लेखक - शशी भागवत
गुढ, रहस्य, थरारक अद्भुत रम्य लेखन प्रकार तसा आव्हानात्मक समजला जातो. नाथमाधव, गो ना दातारशास्री ह्यांच्यानतर हा प्रकार लिहिणारे लेखक अत्यंत क्वचित, शशी भागवतांचा ह्यात समावेश करण्यात हरकत नसावी.
एका साम्राज्यातील मान्यवर सामंत, सरदार घराण्यांमध्ये चाललेला संघर्ष. त्याला कारण असलेली अष्टभुजा देवीची एक रत्नजडित मूर्ती रत्नप्रतिमा.
सामंत कनकधारांच्या घराण्यात पिढी जात पूजली गेलेली ही रत्नप्रतिमा जोपर्यंत घरात होती तोपर्यंत या घराण्याची प्रचंड भरभराट झाली. व्यसनाधीन झालेल्या कनकधाराच्या काळात ही रत्न प्रतिमा स्थानभ्रष्ट होऊन सामंत कनकधारांच्या घराण्याला उतरती कळा लागली. निष्कांचन झालेला सामंत कनकधर आपल्या गर्भार पत्नीला एका ओसाड देवळात सोडून परंगदा झाला. तेव्हापासून या घराण्याच्या व्यतिरिक्त रत्न प्रतिमा ज्याच्या हातात पडली त्याची वाताहात होऊन त्याचा भीषण अंत झाला. तरीही या रत्नप्रतिमेचा मोह कोणाला आवरता आला नाही.
या मोहपायी सामंत चंद्रचूडाने आपल्या मोठ्या भावाच्या मुलीचा प्रतिमा गरीचा विवाह लुब्धकाशी ठरवला. तो सामंत चंद्रचडांना रत्नप्रतिमा देणार होता. परंतु विवाहाची घोषणा होण्याचा काहीवेळा अगोदर त्याची हत्या झाली, त्याचवेळी सामंत चंद्रचुडांच्या संपत्तीवर कालश्रुंगाने डाका घातला.आणि लुब्धांकाकडे असलेली रत्नप्रतिमा नाहीशी झाली.
लुब्धकाच्या मृत्यूनंतर नाहीशी झालेल्या रत्नप्रतिमेच्या शोधात त्याचा भाऊ विघ्नांत होता.
महामंडलीक भद्रायूंनाही रत्नप्रतिमा हवी होती. रत्नप्रतिमेच्या बदल्यात एक योगी त्यांना अखंड यौवन देणार होता.
उग्र, धिप्पाड, बोलतांना कोणाचीही भिडभाड न बाळगणाऱ्या
अनंगपालाशी उघडपणे वैर करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. त्याला सत्तेच्या वर्तुळातील सर्व सरदार सामंतांची गुप्त रहस्ये, काळे कारनामे, भ्रष्टाचार माहीत होते. या अनंगपालाने काळदुर्गाचे स्वामित्व सामंत रत्नगुप्ताला देण्यास सम्राटांना सुचवले. सम्राटांनी लगेच मान्यता दिली. अनंगपाल सुध्दा रत्नप्रतिमेच्या शोधात होता.
रत्नगुप्ताचे कुळ आणि मुळ माहिती नसूनही सम्राटांनी पालन पोषण करून विद्यादान देऊन सामंत पद देऊन सन्मान केला म्हणून अनेक जण त्याचा हेवा करायचे. त्याला स्वत:लाही आपले कुळ समजून घेण्याची उत्सुकता होती. त्यासाठी काहीही करण्याची तयारी हेरून एक अज्ञात शक्तीने त्याला कालश्रुंग बनवले. जो भ्रष्टाचारी सामंतांच्या खजिन्यावर डाका टाकत होता. त्या अज्ञात शक्तीने त्याच्यावर शेवटची कामगिरी सोपवली. रत्नप्रतिमा शोधण्याची. रत्नप्रतिमा मिळताच रत्नगुप्ताला त्याचे कुळ कोणते, आई वडील कोण हे समजणार होते.
सामंत चंद्रचुडांच्या भावाची तरूण मुलगी प्रतिमागौरीला काही दिवसांपूर्वी स्वप्न पडले होते. स्वप्नात तिच्या वडिलांनी ती काळदुर्गाची स्वामिनी होण्याची भविष्यवाणी केली होती. काळदुर्ग कधी काळी कनकधराचा होता. काळदुर्ग ओसाड पडला असून आता तिथे भुत पिशाच्च असतात अशी बोलवा होती.
महामंडलीक भद्रायूंची गुप्तहेर असलेली कालकन्या जी वास्तविक विषकन्या होती. तिला प्रतिमागौरी आणि सामंत रत्नगुप्ताचं विषेश ममत्व होतं. सामंत चंद्रचुडांच्या प्रासादातील सगळ्या चोरवाटा, गुप्तमार्ग तिला माहीत होते.
विलंची, दिसायला अत्यंत किरकोळ पण अंगी नाना कळा असणारा एक उचापती चोर, कोणत्याही कारागृहाच्या भिंती त्याला डांबून ठेवू शकत नव्हत्या.
भटक्या जमातीतील तांड्यातील माद्री, तांडा जीथे वस्ती करेल त्याच्या जवळपासच्या नगरात लोकांना भुलवून चोऱ्या करणारी. हुबेहूब प्रतिमागौरी सारखी दिसणारी.
पानोपानी उत्कंठा वाढवणारे वेगवान कथानक वाचकांना अगदी सहजपणे दिड दोन हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात घेऊन जाते. रत्नप्रतिमेच्या भोवती असणारी पात्रे आणि त्यांना वेढून असणारे रहस्याचे धागे गुरफटवून टाकतात. अंगावर शहारे येतात. एका रहस्याची उकल होण्याअगोदर दुसरे रहस्य समोर येते. काळदुर्गावरच्या पिशाच्चलीला धडकी भरवतात. साहित्यातील नवरसांचा प्रमाणबद्ध वापर करतांना राजे महाराजेकालीन काळ उभा करतांना भाषा सुध्दा भरजरी असुनही वाचतांना कुठेही अडखळणं होत नाही.
रहस्य आणि रोमांच ह्यात अवगुंठलेली अद्भुतरम्य कादंबरी. वाचून संपवल्याशिवाय सोडवत नाही.