छपाईची कुळकथा - १

छपाईची कुळकथा - १

लिखाणाच्या इतिहासामध्ये एकूण चार महत्त्वाचे टप्पे होते. त्यांतला पहिला टप्पा म्हणजे माणसानं अवगत केलेली चित्रलिपी आणि खाणाखुणा यांच्या मदतीनं लिहिण्याची कला; दुसरा टप्पा म्हणजे अक्षरं, लिपी आणि भाषा यांचा शोध; तिसरा टप्पा हा छपाईची कला आणि चौथा टप्पा इंटरनेट, मोबाइल अशा आधुनिक साधनांचा मानला जातो. 

या चार टप्प्यांपैकी छपाईचा शोध हे एक अद्भुतच प्रकरण आहे!



छपाईचा शोध हा इतिहासातला क्रांतिकारकच टप्पा होता! पुस्तकं, वर्तमानपत्रं, मासिकं, नकाशे आणि पोस्टर्स, यांपैकी काहीच अस्तित्वात नसलेल्या या जगाची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. तांत्रिक आणि सांस्कृतिक गरजांचा मिलाफ होऊन छपाईचं तंत्र विकसित झालं. छपाई या एकाच शोधानं सामाजिक, राजकीय आणि भावनिक पातळीवर समाजात प्रचंड बदल होत गेले! विज्ञान, धर्म आणि राजकारण या सर्वांवर छपाईचा कमालीचा प्रभाव पडला. शिक्षणाच्या वाढीचं सर्वांत महत्त्वाचं कारण जर कुणी विचारलं, तर ते ‘छपाईचा शोध’ हेच ठरेल!

वूडब्लॉक प्रिंटिंग, मातीच्या साच्यांचं मूव्हेबल ब्लॉक प्रिंटिंग, धातूच्या साच्यांचं मूव्हेबल ब्लॉक प्रिंटिंग, इथपासून गटेनबर्गनं शोध लावलेलं पहिलं छपाईयंत्र ते आज कॉम्प्यूटरच्या मदतीनं होणारी छपाई हा तंत्रज्ञानाचा प्रवास थक्क करणारा आहे. छपाईच्या तंत्रज्ञानाचा शोधही चिनी लोकांनी युरोपियन लोकांच्या शेकडो वर्षं आधी लावला होता. दुसऱ्या शतकात चिनी लोकांनी फुलांची चित्रं रेशमावर ट्रान्स्फर करण्यासाठी वूडब्लॉक प्रिंटिंगचा उपयोग केला होता. हे छपाईचं पहिलं उदाहरण होतं!

त्यापूर्वी चीनमध्ये माहिती साठवून ठेवणं अवघड जात होतं. उदाहरणार्थ, दुसऱ्या शतकाच्या सुमारास चीनमधल्या हान राजघराण्यात जे जे लिखाण सर्वांसाठी खुलं किंवा प्रसिद्ध करण्याची गरज भासायची, ते ते लिखाण दगडावर कोरून ठेवलं जायचं. मग सगळ्या जनतेला ते वाचायला खुलं व्हायचं. कोणीही जाऊन त्या लिखाणाचा आस्वाद घेऊ शके. मात्र पुढे दगडावर अक्षरं कोरण्यासाठी लागणारा खर्च आणि श्रम परवडेनासे झाले. तेव्हा चीनमध्ये लाकडी ठोकळ्यांवर चित्राचा आकार काढून, त्याला शाई लावून, कागदावर दाबून ठसा उमटवण्याची म्हणजे वूडब्लॉक प्रिंटिंगची पद्धत सुरू झाली होती. चौथ्या शतकात रोमन लोकांचं राज्य असलेल्या इजिप्तमध्येही कापडावर वूडब्लॉकनं केलेल्या छपाईचा उल्लेख सापडतो.

वूडब्लॉक प्रकारात एक लाकडाचा ठोकळा वापरत. त्यावरचा छापायच्या अक्षरांचा भाग सोडून बाकीचा भाग सुरीनं कापून टाकत. त्यामुळे फक्त छापायच्या अक्षरांचाच भाग त्या ठोकळ्यावर पुढे येई. नंतर तेवढ्या, वर आलेल्या, अक्षरांच्या आकाराला शाई फासून मग कोऱ्या कागदावर त्या अक्षरांचा ठसा उमटवला जायचा, म्हणजेच थोडक्यात, ते पान कागदावर उमटायचं. हे वूडब्लॉक प्रिंटिंग आल्यावर चीनमध्ये सुरुवातीला महत्त्वाच्या कागदपत्रांवर राजमुद्रेचा शिक्का मारण्यासाठी याच पद्धतीचा उपयोग केला जायचा. अर्थात, शाईचा ठसा उमटवण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त ठसे किंवा शिक्के उमटवण्यापुरताच मर्यादित राहिला नाही. इ.स. ६१९ मध्ये चीनची राजसत्ता लँग घराण्याच्या हाती गेली. या राजघराण्यातल्या माणसांनी लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. त्यामुळे लँगच्या राजवटीत बौद्ध धर्मानं चीनमध्ये आपला पाया भक्कम केला. बौद्ध  भिक्षू धर्मप्रसारासाठी आपल्या पवित्र ग्रंथांमधले उतारे पूर्वी हातानं लिहून लोकांना वाटायचे. त्यांनी ही लाकडाच्या ठशांचीही पद्धत लगेच उचलली. जर कुठल्याही चित्राच्या किंवा लिखाणाच्या अनेक कॉपीज काढायच्या असतील, तर हातानं लिहिण्यापेक्षा लाकडाच्या ठशांची ही पद्धत कितीतरी सोपी आणि जलद होती. साहजिकच, त्यांनी ही पद्धत वापरून गौतम बुद्धाची लाखो चित्रं छापून लोकांमध्ये वाटली. जपानवर तेव्हा चीनचा खूपच प्रभाव होता. जपानची राणी बौद्ध धर्माची भक्त होती. तिनं पॅगोडांमध्ये बसलेल्या बुद्धाची जवळपास १० लाख चित्रं छापून जपानी लोकांना वाटण्याचा संकल्प सोडला! राणीचाच संकल्प म्हटल्यावर हे काम १५७ माणसं ६ वर्षं अहोरात्र करत होती. नंतर यांतली बहुतेक सगळी चित्रं नष्ट झाली; पण आजही लंडनमधल्या ‘ब्रिटिश म्युझियम’मध्ये यातून वाचलेली काही चित्रं जतन करून ठेवली आहेत.

छपाईची कला फक्त बुद्धाच्या चित्रांपुरती मर्यादित नव्हती, तर लाकडी ठोकळ्यांवर बुद्ध धर्मातल्या पुस्तकांच्या पूर्ण पानाच्या अक्षरांचे ठसे बनवून त्यांना शाई लावून एका वेळी एक पानच्या पान अशा तऱ्हेनं पुस्तकंच्या पुस्तकं छापण्यात आली होती. हे सगळं करण्यासाठी बुद्ध भिक्षूंना अर्थातच खूप वेळ आणि चिकाटी यांची गरज असे. अगदी आयुष्यभराचं व्रत असल्यासारखंच हे काम करावं लागायचं. पण धर्मप्रसारा-विषयीची त्यांची भावना खूप तीव्र असल्यामुळे त्यासाठी काहीही करायला हे लोक तयार असायचे. 

ब्रिटिश लायब्ररीमध्ये आढळणारं ‘डायमंड सूत्र’ हे बौद्धधर्माचं पुस्तक ब्लॉक प्रिंटिंगनं बनवलेलं सर्वांत पहिलं पुस्तक मानलं जातं.

 ‘डायमंड सूत्र’ चीनमधल्या टँग राजघराण्यातल्या झियानटँग राजाच्या काळात इ.स. ८६८ मध्ये बनवलं गेलं. या पुस्तकाचा शोध कसा लागला त्याची कथा मजेदारच आहे. 

चीन आणि तुर्कस्थानचं वाळवंट यांच्यामधल्या सीमेवर एक मोठा उंच कडा आहे. इ.स. ३६६ पासून या कड्यातल्या गुहांमध्ये बौद्ध भिक्षू राहायचे. म्हणूनच, या कड्याचं नाव ‘हजार भिक्षूंची गुहा’ असं पडलं. या गुहांतल्या भित्तिचित्रांत गौतम बुद्धांच्या आयुष्यातले अनेक वेगवेगळे प्रसंग आणि त्यांचं सामाजिक आयुष्य अतिशय प्रभावीपणे रेखाटलं होतं. भारतातल्या बौद्ध धर्मींनी बांधलेल्या अजिंठा येथील गुहांसारख्याच या गुहा होत्या. पुढे इ.स.१९०० मध्ये या गुहांची पडझड थांबवण्यासाठी दुरुस्तीचं काम चालू होतं. त्यावेळी या गुहांची भिंत ही दगडांची बनलेली नसून विटांची आहे असं एका धर्मगुरूच्या लक्षात आलं. या विटांच्या भिंतीमागेच पुरातन बौद्धांचा खराखुरा खजिना दडलेला होता. त्यात असंख्य हस्तलिखितं आणि काही छापील पुस्तकंही होती. ती हस्तलिखितं चिनी, तिबेटी, संस्कृत, इराणी, जुनी तुर्की, अशा अनेक भाषांमध्ये लिहिलेली होती. तसंच हिब्रू भाषेत लिहिलेलं ‘ओल्ड टेस्टामेंट’ हे ख्रिश्चन लोकांचं आधीचं बायबलही त्यांत सापडलं. हा माणसाच्या सांस्कृतिक इतिहासाचा फार मोठा ठेवा होता. या खजिन्यातच ‘डायमंड सूत्र’ हे जगातलं पहिलं छापील पुस्तकंही सापडलं. डायमंड सूत्राचं मूळ संस्कृत नाव ‘वाछेदिकाप्रज्ञापारमितासूत्र’ असं आहे. माणसानं शहाण्यासारखं वागावं अशा उद्देशानं बुद्धानं केलेला उपदेश त्यात आहे. ‘महायान’ बौद्धधर्म जिथे जिथे आहे तिथे या सूत्राचा बराच प्रभाव पडला. 

अर्थात, ‘डायमंड सूत्र’ छापलं गेलं तेव्हा पुस्तकबांधणीची कला लोकांना माहीत नसल्यानं या डायमंड सूत्राच्या छापलेल्या पानांच्या गुंडाळ्या केलेल्या होत्या. या पुस्तकावर छपाईची तारीख आणि छापखान्याचं नाव अगदी स्पष्टपणे लिहिलेलं होतं.११ मे ८६८ या दिवशी ‘वँग चिच’ यानं हे पुस्तक आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छापलं होतं. १३ इंच रुंद आणि १६ इंच लांब अशा आकाराचे ७ कागद त्या पुस्तकात होते. त्यांतल्या पहिल्याच पानावर सिंहासनावर बसलेल्या बुद्धाचं चित्र आहे. नमस्कार करणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाबरोबर बुद्ध बोलतोय; तसंच बाजूला बौद्ध भिक्षू आणि सेवक उभे आहेत, असं ते चित्र आहे. 

‘डायमंड सूत्र’ - ब्लॉक प्रिंटिंगनं बनवलेलं सर्वांत पहिलं पुस्तक


ब्लॉक प्रिंटिंगमध्ये लाकडावर प्रत्येक वेळी पूर्ण पानच्या पान कोरून त्याचा ठसा बनवणं हे फारच किचकट काम होतं. शिवाय, पूर्ण पानाच्या त्या साच्याचा उपयोग फक्त एका पुस्तकाच्या एका पानासाठीच होई. त्या पानावरचं एखादं अक्षर जरी बदललं, तर संपूर्ण पानाचा ठसा पुन्हा लाकडावर कोरत बसावं लागायचं. हे काम खूपच जिकिरीचं आणि खर्चीक होतं. साहजिकच, प्रत्येक अक्षराचा सुटा ठसा करून मजकुराप्रमाणे ही अक्षरं जुळवून छपाई करण्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू झाले. यालाच ‘सरकते ठसे (मूव्हेबल टाइप)’ असं म्हणतात. चीनमध्ये इ.स. ९६० पासून साँग राजघराणं आलं. त्या काळात बाय शेंग या माणसानं छपाईच्या कलेत नावीन्य आणलं आणि त्यानं सरकत्या (मूव्हेबल) टाइप प्रिंटिंग या प्रकाराचा शोध लावला. ब्लॉक प्रिंटिंगपेक्षा कमी वेळ लागत असल्यामुळे या पद्धतीनं छपाई जलद व्हायला लागली. तसंच, अक्षरांचे सुटे मूव्हेबल टाइप्स परत परत वापरता यायला लागले. हाही एक फायदा होताच. या पद्धतीत एक तर छपाईसाठी लागणारा कच्चा माल कमी लागायला लागला. दुसरं म्हणजे, वेगवेगळ्या अक्षरांसाठीचे हे मूव्हेबल टाइप्स जतन करणंदेखील तुलनेनं सोपं होतं.

खरंतर मूव्हेबल टाइप बनवण्याची पद्धतही कमी किचकट नव्हती. त्यासाठी प्रथम चिकणमाती ओली असताना तिचा पाहिजे त्या अक्षराप्रमाणे ठसा बनवला जाई. हा ठसा नंतर भट्टीत भाजल्यावर चांगला भक्कम बने. लोखंडाच्या चौकटीत कुठल्याही पानासाठी लागणाऱ्या अक्षरांप्रमाणे या ठशांची जुळणी केली जाई. यानंतर या ठशांना शाई लावून कागदावर दाबलं की पूर्ण पान छापलं जायचं. नंतर हेच ठसे लोखंडाच्या चौकटीपासून मोकळे करून दुसऱ्या पानातल्या मजकुराप्रमाणे पुन्हा जुळवले की काम झालं. ही अक्षरं सुलट छापली जाण्यासाठी लोखंडाच्या चौकटीत बसवायचे त्यांच्यासाठीचे ठसे उलट बनवावे लागायचे. म्हणजेच, आपण दिसतो त्याच्या बरोबर उलट, जसे आपण आरशात दिसतो तसे, कागदावर अक्षर जसं दिसायला हवं त्याची ‘मिरर इमेज’  ठसा बनवण्याच्या मातीवर उमटवली जायची व ती कोरून ठसा बनवला जाई. शेन कुओ या तत्कालीन चिनी विद्वान माणसानं आपल्या एका पुस्तकात या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली होती.

नंतर काही शतकांनंतर गुटेनबर्ग ने छपाई यंत्राचा शोध लावला. 

संदर्भ - संवाद - अच्युत गोडबोले









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.