लेखक - गिरीश कुबेर
मनातले कोणतेही विचार चेहऱ्यावर दिसू न देणारा, विरोधकांना नेस्तनाबूत करणारा, एका खंडप्राय देशाचा हुकूमशहा पुतिन.
एका सर्वसाधारण घरात जन्मलेला, केजीबी या गुप्तहेर संस्थेतला सामान्य कर्मचारी पुढे ह्याच संस्थेचा कर्ताधर्ता होतो आणि बघता बघता रशियाचा अध्यक्ष होतो अशा व्लादिमिर पुतिनची ही कहाणी.
आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कांगोऱ्यासह करून दिलेली ही ओळख.
३१ डिसेंबर १९९९ या दिवशी रशियाचे अध्यक्ष येलत्सिन ह्यांनी पदत्याग करतांना आपला उत्तराधिकारी म्हणून व्लादिमिर पुतिन ची नेमणूक केली आणि देशात नव्या कालखंडाची सुरुवात झाली. त्यावेळी पुतिन सेंट पीटर्सबर्ग चा उपमहापौर होता.
हातात आलेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पुतिनने सगळ्या भल्याबुऱ्या मार्गांचा उपयोग केला. देशात निवडणूका होतात, नागरीक मतदान करून लोकप्रतिनिधी निवडून देतात म्हणून देशात लोकशाही असेलच असे काही नाही. निवडणुकांचा फार्स बनवून एकामागून एक विरोधक संपवत, विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना नाहीसे करीत एकचालकानुवर्ती, एककल्ली सत्ता राबवली. ( असे काही फक्त रशियातच होते असे नाही.) मात्र हे ही मान्य करायला हवे की पुतिनने रशियाच्या अर्थव्यवस्थेला गती दिली. सावरली.
येलत्सिन च्या काळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्यात आले होते त्यावेळी सरकारी तिजोरी पेक्षा जास्त सत्ताधीशांचे खिसे भरले होते. एका उद्योजकाने पुतिनच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्व पुतिनने सर्व उद्योगपतींना क्रेमलिन ला बोलावून घेतले. सत्ता कारणाचा खेळ आपण कोणत्या नियमाने खेळणार हे उद्योगपतींना स्पष्टपणे सांगितले. "मी तुमच्या कोणत्याही उद्योगात हस्तक्षेप करणार नाही की नोकऱ्या बाबत प्रश्न विचारणार नाही परत सरकारीकरणही करणार नाही या बदल्यात माझी अट एकच तुमच्यापैकी एका नाही कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी किंवा पाठिंबा देऊ नये अध्यक्ष आणि त्यांची धोरण या विरोधात तुमच्याकडून टीकेचा एकही सूर निघता कामा नये या अटींचा भंग झाला तर मात्र तुमची अरेरावी मोडून काढण्यात मी एक क्षणही वाया घालवणार नाही. "
असा हा लोकशाहीच्या आवरणाखाली जनतेच्या मनात राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवणारा हुकूमशहा. विरोध करणाऱ्या एका पत्रकाराला संपवण्यासाठी विमानातील सगळ्यांचेच बळी घेणारा, परदेशाचा आसरा घेणाऱ्या विरोधकांना तिथेच मारणारा क्रूरकर्मा. रशियातीलच नव्हे तर अमेरिका सारख्या बलाढ्य देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता क्रिमिया बळकावणारा,
सध्या युक्रेन ला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असणारा एककल्ली हुकूमशहा....!
रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देश विदेशात त्याने जी पावले उचलली ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलांना दिलेली त्याची व्यक्ती केंद्रित हुकूमशाही प्रदीर्घकाळ टिकली तरी कशी.. हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न..
स्टाॅलिन यांचा क्रूरपणा आणि गोर्बाचेव यांचा धोरणीपणा व्लादिमीर पुतीन या एकाच व्यक्तीत एकवटलेला आहे.