लेखक बोरिस पास्तरनाक
अनुवाद - आशा कर्दळे
नोबल परितोषिक विजेती कादंबरी.
ही कादंबरी म्हणजे चाळीस वर्षांच्या कालपटलावरचा विशाल जीवन प्रवाह आहे.
रशियन राज्यक्रांतीच्या अतिशय अस्थिर अशा कालखंडात समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींच्या जीवनात घडून आलेला दुःखद बदल या कादंबरीत एका विस्तीर्ण कालपटलावर अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं रेखाटला आहे.नष्ट झालेलं व्यक्तिगत जीवन, देशाच्या नियतीशी अटळपणे बांधली गेलेली लोकांची आयुष्यं, उद्ध्वस्त झालेली स्वप्नं, युद्धाच्या आणि क्रांतीच्या छिन्नभिन्न वातावरणातही अकलंक राहिलेली प्रेमाची कोवळीक आणि जगण्याची अनिवार ओढ! ही कादंबरी म्हणजे एक विशाल जीवनप्रवाह आहे. माणसं येतात-जातात, युद्धं होतात, क्रांत्या होतात, देश निर्माण होतात, नष्ट होतात; पण जीवनाचा ओघ अखंड चालूच असतो. डॉक्टर आणि कवी असलेला युरी, त्याची पत्नी टोनिया आणि विलक्षण सुंदर प्रेयसी लारा या तिघांची ही कहाणी बोरिस पास्तरनाकच्या उच्च कोटीच्या प्रतिभेच्या स्पर्शानं वैश्विक पातळीवर जाऊन पोहोचते. समग्र मानवी जीवनाला कवेत घेण्याचं सामर्थ्य फार थोड्या साहित्यकृतींमध्ये असतं.
डॉ. झिवागो ही त्यापैकी एक.
युरी झिवागो हा पेशाने डॉक्टर असला तरी कवी मनाचा आहे. तो लहान असतानाच त्याचे वडील बेपत्ता झालेले आणि आई मृत्यू पावलेली.
पाशा शिक्षक होता. अभिजात वाड्मयाचा पदवीधर. क्रांतीच्या विचाराने पछाडलेला आणि नंतर बोलशेविक होऊन संशयी आणि हिंस्र होत गेलेला, त्याच्या प्रेमात पडून लग्न केलेल्या लाराला सुध्दा तो सोडून गेलाय.
लारा एक प्रेमळ स्त्री, मुलीला नातेवाईकांकडे ठेवून नवऱ्याच्या शोधात ती फिरते आहे. पुढे ती युरीची मैत्रीण होते.
टोन्या ही युरीची मामे बहीण छान सुखवस्तू घरात जन्मलेली. युरी तिच्या प्रेमात पडतो नंतर ते लग्न करतात.
युरीचे मित्र, युरीच्या परिवारातील इतर लोक, त्याचा सावत्र भाऊ इव्हग्राफ, लाराची आई तिचा भाऊ, वेगवेगळ्या रूपात सामोरा येणारा धूर्त कामरोव्हस्की, अशी बरीच पात्र आपापली कहाणी घेऊन येतात आणि वेगवेगळ्या वर्गाचे प्रतिनिधित्व दर्शवतात.
ही कथा जरी युरीच्या अवतीभोवती फिरत असली तरी ही संपूर्ण रशियाच्या फरफटीची कहाणी आहे. युध्दात होरपळलेल्या सामान्य माणसाच्या जगण्याच्या धडपडीची, सोसलेल्या हाल अपेष्टांची, प्रस्थापित यंत्रणांच्या विरोधात जर शब्दही उच्चारायचे असतील तर मृत्यूची तयारी ठेवावी लागेल हे सांगणारी....
रस्त्याने चालत असतांना अचानक कोसॅक पोलिसांनी हटकलं आणि तुमच्याकडे योग्य कागदपत्रे नसली किंवा किरकोळ संशयावरुनही तुम्ही अनिश्चित काळासाठी जेलमध्ये डांबले जाऊ शकता.
या कादंबरीची जन्मकथा एखाद्या थरारकथेपेक्षा कमी नाही. रशियन सरकारने ही कादंबरी प्रकाशित होऊ नये म्हणून बोरिस पास्तरनाक ह्यांना नजर कैदेत ठेवले. तरीही मित्रांच्या साहाय्याने शिताफीने हस्तलिखित देशाबाहेर पाठवले गेले. अखेर ही कादंबरी इटलीत प्रसिद्ध झाली. नंतर नोबेल पारितोषिक मिळाल्यावर पास्तरनाक ह्यांना ते पारितोषिक स्विकारण्यासाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारली गेली. काही वर्षांनी हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे निधन झाले.
या कादंबरीवरून चित्रपटही बनला आहे.