पहिला मोबाईल फोन

पहिला मोबाईल फोन


आज गोरगरिबांपासून ते बलाढ्य अतिश्रीमंतांपर्यंत, नोकरदार आणि व्यावसायिकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच मोबाइल फोन्सचा वापर करताहेत. कोणी आपला व्यवसाय वाढावा म्हणून, तर कोणी गरज म्हणून, कोणी मनोरंजन म्हणून तर कोणी नुसतंच मिरवण्यासाठी मोबाइल फोन वापरतात. असं म्हणतात, की लोकांकडे टूथब्रश असो वा नसो, टॉयलेट असो वा नसो, पण मोबाइल फोन हा असतोच असतो. आज मोबाइल फोनशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. जसजशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतसे इतर क्षेत्रांप्रमाणे मोबाइल फोन्समध्येही बदल दिसायला लागले. त्यांचे हँडसेट्स बदलले, त्यातलं तंत्रज्ञान बदललं, त्यात अधिकाधिक सेवा देणं शक्य झालं, त्यांचा वेग वाढत गेला, त्यात हळूहळू कॉम्प्युटर आणि टेलिव्हिजन हे दोन्ही शिरले आणि टेक्नॉलॉजिकल कॅन्व्हर्जन्सचं युग सुरू झालं. तसंच मोबाइल फोनमध्ये आपण आपली पुस्तकं, आपली गाणी, व्हिडिओज आणि फोटोज असं सगळंच घेऊन फिरतो. थोडक्यात, मोबाइल फोन ही आपली बँक, लायब्ररी, फोटो अल्बम, म्यूझिक सिस्टम, कॅमेरा, टेलिव्हिजन, सिनेमा थिएटर, स्कॅनर, टॉर्च, डिक्शनरी, कॅलक्युलेटर, कॅलेंडर, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम्स पार्लर, असं सगळंच बनलीय. हा एक चमत्कारच आहे. 

आपलं आयुष्य इतक्या आमूलाग्र तऱ्हेनं बदलणारं उपकरण आतापर्यंतच्या इतिहासात क्वचितच निर्माण झालं असेल. 

संवाद साधणाऱ्या एका साध्या उपकरणापासून ते आपल्या आयुष्यालाच गवसणी घालणाऱ्या अनेक धमाल गोष्टींपर्यंतचा मोबाइल फोनचा प्रवास भन्नाट आहे. 

१९०७ साली ‘पंच’ मॅगझीनमध्ये लेविस बामर या इंग्रजी व्यंगचित्रकाराच्या ‘फोरकास्ट्स ऑफ १९०७'  या मथळ्याखाली छापलेल्या या व्यंगचित्रात लंडनच्या ‘हाइड पार्क’मध्ये अनेक जण ये-जा करताना दाखवले होते. त्यांतली एक बाई आणि एक माणूस एकमेकांपासून लांब चालत होते. तरी त्यांचं एकमेकांशी काहीतरी संभाषण चालू होतं आणि तेही त्यांच्या हातात असलेल्या बिनतारी टेलिफोन्सच्या माध्यमातून. १९२६ साली कार्ल अर्नोल्ड या व्यंगचित्रकारानंही जर्मनीतल्या एका मॅगझीनमध्ये बिनतारी टेलिफोनचा उपयोग दाखवणारं एक व्यंगचित्र काढलेलं होतं. ही चित्रं चक्क मोबाइल फोन्सची होती. पण मजा म्हणजे ही चित्रं जेव्हा काढली गेली तोपर्यंत मोबाइल फोन्सचा शोध लागलेलाच नव्हता. एकमेकांशी दुरून कुठल्याही तारेशिवाय बोलता यावं अशी माणसाची इच्छा मात्र या व्यंगचित्रांमधून दिसून येत होती. १९२८ साली चार्ली चॅप्लिनच्या ‘द सर्कस’ या चित्रपटात एका तरुणीच्या हातात मोबाइल फोनसारखंच एक यंत्र दाखवलं होतं. विशेष म्हणजे हे यंत्र ती कानाला लावून चालता चालता त्यावर बोलते आहे असंही त्यात दाखवलं होतं. 

बिनतारी मोबाइल सुविधेचा शोध नेमका कुणी लावला याबद्दल वाद आहेत. पण काहींच्या मते मोबाइल फोनच्या खरा पाया स्टॉकहॉममध्ये राहणाऱ्या लार्स मॅग्नस एरिक्सन यानं १९१० साली आपल्या बायकोच्या काळजीपोटी रचला.



                           लार्स मॅग्नस एर्निसन




एरिक्सनचं फार्महाउस खूपच मोठं होतं.  एरिक्सनला गाडीतून फिरायचा अतोनात कंटाळा यायचा आणि त्यामुळे तो बऱ्याचदा घरीच असायचा. पण त्याची बायको हिल्डा हिला मात्र गाडीतून फिरायला आवडत असल्यामुळे ती अनेकदा गाडी घेऊन फिरायला जायची. ती बाहेर गेल्यावर तिच्याशी संपर्क साधायचा असल्यास एरिक्सनची खूपच पंचाईत व्हायची. त्याची कंपनी पूर्वी टेलिफोन दुरुस्तीचीच कामं घेत असल्यामुळे त्याला टेलिफोनमधल्या अनेक बाबी चांगल्याच परिचित होत्या. त्यामुळे बायको घराबाहेर पडल्यावर आपल्याला तिच्याशी संपर्क साधता यावा यासाठी फिरत्या टेलिफोनसारखं काहीतरी उपकरण तयार करायचा विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागला.

एरिक्सननं अनेक दिवस झटून असं एक यंत्र तयारही केलं आणि ते त्यानं आपल्या गाडीत बसवलं. अजून बिनतारी यंत्रांबाबत फारसं काहीच काम झालं नव्हतं. मग हे यंत्र बाहेर चालणार कसं? काहीतरी युक्ती करून हे यंत्र घरात असलेल्या आपल्या टेलिफोनशी जोडायची असा विचार त्याच्या मनात आला. 

मग एरिक्सनला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याच्या शेताच्या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी टेलिफोनचे खांब बसवलेले होते. एरिक्सननं या खांबांमधल्या सर्किट्समध्ये आपल्या यंत्रातल्या तारा जोडता येतील अशी सोय केली आणि आपण तयार केलेलं यंत्र गाडीत बसवलं. आता नवऱ्याशी बोलायचं असेल तेव्हा यातल्या कुठल्याही टेलिफोनच्या खांबापाशी हिल्डा गाडी थांबवायची, यंत्र गाडीतच ठेऊन या यंत्राच्या लोंबकळणाऱ्या तारा दोन उंच काठ्यांच्या आधारे शेतातल्या खांबावरच्या सर्किटमध्ये ठरावीक ठिकाणी जोडायची आणि यंत्राला सिग्नल मिळाला, की ती टेलिफोन ऑपरेटरला सांगून आपला फोन नवऱ्याच्या फोनशी जोडण्याची विनंती करायची. नवऱ्याशी बोलणं झाल्यावर परत त्या तारा ती सर्किटमधून काढून आपल्या गाडीत ठेवायची. कारमधून ही दोघंही फिरत असताना समजा त्यांना कुणाशी संपर्क करावासा वाटला, तर एरिक्सन एखाद्या टेलिफोन पोलपाशी आपली गाडी थांबवायचा आणि हिल्डा हे यंत्र टेलिफोनच्या वायरींशी जोडायची. हे यंत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जगातला तारांयुक्त का होईना, पण चक्क पहिला मोबाइल फोन होता! अर्थात, एरिक्सनला दूर फिरायला गेलेल्या आपल्या बायकोला काही सांगायचं असेल, तर त्याला आपली बायको कधी फोन करते याची वाट पाहावी लागायची. या फोनवर फक्त आउट गोईंग होतं. इनकमिंग नव्हतं. पण निदान बाहेर गेलेल्या आपल्या बायकोशी संपर्क साधता येत होता हेही त्याच्यासाठी काही कमी महत्त्वाचं नव्हतं. 

टेलिफोन्सना आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो हे एरिक्सननं एका प्रकारे सिद्धच करून दाखवलं होतं. तो मोठ्या दिमाखात स्वीडनमध्ये आपलं यंत्र घेऊन फिरायचा. त्याची ही कल्पना लोकांच्या पसंतीस पडली नसती तरच नवल होतं. त्यामुळे ‘एरिक्सन कंपनी’नंही वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल फोन्स बनवणं सुरू केलं; आणि मग काहीच काळात रस्त्यांवर असे ‘कार मोबाइल फोन्स’ दिसायला लागले.

                         कार मोबाईल फोन

रेडिओ जसा आकाशातून जाणाऱ्या इलेक्ट्रोमेकॅनिकल लहरींचा उपयोग करून तारेशिवाय चालतो, तसेच त्याच लहरींच्या पण वेगळ्या फ्रीक्वन्सीजचा उपयोग करून कालांतरानं बिनतारी मोबाइल फोन्स निर्माण झाले. एरिक्सननं तयार केलेलं हे त्याचं ‘तारायुक्त मोबाइल’चं उपकरण ओबडधोबड असलं, तरी आकारानं छोटं होतं. पण नंतरच्या काळात इतर कंपन्यांनी तयार केलेली बिनतारी लहरींच्या मदतीनं चालणारी यंत्रं आकारानं खूप मोठी आणि वापरायला अवघड असायची. फार फार तर मोठ्या जहाजांवर बसवता येतील अशी ही यंत्रं असत. त्यामुळे बिनतारी लहरींवर आधारलेली यंत्रं सर्वसामान्यांना वापरता येतील अशा आवाक्यात आणण्यासाठी काही काळ जावा लागला.



 संकलन संदर्भ - संवाद - अच्युत गोडबोले





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.