लेखिका - रेखा बैजल
वेगवेगळ्या स्तरावरील जगण्याची आशा आकांक्षा, जातीभेदाचे लढे, जातीअंतर्गत सुप्त संघर्ष, मानसिक अंदोलने दर्शवणारी, अंतर्मुख करणारी कादंबरी.
बालपणापासून शाळासोबती असलेले तीन मित्र अनेक वर्षांनी एकत्र आले. तिघांच्याही जगण्याचे स्तर वेगवेगळे होते. तरीही त्यांनी आपल्याकडील वस्रांचे तुकडे एकत्र आयुष्याचे महावस्त्र बनवले.
उच्चभ्रू वर्गात मोडणारा अविनाश, ब्राह्मण असलेला विनित आणि दलित समाजातील गौतम हे तिघे जीवाभावाचे शाळकरी मित्र. वयाच्या चाळीशीनंतर परत भेटले, अविनाश यशस्वी उद्योगपती झाला होता, विनित नौकरी करीत पै पैसा जोडत होता तर गौतम दलित चळवळीतील कार्यकर्ता झाला होता. बायको शिवणकाम करून कसंबसं घर चालवीत होती.
खरं तर शालेय जीवनापासून ह्यांच्यातल्या मैत्रीला विषेशतः गौतमशी मैत्री ठेवण्याला अविनाशच्या वडीलांचा विरोध होता. गाव छोटं आणि जातीपातीच्या भिंती मोठ्या होत्या म्हणून.. पण अविनाशला, विनितला त्याची फिकीर नव्हती. दोघही मांगवाड्यात जाऊन गौतमच्या मायच्या हातची भाकरी ठेचा आवडीने खायचे.
चाळीशी नंतरचं जगण्याला आर्थिक स्थिरता, मानसिक प्रगल्भतेमुळे पुष्कळ साचलेपण आलेलं असतं. हळूहळू येणारा दिवस गेलेल्या दिवसाची झेरॉक्स होऊ लागतो. मुलं मोठी होऊन आपापल्या वाटा शोधत असतात. अशा वेळी जुन्या मित्रांच्या आयुष्याबद्दल कुतूहल वाटायला लागतं. या कुतूहलानेच अविनाशने दोघांना शोधून काढलं होतं. त्यांना मुलाबाळांसह दोन दिवसांसाठी घरी बोलवलं होतं.
विनितच्या वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये बायको, दोन मुलं आणि आता आई वडीलही सोबत होते. प्रकृतीच्या कारणाने विनीत त्यांना एकट्याला गावी राहू देवू शकत नव्हता. त्यामुळे घरात जागेची अडचण व्हायची. त्याची पत्नी नंदा टू बीएचके फ्लॅट साठी ट्युशन्स घेऊन हातभार लावायला तयार होती.
गौतमने स्वत्:ला चळवळीला वाहून घेतलं होतं. स्वत: सह सगळ्या दलित समाजाचे शैक्षणिक आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी झटत होता. संसाराकडे फारसं लक्ष नसायचं. त्याची पत्नी वैशालीने जर शिवणकाम केलं नसतं तर फाके पडले असते.
अविनाशचा बंगला खूप मोठा होता. घरात फक्त तो आणि पत्नी रसिका. मुलं पाचगणीतील हाॅस्टेलमध्ये शिकणारे फक्त सुटीच्या दिवसात घरी यायचे. अविनाशला अजून काही वर्षे काम सांभाळायचं होतं. त्याच्या मुलाचं शिक्षण संपताच सगळा बिझनेस त्याच्या ताब्यात देऊन मुक्त होणार होता. मग त्याला रसिकाला वेळ देता येणार होता.
अविनाशचं घर बघून विनित आणि गौतम प्रभावित होतात. नंदाला वाटतं आपला फ्लॅट ह्यांच्या हाॅल पेक्षाही छोटा असेल. तर वैशालीला तिच्या खोलीपेक्षा इथलं बाथरूम मोठं वाटतं. तिन रुममध्ये वेगवेगळे टिव्ही पाहून मुले आश्चर्यचकित होतात.
तिन्ही मित्र आपलं जगणं एकमेकांना सांगतात. जाणवणाऱ्या समस्या, खाचखळगे, मानसिक, आर्थिक कुतरओढ विश्वासाने उघड्या करतात. त्यांच्या बायकांचही भावविश्व वेगळं, नियतीने दिलेले दान वेगळं,
भरलेल्या ताटाचं स्वप्न बघणारी वैशाली, वाढवा रुमच्या फ्लॅटचं स्वप्न बघणारी नंदा, ह्यांच्या तुलनेत रसिकाकडे बघायला स्वप्नेच नव्हती. सगळी भौतिक सुखे हात जोडून समोर उभी असतांनाही ती कुठेतरी अस्वस्थ होती, काहीतरी शोधत होती.
पुढे अशा काही घटना घडतात त्यामुळे गौतमला दलित सुधारणा चळवळीतला फोलपणा लक्षात येतो आणि रसिकांच्या जगण्याला उद्देश मिळतो.
वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संस्कृतीत जगणाऱ्याकडेही आपापली वस्रे एकत्र करून त्याचे महावस्त्र बनवण्याची क्षमता असते. त्यासाठी माणसाला माणूस समजलं तर बाकी काही अवघड नसतं बाकीची उपपदं, स्वल्पविराम, अर्धविराम हे सगळे माणसाचे वेगळेपण ठसवणारे असतात. माणूस या शब्दपुढेच पूर्णविराम हवा. त्या माणसाला आहे तसा स्वीकारल्याचा पूर्णविराम.
ह्यातील जातपात, संस्कृतीचा उहापोह स्री पुरुष भेदभाव, माणुसपणासह माणसातल्या पशुत्वाचाही समाचार घेतो. भूतकाळातल्या परिस्थितीला लागू पडणारी तत्त्व आजच्या आमुलाग्र बदललेल्या परिस्थितीला लावणं म्हणजे संस्कृती..
की निसर्ग नियमाविरुद्ध वागणं म्हणजे संस्कृती......
नेमकं काय??