लेखक - ऍलिस्टर मॅक्लिन
अनुवाद - माधव कर्वे
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही थक्क करून सोडणारी अवघ्या एका दिवसात घडणारी थरार कथा आहे.
अमेरिकेचा ब्रिगेडियर जनरल जाॅर्ज कार्नेबी चे विमान अपघात ग्रस्त होऊन ते जर्मन सैन्याचा तावडीत सापडतात. दोस्त राष्ट्रांच्या युध्द योजना मंडळात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्यांच्याकडे असणारी बरीच महत्वाची माहिती काढण्यासाठी त्यांना बव्हेरियातील पर्वतराजीमध्ये असलेल्या श्लाॅस ऍडलर या अभेद्य समजल्या जाणाऱ्या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात येते. या डोंगरी किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे केबल कारचा. दुसरा कोणताही रस्ता नाही.
जाॅर्ज कार्नेबी ला सोडविण्यासाठी कामगिरी एका कमांडो पथकाकडे दिली जाते. मेजर जाॅन स्मिथच्या नेतृत्वाखालील या पथकात अमेरिकेचे ही कमांडो असतात. हे कमांडो पथक जर्मन हद्दीत पॅराशूटने उतरतात. त्याच्या काही मिनिटांनी त्याच विमानातून एक तरुणी पॅराशूटने उतरते. तिच्या बाबतीत स्मिथ व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसते.
स्मिथ तिला सांगतो की जर्मनांच्या कैदेत असलेला अमेरिकेचा ब्रिगेडियर जनरल नसून त्याचा तोतया बनलेला एक अभिनेता आहे. हे ही त्याच्या पथकातील कमांडोजना माहीत नसते.
किल्यात घुसण्याअगोदरच त्याचे दोन कमांडो मारले जातात आणि तीन कमांडो जर्मन सैन्याचा अटकेत पडतात. स्मिथ च्या सोबतीला असतो अमेरिकन कमांडो माॅरिस शेफर. आता या दोघांना अमेरिकन ब्रिगेडियर सह आपल्या सहकाऱ्यांना सोडवण्याची अशक्यप्राय वाटणारी कामगिरी करायची आहे.
ऍलिस्टर मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांमधले नायक पराक्रमाचं अंतिम टोक तर गाठतातच, पण त्याबरोबरच लेखकाच्या कल्पकतेने अतिशय खिळवून ठेवणाऱ्या आणि उत्कंठावर्धक होतात.
लेखनाच्या हुकमी पत्त्यांपैकी सगळ्यात मोठा पत्ता म्हणजे कल्पनेच्या पलीकडचे मिळणाऱ्या कलाटण्या. या कादंबरीतही त्या पदोपदी अचानकपणे येतात आणि अनपेक्षितपणे धक्का देतात.
निव्वळ रात्र पसरण्यापासून पहाटेचं उजाडेपर्यंतच्या मोजक्याच काळातली आभाळातली चंद्रकोर किंवा चांदणं किंवा पूर्ण वाटोळा चंद्र, असं रात्रीचं बदलतं वातावरण अशा किंवा त्या त्या भूभागातल्या पावसाच्या-हवामानाच्या वेगवेगळ्या छटा, आजूबाजूच्या झाडाझुडपांचा परिसर किंवा त्या त्या भूभागाच्या दऱ्याखोऱ्यांसारख्या वेगवेगळ्या वर्णनातूनसुद्धा आपलं कथानक आणि त्यातले तिरक्या चालीचे कथानायक अविस्मरणीय करून टाकतात.
प्रचंड ऊर्जा ओसंडून वाहणाऱ्या नायकांच्या साहसवाद हा वाचकांना एका चकव्याच्या खेळात ओढणारा, मती गुंग करून टाकणारा आहे.