लेखक - डॅन ब्राऊन
अनुवाद - अशोक पाध्ये
एका उल्केच्या शोधाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांनी ७ ऑगस्ट १९९६ ला पत्रकार परिषदेत एका उल्केच्या शोधाबद्दल माहिती सांगीतली होती. प्राथमिक विष्लेषणावरुन त्या उल्केवर काही जीवाश्म असण्याची शक्यता वर्तवली होती. यावरून डॅन ब्राऊन ह्यांना ही कादंबरी सुचली.
कथानक अर्थातच काल्पनिक आहे.
देशात राष्ट्राध्यक्ष पदासाठी रणधुमाळी माजलेली असतांना विरोधी पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सेक्स्टन हे आपल्या प्रचारात नासाच्या अवाढव्य खर्चावर टिका करतांना ह्यातला निधी शैक्षणिक बाबींवर खर्च करावा हा मुद्दा मांडतात.
सेक्स्टनची मुलगी रॅकेल अशा एका सरकारी संस्थेत काम करते जिथे सगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते. त्यातल्या महत्वाच्या माहितीचा गोषवारा काढून अध्यक्षांकडे पाठवली जाते.
नासाने लावलेल्या एका शोधाबद्दल खात्री करून घेण्यासाठी अध्यक्ष रॅकेलला उत्तर ध्रुवावर नासाच्या तळावर पाठवतात. तिनशे वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेली आणि आता उत्तर ध्रुवावरील बर्फाळ प्रदेशात दोनशे फुट खाली दबलेली उल्का नासाला सापडली होती. तिचे जे नमुने काढले गेले त्यावर काही जीवाष्म आढळले होते. आत्तापर्यंत सापडलेल्या उल्कांपैकी ही उल्का सगळ्यात मोठी होती. उल्का बाहेर काढल्यावर तिथे मोठ्या विहिरीसारखा आकार बनतो ज्यात पाणी साठलेले होते.
फक्त नासाच्या वैज्ञानिकांवर न विसंबता काही जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, हिमनदी शास्रज्ञ, सागर वैज्ञानिकांकडुन सुध्दा खात्री पटवून एका पत्रकार परिषदेत ही बातमी सांगीतली जाते. विरोधी उमेदवाराच्या मुलीने रॅकेल ने या घटनेची सत्यता सांगीतली असल्याने बातमीचे महत्त्व अधिक वाढते या घटनेचा माहितीपट बनवून सबंध अमेरिकेत नासाच्या या यशाचे कौतुक केले जाते आणि अध्यक्षीय निवडणुकीचा रागरंग पलटतो.
पत्रकार परिषदेनंतर नासाच्या तळावर पार्टी चालू असतांना एक शास्रज्ञ त्या विवराकडे जातो. बारकाईने बघितल्यावर त्याला त्या पाण्यात काहीतरी वेगळेपण जाणवते. पाण्याच्या नमुन्याचे परिक्षण केल्यावर त्याच्या मनातील शंका दूर झाली असती म्हणून तो पाण्याचा नमूना घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्या विवरात पडतो. त्याला शोधायला आलेल्या इतर शास्रज्ञांना सुध्दा विवरातील पाण्याचे वेगळेपण जाणवते. पण बुडालेला शास्रज्ञ तळाशी गेलेला असल्यामुळे दिसत नाही. त्यांची चर्चा चालू असतांना नासाचा प्रकल्प प्रमुख त्यांना विरोध करतो. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी एका विशिष्ट कॅमेरातून फोटो काढण्यासाठी पाच सहाशे मीटर दुर जाण्याची गरज होती. ध्रुवीय प्रदेशात हे अंतर फार मोठे वाटते म्हणून विषिष्ट सुरक्षित पोशाख घालून रॅकेल आणि इतर तीन शास्रज्ञ जातात.
फोटो काढल्यावर लगेच त्या यंत्रातून फोटोची प्रींट बाहेर येते.
त्या प्रींट आऊट वर त्या विवराचं खालचं तोंड समुद्राला भिडलेलं दिसत होतं. आणि दिसत होता एक मानवी देह.
तो अवाढव्य उल्कापिंड खालच्या बाजूने हिमखंडात घुसवल्याचं फोटोत दिसत असल्यामुळे उल्केचा लागलेला शोध खरा की खोटा......
त्याच वेळी अचानक एक शास्रज्ञ काही तरी अंगावर आल्याने कोलमडून पडतो. रॅकेलच्या लक्षात येतं की त्याला गोळी लागली असुन कोणीतरी सगळ्यांनाच मारण्यासाठी येताहेत. आणि सुरू होतो ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात जगण्या मारण्याचा थरारक संघर्ष....
कथानक अत्यंत वेगवान असून अवकाश, उल्का, सागरी जीव याबद्दल पुष्कळशी वैज्ञानिक माहिती कथानकाच्या ओघात मिळत जाते. निवडणूक प्रचारात नासाच्या अवाढव्य खर्चाचा मुद्दा मांडतांना जर या क्षेत्रात खाजगीकरण केले तर काय काय धोके उद्भवू शकतात याचाही उहापोह केला आहे. सोबतच नासाला अनेक मोहीमेत मिळालेलं यश अपयश, वाढलेलं आर्थिक अंदाजपत्रक ह्याचाही उल्लेख आहे.