काॅलिंग सेहमत

पुस्तकाचे नाव - काॅलिंग सेहमत
लेखक - हरिंदर सिक्का
अनुवाद - मीना शेटे-संभु



ही कादंबरी लिहिणारे हरिंदर सिक्का(निवृत्त नौदल अधिकारी) हे कारगिल युद्धाच्या रिसर्च दरम्यान सेहमत खान ह्यांच्या मुलाला भेटेले. त्याने आईच्या या कामगिरी वर प्रकाश टाकला. 

मग संबधितांना भेटुन त्या वर लिहीलेल्या या कादंबरीतील पात्रांची नावे बदलेली आहेत. या कादंबरीवर राजी हा सिनेमा आलेला आहे. 

सेहमत हे एक काल्पनिक नाव आहे. तिचं खरं नाव गुप्त राखण्यात आले आहे. 

१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या सेनेला एका अश्या गुप्तहेराची गरज होती जो पाकिस्तानात राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पाठवेल.त्या अगोदर हे काम हिदायत खान करीत होते. ते काश्मिरी मुसलमान असून पत्नी पंजाबी होती. ६५ च्या युध्दात त्यांची भारतीय सैन्याला खूप मदत झाली होती. पाकिस्तानातही त्यांचा व्यवसाय पसरलेला असल्याने बातम्या काढायला फारशी अडचण यायची नाही. ६९ साली सीमेपलीकडे हलचाली वाढल्या परंतु दुर्दैवाने त्यांना कॅन्सरचे निदान झाल्यावर आपल्या ठिकाणी आपल्या मुलीली सेहमतला पाठवण्याची राॅ ला गळ घातली. तेव्हा सेहमत दिल्लीला काॅलेजात शिकत होती. 

आंतरकाॅलेजच्या स्पर्धेत राधा कृष्णा व मीराबाईच्या डान्स मध्ये सेहमत मीराबाईची भुमिका करणार होती. पण काॅलेजच्या विश्वस्त मंडळातील काही लोकांनी ती मुस्लिम असल्याने तिच्या भुमिकेला विरोध केला होता. परंतु विश्वस्त मंडळातील  प्रतिष्ठित व सर्व प्रभावशाली रविराज सिंग यांच्या मुलाने अभिनवने विरोध केल्याने सेहमत मीराबाईची भुमिका करु शकली. आणि तो कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. 

काही वर्षांनी सेहमत जेव्हा आपली कामगीरी पुर्ण करुन आली तेव्हा याच अभिनवने पाकीस्तानी पतीपासून झालेल्या सेहमतच्या मुलाचाही स्विकार करुन त्याला आर्मी ऑफिसर बनवलं. 

हिदायत खानची तब्येत खालावु लागली. राॅ ने उपचारासाठी अमेरिकेत पाठवायची तयारी दर्शविली होती. पण हिदायत खानने नकार दिला होता. त्यांनी सेहमत ला बोलावून घेतले. आणि सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. वडिलांच्या प्रेमाखातर सेहमत तयार झाली. त्यांच्या मृत्यूनंतर लगेच तिला एक महिन्याचं प्रशिक्षण राॅ ने दिलं. 

त्यानंतर महिनाभरातच सेहमतचं लग्न पाकिस्तानच्या लाईट इन्फंट्रीच्या कॅप्टन इक्बाल सईद सोबत झालं. त्याचे वडील हिदायत खानचे जुने मित्र होते शिवाय ब्रिगेडियर असून लष्करी उच्चपदस्थांशी त्यांची चांगली जवळीक होती. त्या कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण लष्करात होता, किंवा लष्करातून निवृत्त झालेला होता. 

काही दिवसातच कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचा विश्वास संपादन करून सेहमतने आपल्या खऱ्या कामाला सुरुवात केली. बाथरूमचे कामकाजाच्या खोलीत रूपांतर झालं होतं. तिथून ती संदेश पाठवू शकत होती किंवा घेऊ शकत होती. घरातील बैठकीतील तपशीलही सुक्ष्म मायक्रोफोन व हेडफोन चा वापर करून शांतपणे ऐकत होती. 

अनेक अडी अडचणींना, संकटांना तोंड देत सेहमतने केलेली देशसेवा इतिहासात नोंदवली गेली. ७१ च्या युध्दात भारतीय सैन्याच्या व नौदलाच्या मोलाच्या कामगिरीमागे सेहमतने पाठवलेल्या गोपनिय माहितीचा मोठा हात होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.