पथेर पांचाली

पुस्तकाचे नाव - पथेर पांचाली
लेखक - विभुतीभुषण बॅनर्जी
अनुवाद - प्रसाद ठाकूर



मुळ बंगाली भाषेतील ही कादंबरी १९२८ साली प्रकाशित झाली होती. लेखकाची ही पहिलीच कलाकृती असुनही भरपूर गाजली होती. सत्यजीत रे ह्यांनी यावर काढलेल्या चित्रपटाने सुध्दा खुप यश मिळवले होते. 

या कादंबरीतून जवळपास एका शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखा चित्र डोळ्यासमोर उभे राहते. 

निश्चंडीपूर या खेड्यात राहणाऱ्या एका ब्राह्मण कुटुंबाची ही कथा. फारशी कमाई नसणारा पौरोहित्य करणारा हरीहर, मेटाकुटीने संसार चालवणारी त्याची पत्नी सर्वजया, गावभर उंडारत नाही नाही ते गोळा करणारी  दहा अकरा वर्षाची मुलगी दुर्गा आणि सात आठ वर्षाचा मुलगा अपू.आणि आश्रीतासारखी राहणारी, सर्वजयाच्या डोळ्यात खुपणारी हरीहरची आत्या इंदिरा.  भांडण झाल्यावर दुसऱ्या नातेवाईकांकडे निघून जायची. राग शांत झाल्यावर परत यायची. दुर्गाचा तिच्यावर खुप प्रेम होते. घरातलं कधीतरी होणारं गोडधोड आईची नजर चुकवून ती आजीला खाऊ घालायची. ती वारल्यावर दुर्गाला घरात थांबवणारं कोणीही नव्हतं. मग ती गावभर इकडून तिकडे भटकत राहायची. कोणाच्या तरी बागेतले आंबे चोरुन आणायची. कधी बोरं तर कधी चिंचा. आई नदीवर गेल्यावर तिखटमीठ लावुन अपूसह खायची. घरात एका पेटीत तिचा खजिना दडवलेला होता. बेगडी कागदाचा तुकडा, छापील कपड्याचा तुकडा, रानातून आणलेली वाळकी बोरं. आंब्याच्या वाळलेल्या कोया सुगरणीचं घरटं, छोटासा आरसा फुटलेला. या आरशावरुन तिची अन अपुची काहीवेळा खुप मारामारी व्हायची. मग सर्वजया दोघांनाही झोडपून काढायची. 


सर्वजया नेहमीच रागवलेली असायची. हरीहर बाहेरगावी जातांना पुरेशे पैसे न देता जायचा. त्याला यायला उशीर झाला की सर्वजयाकडचे पैसे संपलेले असायचे. मग ती घरातली एखादी वस्तू गुपचूप विकून टाकायची. तो सगळा राग घरी आल्यावर हरीहरवर निघायचा. आज ना उद्या आपली परिस्थिती सुधारेल या आशेवर हरीहर दिवस काढत होता. 

नंतर नंतर तो जेवणाचं आमंत्रण आलं की अपुलाही सोबत घेऊन जायचा, त्यानिमित्ताने अपुला चांगलंचुंगलं खायला मिळायचं तेव्हा त्याला बहिणीची आठवण यायची मग थोडीशी मिठाई तिच्यासाठी खिशात टाकायचा. आपल्या गावाबाहेर असलेल्या जगाची या बहिण भावांना कल्पनाच नव्हती. 

ताप आल्याचं निमित्त होवून दुर्गा जगाचा निरोप घेते. अपुचा मोठा आधार कोसळून पडतो. त्याचं सगळं भावविश्व विखरतं. 

दारीद्र्याला तोंड देतांना जीवनसंघर्ष अधिक तीव्र झाल्यावर हरीहर गाव सोडून बनारसला जायचं ठरवतो तेव्हा अपुला आयुष्यात पहिल्यांदा आगगाडी दिसते.  

वर्षभर बनारसला राहिल्यावर आजारात हरिहर च निधन झाल्यावर सर्वजया अपुला घेऊन कलकत्त्याला जाते तोवर अपू चांगलाच मोठा, समजदार झालेला , तिथेही गावाची आणि बहिणीची आठवण त्याची पाठ सोडत नाही. 

मुख्यत्वे बहिण भावांभोवती फिरणाऱ्या कथानकत उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण वाचकाला प्रभावित करते, बहिण भावांतले प्रेमळ भांडण, मनाविरुद्ध काही घडल्यावर अपुचं रागाने बाहेर जाणं आणि दुर्गाने त्याला समजावून परत आणणं. हरीहर, सर्वजयाचा दरिद्र्याविरोधातला लढा,  हरीहर मरण पावल्यानंतर सर्वजयाचा कणखरपणा, अपुचा परिस्थितीनुसार वाढत जाणारा समजुतपणा अनेकदा हळवे करुन डोळे ओले करतो. कथानकाच्या ओघात त्यावेळची वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, जमीनदार, गरीब श्रीमंतीची दरी अधोरेखित होते. 

अनुवादक प्रसाद ठाकूर यांनी केलेला अनुवाद प्रशंसनीय ओघवता आहे. विषेश म्हणजे बारावीला असतांना त्यांनी या कादंबरीच्या अनुवादाचा संकल्प केला होता. पुढे समर्थपणे पूर्ण केला. 

प्रसाद ठाकूर हे चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून कादंबरी व चित्रपट माध्यमांतर यावर संशोधन करीत आहेत. 










Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.