राजा बढे

राजा बढे



 ( १ फेब्रुवारी १९१२ - ७ एप्रिल १९७५ ) 

भावगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते, क्रांतिगीते, लावण्या, पोवाडो यांद्वारे मराठी मुलखात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे कवी राजा बढे मराठी चित्ररसिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले ते १९४३ साली प्रदर्शित झालेल्या ‘रामराज्य’ या चित्रपटातील गीतांद्वारे. ‘रामराज्य’मधली गीते, तसेच ‘त्या चित्तचोरट्याला का आपुला म्हणू मी’, ‘हसले मनी चांदणे’, ‘दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी’, ‘हसतेस अशी का मनी, चांदणे शिंपीत जाशी’, ‘कळिदार कपूरी पान, माझिया माहेरा जा’ या गीतांनी राजा बढे यांचे नाव सर्वदूर पोहोचवले.‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटासाठी बढेंनी फक्त एका आठवड्यात सात गाणी लिहिली. ‘कलगीतुरा’ या लावणीप्रधान चित्रपटासाठी लावण्या लिहिल्या, ‘राजगडचा राजबंदी’ या स्वत:च निर्मिलेल्या चित्रपटासाठी ‘दार उघड बये दार उघड’ हा पोवाडा लिहिला.‘संत बहिणाबाई’, ‘गळ्याची शपथ’ अशा पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक चित्रपटांसाठी विविधरंगी गीतलेखन केले. ‘राम जोशी’ चित्रपटातली ‘शालूवरती आलं पाखरू, नका हाणू गोफणी, घरधनी’ ही लावणीही बढे यांचीच.

‘अंगुरी’ या हिंदी चित्रपटात बढेंनी अभिनयही केला. चित्रपटांबरोबरच नाट्यक्षेत्रातही त्यांनी स्वत:ची मुद्रा उमटवलेली आहे. १९४४ साली त्यांनी रंगभूमीवर काम करायला प्रारंभ केला. ‘माझ्या कलेसाठी’, ‘सारस्वत’ या लिटल थिएटर्सच्या नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. मामा वरेरकर यांनी ज्या मोजक्या कवींना नाट्यपदलेखनासाठी प्रवृत्त केले, त्यात बढे यांचे नाव अग्रक्रमाने समाविष्ट होते.

 साहित्यक्षेत्राव्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सक्रिय असणाऱ्या बढे यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेले म्हणून ‘जयजय महाराष्ट्र माझा’ हे महराष्ट्र गीत म्हणून अजरामर झाले. या गीताने बढे यांचा लौकिक महाराष्ट्रबाहेरही पोहोचला.  ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.