टेलीफोन
कम्युनिकेशन्सच्या बाबतीत आपण ५००० वर्षांपूर्वी जेवढे अप्रगत होतो जवळपास तितकेच केवळ २०० वर्षांपूर्वीही अप्रगतच होतो यावर वि:श्वास बसणं आज कठीण आहे. तेव्हा लोकांना मीटिंग्ज ठरवायच्या असतील, तर आठवडाभर आधी एकमेकांना निरोप पाठवावा लागायचा. एकमेकांपासून दूर असलेल्या कुठल्याही अंतरांवर उद्योगधंदा करणं तर अशक्यच होतं.
कम्युनिकेशन्सच्या टप्प्यांमधला महत्त्वाचा शोध म्हणजे टेलिफोन! टेलिफोननं आज जगाचा चेहरामोहराच बदललाय.
खरं म्हणजे टेलिफोन अगदी सोप्या तत्त्वावर चालतो. त्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे ज्यातून आवाजांच्या ध्वनिलहरींचं विद्युत्लहरींमध्ये रूपांतर होईल असा प्रक्षेपक (ट्रान्समीटर), दुसरी म्हणजे ज्या उपकरणात या विद्युतलहरींचं पुन्हा ध्वनिलहरींमध्ये रूपांतर होऊन त्यातून मूळचाच आवाज ऐकू येऊ शकेल असा ‘रिसीव्हर’ आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन गोष्टींना जोडणारं माध्यम. हे आपल्याला आज खूप सोपं वाटेल, पण असं आपण करू शकू असं वाटणंच मुळी एकेकाळी क्रांतिकारक होतं; मग प्रत्यक्षात तशी वस्तू तयार करणं तर सोडाच!
अॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या स्कॉटिश संशोधकानं ते शक्य करून दाखवलं.
अॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल हा ध्वेयवेडा, स्वप्नं बघणारा मनुष्य होता. विल्यम वॉटसन त्याला मदत करायचा. त्यांची प्रयोगशाळा म्हणजे वॉटसनच्या एका खूपच कोंदट, धुरकट वस्तीतलं एक खुराडंवजा ठिकाणच होतं. या ‘खुराड्यातून’ जग हादरवून सोडणाऱ्या एका गोष्टीचा शोध लागेल हे कुणाच्या स्वप्नीही आलं नसतंनसतं.
बेलला टेलिफोनचा शोध कसा लागला याची गोष्ट भन्नाटच आहे!
अॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
खरं तर त्या काळी मानवी आवाज धातूच्या तारांतून पाठवण्याचं यंत्र बनवणं म्हणजे भुताटकीचाच एक प्रकार असल्याची अनेकांची ठाम समजूत होती. १८६६ च्या सुमारास न्यूयॉर्कमध्ये ‘जोशुआ कॉपरस्मिथ’ नावाच्या माणसानं असंच एक उपकरण बनविल्याबद्दल त्याला शिक्षा झाल्याची अफवाही उठली होती. कोणी व्यक्ती बोलताना समोर दिसत नसताना तिचा फक्त आवाज ऐकू येणं म्हणजे त्या काळी अशक्यच गोष्ट मानली जायची. कदाचित यामुळेच अनेक शास्त्रज्ञांनी त्यात लक्षच घातलं नसावं.
वयाच्या ११ व्या वर्षी आपल्यात आपले आजोबा आणि वडील यांच्यापेक्षा वेगळी ओळख निर्माण करणारं काहीतरी आहे याची बेलला जाणीव व्हायला लागली. मोठा झाल्यावर बेलनं स्वत:च ध्वनीवर प्रयोग सुरू केले. एकदा एके ठिकाणी हिरवळीवर आपल्या पर्ड नावाच्या कुत्र्याला घेऊन त्याच्या जबड्याची उघडझाप करत बसलेला बेल त्याच्या भावांना दिसला. त्या कुत्र्याच्या जबड्याची विशिष्ट हालचाल झाली की त्यातून गा.. गा.. गा.. असा भुंकण्यापेक्षा काहीसा वेगळाच आवाज यायचा. खूप प्रयत्न केले, तर कुत्र्यालाही बोलायला शिकवता येईल असं बेलला वाटायला लागलं. मग काय विचारता, हे बेल बंधू आणि त्यांचा तो कुत्रा यांचे दिवसभर हेच उद्योग चालत. पण थोड्याच काळात बेलच्या डोक्यात वेगळंच वारं शिरलं आणि तो बिचारा कुत्रा या कटकटीतून मुक्त झाला. त्यांच्या वडिलांनी लंडनमध्ये एका ‘बोलक्या यंत्राचा’ जाहीर प्रयोग बघितला होता. ते यंत्र चार्ल्स व्हीटस्टोन या त्यांच्या वैज्ञानिक मित्रानंच बनवलं होतं. त्या यंत्रात काही पोकळ नळ्या होत्या; आणि प्रत्येक नळीतून अ, ब, प, फ, र असे वेगवेगळे मानवी उच्चारांसारखे आवाज यायचे.
त्यामुळे बेलच्या वडिलांनी आपल्या मुलांना एकत्र बोलावून तशाच तऱ्हेचं यंत्र बनवायला उद्युक्त केलं. जो त्यात यशस्वी होईल त्याला वडिलांकडून बक्षीसही मिळणार होतं. बेललाच काय, इतर भावांनाही हे जमेल अशी काही वडिलांची अपेक्षा नव्हती. पण या निमित्तानं पोरं मनुष्याचं स्वरयंत्र आणि आवाज यांच्याविषयी काहीतरी अभ्यास करतील अशी त्यांना आशा वाटत होती. पण इकडे बेल बंधूंनी मात्र वडिलांचं म्हणणं खूपच मनावर घेतलं आणि त्यांनी कसं का होईना पण चक्क एक यंत्र बनवलं. बेलनं कुठल्याश्या गोष्टीची कवटी बनवली, आणि त्याचा तोंडासारखा आकार करून त्यात रबराची जीभही बसवली. मग वेगवेगळ्या तऱ्हेनं या सगळ्या गोष्टी एकमेकांना बांधून ते यंत्र तयार झालं. नंतरच्या काळातही बेलला या लहानपणच्या यंत्राची खूप आठवण व्हायची. तो म्हणे, “ज्या दिवशी ते वेगवेगळे भाग एकत्र करून आम्ही ते यंत्रं बनवलं, तेव्हा आम्हाला तो दिवस काय प्रचंड वाटला होता. फक्त त्यातून फार स्पष्ट ऐकू येतील असे उच्चार, वगैरे काही आले नाहीत. खूप प्रयत्न केल्यानंतर जेमतेम ‘मा …मा …मा …मा …’ असे काही अस्पष्ट उच्चार यायचे.
आवाज आणि वीज यांच्यामधला संबंध बेलला प्रथमच जाणवला होता. आवाज आणि वीज दोन्ही ऊर्जाच आहेत, पण फक्त त्यांचं स्वरूप वेगळं असतं असं बेलला वाटलं. आवाजानं कानाचा नाजूक पडदा कंप पावतोच; तसंच, त्यामुळे कानातली तुलनेनं जड असणारी हाडंही हलतात हे बेलला माहीत होतं. आता हे सर्व, समजा, एका विजेच्या सर्किटला जोडलं, तर या हालचालीप्रमाणे विजेचा प्रवाह कमी जास्त करणं शक्य होईल, म्हणजे आवाजाच्या चढउताराप्रमाणे विजेच्या प्रवाहात चढउतार होईल. हा विजेचा बदलता प्रवाह दूर अंतरावर नेऊन त्याचं परत आवाजाच्या चढउतारात रूपांतर केलं, की झालं! असं बेलला वाटत होतं. इतिहास पाहायला गेलं तर हे टेलिफोनचं मूलतत्त्व बेलला सापडलं होतं.
याच भन्नाट कल्पनेनं बेलच्या मनात घर केलं होतं. मग त्या टेलिफोनवर बेलचे विचार आणि प्रयोग सुरू झाले.
टेलिफोनविषयी बेल आणि त्याचा सहकारी वॉटसन यांच्यात खूपच चर्चा व्हायची, पण त्यातून ठोस असं काहीच निष्पन्न व्हायचं नाही. त्यांना जे पाहिजे होतं, त्याच्या जवळपासही ते पोहोचले नव्हते. बेल आणि वॉटसन थकून गेले होते.अशाच अवस्थेत जरासं कंटाळून, जरासं वैतागून, पण तरीही स्वत:ला सावरत, दोघंही त्या दिवशी सकाळी कामाला लागले. सकाळी विशेष असं काहीच घडलं नाही. दुपारी पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यांच्या हार्मोनिक टेलिग्राफच्या प्रयोगामागची कल्पना तशी साधीच होती. वेगवेगळ्या वेगानं आणि तऱ्हेनं कंप पावणाऱ्या कंपपट्ट्या जर लोहचुंबकाजवळ ठेवल्या आणि त्या चुंबकाभोवती विजेची तार गुंडाळली, तर त्या तारेतून वीज वाहायची आणि त्या विजेचं प्रमाण त्या कंपनांवर अवलंबून असायचं. एका खोलीत बेल बसायचा आणि दुसऱ्या खोलीत वॉटसन बसायचा. या दोन्ही खोल्यांतली उपकरणं विजेच्या एका तारेनं जोडलेली होती. या तारेच्या एका बाजूला एका खोलीत कंपपट्टी होती; तर दुसऱ्या खोलीतल्या टोकाकडे त्या कंपामुळे निर्माण होणाऱ्या विजेचं मोजमाप करण्याची व्यवस्था होती. मग एकानं त्या कंपपट्ट्या घेऊन वाजवत बसायचं आणि दुसऱ्यानं दुसऱ्या खोलीत किती शक्तीचा वीजप्रवाह वाहतोय ते मोजत बसायचं. मग ते दोघं रात्रंदिवस असे अनेक प्रयोग करत बसायचे. पण या प्रयोगांतून फारसं काहीच निष्पन्न होत नव्हतं.
पण त्याच वेळी अकस्मात काहीतरी घडलं! वॉटसननं त्या कंपपट्ट्या नेहमीपेक्षा जवळून कंप करत ठेवल्या, तर त्या लोहचुंबकाला अडकूनच बसल्या. वॉटसननं त्या लोहचुंबकापासून दूर नेल्या तर दुसऱ्या खोलीत बसलेल्या बेलला त्याच्या उपकरणातून एक बारीक आवाज ऐकू आला. बेलनं धापा टाकतच वॉटसनच्या खोलीत जाऊन वॉटसनला चक्क झापलंच. तो त्याच्यावर अक्षरश: कोकलला, “वॉटसन, तू काय केलंस? हे कसं घडलं?” वॉटसन बिचारा घाबरलाच. बेल म्हणाला, “अरे मूर्खा, मला दुसऱ्या खोलीत आवाज ऐकू आला.” पण तो आवाज खूपच अस्पष्ट होता. वॉटसननं बेलला काय झालं होतं त्याविषयी सांगितलं. पण लगेचच तो आवाज एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ऐकू येण्यामागे काहीसं गूढ आणि रहस्य असल्याचं बेलला चटकन कळलं आणि त्यामागचं रहस्य उलगडण्यासाठी मग दोघेही आलटून पालटून या आणि त्या खोलीत जाऊन, तहानभूक वगैरे पूर्णत: विसरून, प्रयोग करायला लागले.
बेलने विद्युत चुंबकाच्या ऐवजी गंधकाम्लाची बशी ठेवली आणि त्यानंतर नादकाट्याची कंपनं सुरू केली आणि काय! नादकाट्याचा आवाज अगदी अस्पष्ट का होईना पण पलीकडे पोचत होता. आम्लाची तीव्रता वाढवली तर आवाजाचीही तीव्रता वाढतेय असं बेलच्या लक्षात आलं. लगेच प्रक्षेपकात सुधारणा करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले. पडद्याला जोडलेली तार आम्लाच्या बशीत बुडविलेली होती. त्या बशीत रिसीव्हरची तारही जोडलेली होती. वॉटसन रिसीव्हरला कान लावून बसला होता, तर बेल आम्लाची बशी घेऊन पडद्यासमोर वाकून बोलायच्या तयारीत होता. नवीन प्रयोगाच्या उत्कंठेमुळे कदाचित बेलचे हातपाय कापतही असावेत. काही का कारण असेना, पण बॅटरीला धक्का लागून बशीतील आम्ल बेलच्या कोटावर सांडलं आणि “मि. वॉटसन, इकडे ये, मला तुझी गरज आहे” हे ऐतिहासिक शब्द बेलनं उच्चारले. दुसऱ्या खोलीत असलेल्या वॉटसननं ते शब्द ऐकले. बेल प्रत्यक्ष आपल्या खोलीत नसतानाही, बेलनं दुसऱ्या खोलीत उच्चारलेले शब्द चक्क एका तारेवाटे वॉटसनपर्यंत पोहोचले होते आणि वॉटसनला ऐकूही आले होते. वॉटसनचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसत नव्हता आणि एकीकडे आनंद गगनातही मावत नव्हता. याच आनंदात ओरडतच तो धावत बेलकडे आला.
टेलिफोनवर केलेलं जगातलं ते पहिलंवहिलं संभाषण होतं!
नंतर काळाच्या ओघात संशोधन होत राहिले. आणि आज आपण जो टेलीफोन बघतोय, वापरतोय तो अवतरला.
संकलन संदर्भ - संवाद - अच्युत गोडबोले