पुस्तकाचे नाव - अक्करमाशी
लेखक - शरणकुमार लिंबाळे
प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे सर्वाधिक गाजलेले व अन्य भाषेत अनुवादित झालेले आत्मकथन आहे. ‘रांडेचा पोर’ आणि ‘अस्पृश्य’ म्हणून झालेली उपेक्षा, फरफट या आत्मकथनात मांडलेली आहे.
वर्णाधिष्ठीत व्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता आणि मानवनिर्मित वंशशुद्धीच्या भ्रामक समजुती यामुळे माणसावर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण या आत्मकथनात येते. अक्करमाशी म्हणजे अनौरस संतती. नीतीबाह्य शरीरसंबंधातून जन्मलेले अकरामासे, अशुद्ध असे मानले जाते. बाप लिंगायत आणि आई महार या जातीची असणाऱ्या शरणकुमार यांना लिंगायत आणि महार या दोन्ही जाती दूर लोटतात. रांडेचे पोर म्हणून समाजाकडून कुचेष्टा होते. अस्पृश्यता, दारिद्र्यशोषण आणि अपमानाचे दुःख पचविण्याऱ्या लिंबाळेंना समाजाकडूनही अवहेलना सहन करावी लागली.
अत्यंत दारिद्र्यामध्ये त्यांचे बालपण गेले. आई झोपडीत तर बाप माडीत, अशी स्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
मृत जनावरांचे मांस आणि शेणातील ज्वारीच्या दाण्यांची भाकरी खाऊन, दगड फोडणाऱ्या वडाऱ्याची भाकरी चोरून पोटात उसळलेली भुकेची आग शरणला शांत करावी लागली आहे. या आत्मकथनातून येणारे भुकेचे चित्र हेलावून सोडणारे आहे. पोटासाठी शरीर विकणाऱ्या मसामाय, संतामाय, नागी यांचे दुःखही येथे मांडलेले आहे. भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी दलितांना करावा लागणारा संघर्ष लिंबाळे यांनी समर्थपणे रेखाटलेला आहे.
सुंदर रूप आणि पोटाचा दुष्काळ यांच्या शापात बरबाद झालेले स्त्रियांचे आयुष्य लेखकाने मांडले आहे. मसामायच्या चारित्र्याचा संशय घेऊन विठ्ठल कांबळे तिला सोडतो. मुलांपासून ताटातूट होते. ज्याच्यामुळे पराधीन व्हावे लागले त्या हनुमंता पाटलाला शेवटी मसामाय स्वीकारते. त्याची रखेल होऊन राहते. समाज हनुमंता पाटलाला नावे ठेवत नाही, उलट मसामाय व्यभिचारी, अनैतिक ठरते. समाजाचा हा दृष्टिकोन भारतीय स्त्रियांचे भावविश्व उद्ध्वस्त करणारा आहे. स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणून समाज पाहतो.
या आत्मकथनातील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता जणू त्यांनी स्वतःच स्वतःला सोलून जगासमोर उभे केले आहे. इतकी धिटाई, इतका रोखठोकपणा आणि स्पष्टता दलित आत्मकथनात अभावानेच जाणवतो.
सामाजिक जीवनातील जातीयता, श्रेष्ठ-कनिष्ठता, अवहेलना लिंबाळे यांना अस्वस्थ करून सोडते. प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध आणि जातीअंतर्गत व्यवस्थेविरुद्ध असा दुहेरी पातळ्यांवरचा संघर्ष या आत्मकथनात अभिव्यक्त झाला आहे