंत हलक्या मिश्रधातूपासून बनवली होती. तसले मिश्रधातू बाजारात आले नव्हते. १९४७ सालची ही घटना आहे. प्रयोगशाळेतील शोधांचा उपयोग व्यवहारात येण्याआधी लष्कराने केला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्याला हा सारा प्रताप परग्रहावरून आलेल्या एखाद्या उडत्या यंत्राचा असावा असे वाटले. त्याने ताबडतोब गावच्या पोलीस प्रमुखाला, शेरीफला घटनास्थळी बोलावून घेतले. त्या मागोमाग वृत्तपत्रांची माणसे आली. सर्व बातमीला अतिरंजित प्रसिद्धी दिली गेली. मग जनतेची उत्सुकता वेगाने वाढत गेली. 

लष्कराचा तो प्रयोग गुप्त असल्याने ती सर्व यंत्रसामुग्री आपली नाही असा दावा त्यांनी केला. त्यामुळे झाल्या घटनेचे गूढ वाढत गेले. शेवटी वार्ताहरांनी या गोष्टीचा छडा लावण्यास सुरुवात केली. हळूहळू ते ‘प्रोजेक्ट मोगल’च्या दिशेने जाऊ लागले. आता मात्र अमेरिकेचे लष्कर खाते पेचात पडले. हा सारा प्रकल्प अतिगुप्त स्वरूपाचा होता. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हेरगिरी करणारा फुगा आकाशात सोडला, ही बातमी खळबळजनक ठरणार होती. यातून पुढे काहीही घडू शकणार होते. जगाच्या रंगमंचावरती राजकीय उलथापालथी घडू शकणार होत्या. 

अन् मग काहीतरी अद्भुत घडले. 

वृत्तमाध्यमांनी या घटनेमधून एक अनपेक्षित निष्कर्ष काढला. गूढ असणारी व भविष्यकाळातील वाटणारी ती यंत्रसामुग्री ही परग्रहावरील जीवांनी तयार केलेली असून ते जीव पृथ्वीवरील माणसांपेक्षा अधिक प्रगत आहेत, बुद्धिमान आहेत व विज्ञानात फार पुढे पोहोचलेले आहेत. त्यातून लष्कराने ती यंत्रसामुग्री आपली असल्याचे नाकारले असल्याने वृत्तलेखकांच्या या शोधाला आणखीनच बळकटी मिळाली. शेवटी ‘परग्रहावरील जीव पृथ्वीला भेट देऊ लागले’ ही कल्पना जनमानसात पक्की होत गेली. 

अमेरिकेच्या लष्कराला आपली गुप्तता राखण्यासाठी या अफवेचा अनपेक्षितपणे फायदा होत असल्याने त्यांनीही ती कल्पना उचलून धरली. सबंध जगाला काल्पनिक परग्रहावरील जीवसृष्टीचा धोका वाटला तर बिघडले कुठे? त्यामुळे रशियन सरकारला मात्र आपल्या प्रोजेक्ट मोगलबद्दल संशय येणार नाही. अन् ही गोष्ट महत्त्वाची असल्याने अमेरिकी लष्करानेही वृत्तसृष्टीच्या सुरात आपला सूर मिळवला. 

परग्रहावरील माणसांच्या किंवा जीवांच्या पृथ्वीला दिल्या जाणाऱ्या भेटींची कल्पना आणखी दृढमूल करण्यासाठी अमेरिकेचे हेरखाते आता पुढे सरसावले. त्यांनी गुप्तपणे रॉसवेल गावातील घटनेमध्ये हवा तो मालमसाला घालून त्याच्या कथा बाहेर फोडावयास सुरुवात केली. ‘आतील गोटातील ही गुप्त बातमी बाहेर फुटली आहे’ असा भास होऊ देण्याची त्यांनी खबरदारी घेतली होती. त्यातून आणखी गूढ बातम्यांना त्यांनी जन्म दिला. ‘असेच एक अंतराळयान सरकारकडून पकडून ताब्यात घेतले आहे.’, ‘डेटन गावातील लष्करी विमानतळावरती एक हॅन्गार-१८ नावाच्या ठिकाणी त्या यानातील परग्रहावरील मृत व्यक्तींचे देह बर्फामध्ये जतन करून ठेवले आहेत.’ अशा अफवा योजनापूर्वक पेरून त्यांचा प्रसार केला गेला. त्यामधून नवीन अफवा आपोआपच जन्म घेत गेल्या. त्यानंतर जेव्हा जेव्हा एखाद्या नागरिकाला लष्कराचे प्रायोगिक अवस्थेतील अद्ययावत विमान कोसळलेले सापडे तेव्हा हेरखाते आपल्या कानावरती हेतुपूर्वक हात ठेवे. त्या बातमीबद्दल काहीही न बोलणे, मौन धारण करणे, यामागे ‘नक्कीच काहीतरी पाणी मुरते आहे’ असा संशय जनतेच्या मनात येई. हेरखात्याला नेमके हेच हवे असायचे. शेवटी अशी एखादी बातमी आली की लोक मनात म्हणायचे, पडले ते विमान नाही, ते एक परग्रहावरील अंतराळयान आहे.

( आधारीत ) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.